About Me

"सार्थबोध" साईटवर माझ्या कविता ,भावगीत ,निरुपण ,पोवाडा ,ओवी ,बंदिश ,मुक्तछंद ,लेख ,गवळण ,चारोळ्या आणि गझल तसेच मराठी आणि हिंदी भजन समाविष्ट केले आहेत.

Latest Posts

नवीन लिखाण:-



Thursday, March 31, 2011

लेख:- २०११- विश्व चषक- भारत-पाकिस्तान; उपांत्य सामना - हिंदुस्थानचा विजय हि तो श्रींची इच्छा.......

कालचा सामना हा सामना नसून एक लढत ठरली.

पहिल्या दहा टकामध्ये तर अगदी नुकताच अभ्यंगस्नान करून नरकचतुर्दशीला फराळाला बसताना फटाक्यांचे आवाज येतात तसे वाटत होते , सचिन आणि सेहवाग हे हजार हजारच्या माळा घेऊन पेटवत होते. सेहवागने तर शिट्या मारणाऱ्या लोकांच्या गळ्याची परीक्षाच घेतली, ती इतकी कि नंतर नंतर काहींच्या तोंडातून शिट्टी ऐवजी फक्त हवा उडत होती. सेहवागने उमर गुलचे आडनाव सार्थकी ठरवले, आपल्याकडे म्हणतात नानाव राखले पठ्याने तसे त्याचे करिअर का काय म्हणतात ते गुल करून टाकले. सचिन हा तर देवाचा माणूस , त्याला काल खूप संधी मिळाल्या, पण त्याच्यावर दबाव वाढल्यामुळे धावांचा सुनामी येण्याऐवजी फक्त पूर आला. सेहवाग ने उत्तम साथ दिली.

सचिनला इतकी जीवदाने मिळाली त्याच वेळेला मनाची खात्री पटली होती हिंदुस्थानचा विजय हि तो श्रींची इच्छा “.

गंभीर मात्र या वेळेला आपले नाव राखू शकला नाही, फिरकी झोपेत सुद्धा सहज खेळू शकणारा माणूस फिरकला. नंतर गेल्या काही सामन्यात हनुमंताचे काम करणारा युवराज, स्थिर होऊ शकला नाही , दबाव थोडा वाढला होता. सचिनने नेहमीप्रमाणे खेळी केली, थोडा संयम ठेवला, आणि तो किती महान फलंदाज आहे; हे पुन्हा दाखवून दिले. त्याच्या नुसत्या पीचवर असण्याने फरक पडतो, पुंडलीकाला पांडुरंग उभा असावा तसा दुसऱ्या फलंदाजाला सचिन भावतो आणि समोरच्याच्या बॅटमध्ये बळ येते. सचिन लवकर गेला असता तर खूप अवघड झाले असते पण सचिन आणि धोनीने चांगला संयम ठेवत खेळपट्टीवर फेविकॉल ओतल्यासारखे टिकून राहिले.

कालच्या सामन्यात म्हणे दहशतवादी हल्ल्याचा धोका होता, मला वाटते आजपर्यंत जगात कुठेच दहशतवाद्यांनी दहशत घातली नसेल एवढी दहशत काल आपल्या खेळाडूंनी घातली. एके ४७ सारख्या गोळ्या सोडणाऱ्या अतिरेक्यांप्रमाणे सेहवाग, सचिनने धावा ठोकल्या, एके ४७ थकेल;पण हे दोघे इरेला पेटले होते, घुसखोरी करणाऱ्या अतिरेक्यांप्रमाणे भज्जी, नेहरा, मुनाफ, झहीर, युवराज यांनी विकेट आणि पीचवर घुसखोरी करत पाकिस्तानचे धाबे दणाणून सोडले. कंदहारला विमान अपहरण करून गुल केले होते तसे भज्जीने उमर अकमलची आणि मुनाफने अब्दुल रझ्झाकची दांडी गुल केली.

आपल्या गोलंदाजांनी दिवाळीचा फराळ वाटून खावा तश्या पाच जणात १० विकेट वाटून प्रत्येकी  बळी घेतलेसगळ्यांनी यथोचीत फराळ केला.  रैनाला संघामध्ये घेऊन धोनीने तो नुसता वेडा नसूनध्येय वेडा आहे  हे सिद्ध केलेयुसूफची कमी नक्कीच जाणवली, पण रैना ज्या पद्धतीने खेळला तशी  त्याने युसुफची उणीव भरून काढली, अगदी "रैना बीती जाये, श्याम ना आये" याप्रमाणे रैना खेळत राहावा आणि टके संपून ती श्याम-संध्याकाळ येउच नये असे वाटत होते.  

नेहरा आणि मुनाफ यांनी आपल्या कारकिर्दीत सगळ्यात उत्कृष्ट गोलंदाजी केली; असे त्यांनाही ड्रेसिंग रूममध्ये  गेल्यावर पटले असेल. एकतर गेलेला फॉर्म, त्यात विश्वचषक, त्यात उपांत्य फेरी आणि त्यात पाकिस्तान, एवढा ताण सहन करून प्रेक्षकांचा जल्लोष विसरून; नियंत्रित आणि एकाग्र गोलंदाजी; म्हणजे डोक्याने भिंत फोडण्याचे काम त्यांनी केले, ते सुधा डोक्याला तसूभर इजा होता.

नेहरा, मुनाफची अतिसुंदर गोलंदाजी पाहिली तेंव्हाच पटले होतेहिंदुस्थानचा विजय हि तो श्रींची इच्छा “.

पाकिस्तानकडून निकराची झुंज मिळत होती, पहिल्या १० षटकात तर, आपल्या धावा खरेच खूप कमी झाल्या असे वाटत होते. समोर पाकिस्तानी फलंदाजीचे मोठे धरण उभे होते, पण झहीर आणि मुनाफने भगदाड पाडले आणि युवराज आणि हरभजनने ती भिंत जमीनदोस्त केली. भिंत फुटून तुफान वेगाने वाहणाऱ्या पुरातल्या पाण्याप्रमाणे, एक जल्लोष, आनंद एका क्षणात सगळ्या प्रेक्षकांना भिजवून गेला, हा पूर सगळ्यांना हवा होताशिट्ट्या, ढोल, घोषणा यांनी महाआरतीचा प्रसंग डोळ्यासमोर आला. लोक आपल्या खेळाडूंची आरतीच जणू करत होते.  

सर्वात मोठा बदल म्हणजे आपल्या गोलंदाजांनी अतिरिक्त धावा इतक्या कमी दिल्या कि, त्या जर नेहमीप्रमाणे खिरापती सारख्या वाटल्या गेल्या  असत्या तर कदाचित शेवटच्या टकात पाकिस्तानपुढे फक्त पंधरा धावांच्या आसपