About Me

"सार्थबोध" साईटवर माझ्या कविता ,भावगीत ,निरुपण ,पोवाडा ,ओवी ,बंदिश ,मुक्तछंद ,लेख ,गवळण ,चारोळ्या आणि गझल तसेच मराठी आणि हिंदी भजन समाविष्ट केले आहेत.

Latest Posts

नवीन लिखाण:-



Friday, October 8, 2010

ll भजन ll - ध्याईले श्रीगुरु चरण

ll भजन ll 

ध्याईले श्रीगुरु चरण
करीले नाम तयाचे स्मरण
भाग्याचा आला असे क्षण
होउया दंग आता सर्वजण        ll     ll

झाली ही दशा दारुण
कोण करील तयाचे हरण
मी म्हणतो भजन गण गण
घेतले असे नामाचे वाण         ll    ll

बरसले दैन्यरूपी बाण
भासले जवळ हे मरण
करील कोण अमुचे संरक्षण
बरसूदे कृपा जशी तो वरुण             ll    ll

जीवन हे भासे अरण
करितो धेनुरूप हंबरण
तुम्हीच करा सर्व कष्ट  तारण
करा हो तया कृपेची पेरण               ll    ll

आता कंठाशी आला प्राण
रूप तुझे हृदयात कोंदण
राम नसे जगी तुझ्यावीण
करितो नाम तुझे संस्मरण             ll    ll 

जनहो समजा हा सण
करा सदा नाम गुरुचे श्रवण
फिटेल हो जन्माचे पारण
वर्षूदे कृपारुपी हे कण                    ll    ll

होऊया सर्व तयार आपण
चेतवू आपुले दोन्ही कर्ण
विसरुया आपसातले वर्ण
होऊ जसे मिष्टान्न सारण               ll   ll

करुया गुरुनामाचा पण
मिळाले प्रभुकृपेचे आंदण
करुया जीवनाचे विवरण
होउया गुरुनामी रममाण         ll    ll

होईल कृपावंत लक्ष्मीरमण
उमजेल जन्माचे कारण
सर्व फीटून जाईल ताण
भजा हो श्रीगुरूचे चरण         ll    ll
 
 
 
समर्थ  कृपाभीलाषी,
सचिन पुरुषोत्तम कुलकर्णी
© सचिन पुरुषोत्तम कुलकर्णी

ll भजन ll - श्री गुरु चरण पुन्हा धरणार

ll भजन ll 
श्री गुरु चरण पुन्हा धरणार, आमुची दैना कोण आता हरणार ll धृ ll
 

श्री गुरु चरण पुन्हा धरणार,
आमुची दैना कोण आता हरणार
ll धृ ll

तापुनी जेंव्हा परिस्थितीशी
दैन्यविचारे चढती मानसी,
तुझ्याविना हे पापताप हे
कोण आता हरणार
ll  ll .................               ll धृ ll

नाही फळीती पुर्वही आता
परिस्थिती, जन मारिती लाथा,
तुझ्याच चरणी आता माथा
स्मरूनी तुला भजणार
ll  ll .................           ll धृ ll

स्मरूनी आहे सर्व कथा इति
तूच तारिले जन इतरेती,
तुझी कृपा ही कधी आम्हासी
घनरूप वर्षणार
ll  ll .................                      ll धृ ll

ममगृही जो तुझा निवासा
तुझ्यावरी तो पूर्ण भरवसा,
पापताप मी आता का सोसा
तुझे नाम स्मरणार
ll  ll .................               ll धृ ll

श्री गुरु चरण पुन्हा धरणार,
आमुची दैना कोण आता हरणार ll l  
 
समर्थ कृपाभिलाषी,
सचिन पुरुषोत्तम कुलकर्णी
© सचिन पुरुषोत्तम कुलकर्णीsachin.kulkarni78@gmail.com

पोवाडा - कथा सह्याद्री अन् कैलासाच्या शिखराची .......

ll पोवाडा ll
कथा सह्याद्री अन् कैलासाच्या शिखराची .......
© सचिन पुरुषोत्तम कुलकर्णी

कथा ऐका ढाण्या वाघाची
सह्याद्री अन् कैलासाच्या शिखराची
गंगा आणि कृष्णेच्या महतिची
भवानी आणि शंभू अवताराची
कथा ही आमच्या शिवबाची रं....... हो .......जी जी जी जी जी

मेघ यवनी जमले दारुण
केले जनतेचे सुख हरण
काज नाही राहिले जगण्या कारण
भलेभले फिरले जहागिरी कारण....... हो .......जी जी जी जी जी

जनता झाली अवघी ही त्रस्त
दुश्मनाने केले स्वराज्य फस्त
कर्ते झाले दारू नादात मस्त
शहाजी राजा मनी राहिना स्वस्थ
अजून कोणी धरीना वाट रास्त.......  हो .......जी जी जी जी जी

सगळा झाला असा हा कहर
भर वैशाख जसा हर प्रहार
सैतानी उन्मादाचा ज्वर
कोणी पुढे येईना भीड़ण्या नर....... हो .......जी जी जी जी जी

वेळ आली सूर्य उगवण्याची
वेळ आली प्रजेला धीर देण्याची
बातमी आली शिवनेरीची
जगद्द् माउली जीजाऊची....... हो .......जी जी जी जी जी


माता जीजाऊ प्रसवली
देव जी जन्माला घाली
उत्कर्षाची मुहूर्तमेढ़ रोवली
सैतानी चक्रे उलटी फिरली ...... जी ........जी जी जी जी जी 

जन्म झाला शिवनेरिवर
शंभू जसा अवतरला भूवर
प्रजेमधे झाला हर्ष जागर
स्वर्गी जमली सभा आणि गुरुवर
हाच तो कलियुगी विष्णू अवतार ....... हो .......जी जी जी जी जी

हा बाळ राजा मोठा झाला ......प्रजेत रमला ..... रानात ..डोंगरात.... किल्ल्यात वाढला... प्रजेला समजला ....... उमगला..... हृदयात बसला.

सैतानी वारे अजून थांबले नव्हते , शिवबा पण निश्चयाला हटले नव्हते.  
सगळे स्वराज्याच्या तयारीत मग्न होते, मावळे घरावर तुळशी पत्र अन् निखारा ठेवून होते. सगळे आता फ़क्त वाट बघत होते.

वेळ आली, समय आला, खान भेटायला यायचा निरोप आला.
दुश्मनाचा काळ जवळ आला, दुश्मन दांडगा कपटी भेटायला आला, नुसती नजरानजर झाली. बदल्याची आग शिवबाच्या मस्तकात गेली, हृदयात वीज चमकली, हाताच्या मुठी वळल्या अन् मस्तकात तांडव झाले, प्रजेचा बदला घ्यायची वेळ जवळ आली

शिवबा तेजाने असा संचरला
मावळी संख्येला विसरला
दुश्मनी गर्दीला ना भ्याला
दुश्मन मातीत घालण्याचा पण केला ....... हो .......जी जी जी जी जी

भेट झाली गाठ पडली; स्वर्गात भवानीने त्रिशूळ उगारले अन् रामरायाने धनुष्य ताणले.

दुश्मनाने घात डाव केला
शिवबाने प्रति घाव मारला
उभा देह धरून आडवा कापला
हर हर महादेव यलगार ....... हो .......जी जी जी जी जी

एका मागून एक कार्य फत्ते झाले. शिवबाच्या हृदयाच्या मनातील मुगुटात हीरे जडत गेले; काही हातीचे कंकण लढाईत गळत गेले. पण विचार वाढत राहिला, स्वराज्याचा विस्तार सूर्यकिरणाप्रमाणे होत गेला, जिथे जिथे पोचला तिथला अंधार दूर केला. आई बापाच्या विचाराचे चीज झाले, रामराज्य भूवरी अवतरले. सर्व जीव धन्य झाले.

दिवस सोन्याचा उगवला 
रत्नजडित सिंहासनाला सजविला
वेदपुराण जयघोषाला....
वेदपुराण जयघोषाला....साथ झाली सनई चौघड्याला
आमचा राजा छत्रपति विराजमान ....... हो .......जी जी जी जी जी

आलबेल आलबेल झाले, प्रजेचे डोळे सुखाने पाणावले, सुखाचे घास अन् आयुष्याचे दिस आनंदाने सरू लागले. सगळे राजाच्या छायेत विसावले.
असा प्रजेचा मालक होणे नाही, असा राजा होणे नाही, कारण सोपे आहे, एकच विष्णूअवतार दोनदा होणे नाही.

आज माणूस पारखा झाला, स्वराज्याला विसरला, तत्वांना मूठ माती देऊ लागला,
मूळची एकी विसरला, हा माझा; हा त्याचा असा भेद करू लागला; आजचा तरुण हातचा गेला , दारू, नशा आणि अध:पतनाला लागला, सगळा परिणाम समोर दिसू लागला
आणि , आणि........... जो तो पुन्हा एकदा शिवबा अवतरण्याची वाट पाहू लागला.

शिवबाने जे केले तेच मूळात विसरला, शिवबाने प्रत्येक मावळ्यात स्वत:ला पाहिला, नेमका हाच बदल आज घडला आणि माणूस स्वराज्याला मुकला.

घेऊ शिवबाचे ते वचन
करुया फितुरीचे ते पतन
मिटवूया भेद अणि वर्ण
जागूया मैत्रीचे वचन
करुया स्वत: राष्ट्र आराधन
चेतवू हर हर महादेव जागरण ....... हो .......जी जी जी जी जी
शिवचरणरज,
सचिन पुरुषोत्तम कुलकर्णी
© सचिन पुरुषोत्तम कुलकर्णी

Thursday, October 7, 2010

लेख:- मी गर्दीत वाट हुडकतोय.................

Article published on Antaraal.
http://antaraal.com/e107_v0617/content.php?content.2464
---------------------------------------------------------------
मी गर्दीत वाट हुडकतोय.................
© सचिन पुरुषोत्तम कुलकर्णी

रोज सकाळ होते, मी जागा होतो, पूर्वीही सकाळ व्हायची मी जागा व्हायचो.

उठून शाळेत जायचो, गर्दीत सामील व्हायचो,
बे एके बे पासून १० वि पर्यंत मी गर्दीत चालत राहिलो,
लोक
वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतात म्हणून मी ही घेत राहिलो, आणि अमुक एक क्लास चांगला आहे म्हणून मी पण जात राहिलो.

शाळा झाली, सगळे ११ वी /१२ वी करतात म्हणून मी ही केली, सगळे जण ढीग भरून फॉर्म भरतात म्हणून मी ही भरत राहिलो.
शेवटी काय मी पण गर्दीत चालत राहिलो. ........................

१२ वी नंतर सगळे कंप्यूटर क्षेत्रात जातात म्हणून मी पण गेलो.
अमुक यांचा तो आणि तमुक यांची ती सध्या एम
एनसी कंपनीमधे असते ,इतके हजार पगार मिळतो हे ऐकत राहिलो, मी पण त्यांच्यातलाच व्हायच्या तयारीला लागलो.

अरे तो यूएस ला गेला, हा यूके हून आला , तो युरोप मधे सेट्ल झला हे ऐकत मी पण इंजिनियर होत गेलो. सगळे कॅम्पस मधे जातात तसा मी पण गेलो आणि पुन्हा एकदा त्याच गर्दीत एक `दिवस सॉफ्टवेर इंडस्ट्रीमधे उभा राहिलो.
शेवटी काय मी पण गर्दीत चालत राहिलो............................

लहान पणापासून गर्दीचा संस्कार झालेला मी असाच आयुष्यात वाहत गेलो.
माझेही इंडक्षन झाले, काम झाले, कष्ट झाले, अप्रेज़ल झाले, मॅनेजरला शिव्या देणे झाले, ३/४ स्विच झाले, पॅकेज वाढले.
मी एक पक्का सॉफ्टवेर इंजिनियर झालो. मी पुर्वी सचिन पुरुषोत्तम कुलकर्णी मधला "सच्या" होतो आता " एस. के." झालो आहे. आता सगळ्या गोष्टी पैश्यात मोजू लागलो आहे.

एक दिवस लक्ष्यात आले की मी गर्दीत आहे खरा, पण मला कोणी जवळचा नाही, वीकेंडला रस्त्यात कुठे भेटेल तिथे उभे राहून माझ्याबरोबर ३/४ तास गप्पा मारणारा मित्र नाही.
मी पण आता अगदी मित्रच नसले तरी पण कलीग बरोबर रिकामा वेळ घालवतो, वीकेंडला फालतू गप्पा आणि लंच/ डिनरसाठी तडफडतो.

घरात पण मी नसतो कारण रोज १२/१३ तास गर्दीत असतो,२ दिवस मिळतात म्हणून घरातले वीकेंड ला मला “”जाउ दे त्याला निवांत”” म्हणून सोडून देतात. असा मी आज काल गर्दीत असलो तरी एकटाच असतो.
आज काल मी टिपिकल सॉफ्टवेअरवाला झालो आहे, माझी कंपनी, माझे पॅकेज, माझे डेसिग्नेशन, माझा वेरियबल, माझा बुक केलेला फ्लॅट, त्याचे प्रोग्रेस मधील फोटो, माझी यूके वारी त्याचे तेच ते पकाव पीकासा वरचे आल्बम, माझी कार………..सगळ्याना दाखवत बसतो…. पण का काही कळत नाही कुठे तरी मनात कुरकुरतो, …....

मला ढीग भरून स्क्रॅप येतात, ऑरकूट /फेसबुक वर शेकडो फ्रेंड्स भेटतात, सगळे स्क्रॅप शेवटी केरात जातात आणि फ्रेंड्स हे फक्त फ्रेंड्सच राहतात. त्यातलाच कोणी काय भावा कुठे असतोस ये की चा मारू हे बोलत नाही, आणि आज काल काका-काकी
कुठ तुझ्याकड की गावाकड असले प्रश्न पण विचारत नाही. कोणी फोन करून लेका गावाकड ये कि एकदा, किंवा यंदा तरी जत्रेला ये कि भावा असे पण म्हणत नाही,

मला कोणीच ऑरकूट वरचा ये की मर्दा घराकड एकदा जेवाय असे पण म्हणत नाही, आम्ही ढीग आउटिंग /पार्ट्या करतो पण त्याची मजा यात नाही. गावाकडे आहेत काही मित्र, पण मी तिकडे जात नाही, आज कुठे तरी हुरहूर वाटते आहे की मी माझे पक्के दोस्त गमावल्याचे, ते गावाकडचे असले म्हणून काय झाले त्या हाकेसारखी आर्तता इथल्या फ्रेंड्सच्या
इनव्हीटेशन मध्ये जाणवत नाही.

लोकही माझे मेल/स्क्रॅप/ पीकासा आल्बम पाहतात आणि ते पण;
च्यायला हा ऑनसाइट जाऊन आला वाटते असे म्हणत फोटो न बघता लॉग ऑफ मारतात , त्याना फार आवड नसते बघायची, एखादा कॉमेंट टाकून बस गर्दीचा नियम पाळत असतात.

गर्दीत राहून पण मी आज एकटा आहे………नावाला फक्त लोक गर्दीत उभे आहेत, आयुष्यात एक वेळ अशी येते की ही गर्दी कामात येत नाही, कलीग म्हणणारे तुमचे जवळचे तुमच्या सुखात नक्की एन्जॉय करायला येतील, पण दुखा:च्या वेळची ग्यारेंटी नाही. पण
 जाणो; हे गर्दीतले लोक सुद्धा कधीतरी दु:खी होतील, त्या वेळेला कलीग, डिलीवरेबल्स, मीटिंग्समधे व्यस्त असतील आणि वीकेंड ऑलरेडी प्लान झाला रे.... सॉरी... असे म्हणत कलटी टाकतील. सॉफ्टवेअरवाला झाला म्हणून काय?? दु:ख कधी तरी येतेच त्याला तुम्ही इंस्टालमेंट अमाउंट देऊन टाळू शकत नाही. प्रत्येक अडचण पैश्याने सोडवता येत नहीं.
अश्या वेळी लागतात ते फक्त मित्रच, जे बिचारे कधी कलीग नसतात अणि ते कुठल्याच गोष्टी पैश्यात मोजत नसतात.

मी विचार करतो की मी या गर्दीत का चालत राहिलो??सगळे करतात तेच बरोबर असेल, जे काय व्हायचे ते सगळयांचे होईल, या गर्दीच्या फुटकळ तत्वावर विश्वास ठेवत राहिलो.
काय असते ही गर्दी? इयत्ता १ ली ते …..इंटरव्यू राउंड पर्यंत काय करते ही गर्दी?? कोण ठरवतो यांची दिशा? या गर्दीत कोणच कुणाला ओळखत नाही......पुढचा चालतो म्हणून मागचे चालतात........आणि मागे खूप लोक आहेत म्हणून पुढचा चालत राहतो.

आपण जगत नाही आहोत आपण आपल्याला जगवत आहोत, कशासाठी ते कुणालाच माहीत नाही, मी माझे वैयक्तिक आयुष्य विसरत चाललो आहे का? मला पक्के मित्र मिळत नाहीत का? का मीच त्या वाटेला जातच नाही. विचार करून डोके दुखु लागले , उपाय म्हणून कायतर मशीनची हॉट कॉफी मारुन स्मॉकिंग झोन मधे कलीगला घेऊन चक्कर मारुन आलो.

पण आता ठरवले आहे……काही तरी केले पाहिजे, जुन्या आयुष्यात परत गेले पाहिजे, का मी
जाऊ शकत नाही? माझे डेसिग्नेशन मला आडवे येते का?? कोण मला आडवणार? का नाही मी सुखी एवढे पैसे मिळवून, का नाही मला कोण अगदी जवळचा मित्र इतके सगळे कलीग असून?

बरेच काही हरवलय........बरेच काही गमावलय.............नक्की कुठे वाट चुकली हे पण कळत नाहीए........गर्दी कुठे तरी जाते म्हणून मी माझे स्वत:चे असे सगळे सोडून गर्दीतला दर्दि झालोय..........गर्दी करते ते सगळे नियम पाळायला लागलोय.

कधी तरी या कळपातून वेगळा रस्ता काढून बाहेर जायचे आहे.
बसस्स.......आता ...ठरवले आहे…आणि सुरुवातही केलेली आहे, कलीग म्हणतात हा आजकाल वीकेंड ला येत नाही बरोबर, हा थोडा वेगळाच वाटतो आहे, लास्ट वीक म्हणे तेच्या गावी गेला होता तिथे सुट्टी टाकून त्या लोकांबरोबर राहिला. आज काल म्हणे पुन्हा पेटी वाजवायला विठ्ठल मंदिरात जातो, ए हा असा का करतो? या वेळी वारीला सासवडपर्यंत पायी गेला होता म्हणे, अजुन काय तर या वेळी म्हणे पुन्हा गणपती मंडळात ढोल वाजवायला जाणार आहे, हे हा खरेच असे करणार आहे?

मी थोडा वेगळा झालो आहे, गर्दीत आत्ता थोडी
कुरबुर 
आहे , अगदी मान खाली घालूनच चालत आहे..........लोक वाट चुकलेला का म्हणेना मला……पण मी मान खाली घालून माझी वाट शोधत आहे.

एकदा विचार करा मित्रांनो या सगळ्या गडबडीत आउटकम काय?? समाजात फक्त आपण आपल्या नावावर काही
स्क्वेअरफूट
घेण्यासाठी धडपडत आहोत काय??  का उगाच फ्रेंड्स ग्रुप वरचे फ्रेंड्स काउंट दाखवून स्वत:चे समाधान करत आहोत काय?

मला पुन्हा "एस.के." नाव सोडून सच्या व्हायचे आहे........

© सचिन पुरुषोत्तम कुलकर्णी

LIKE Saarthbodh !!!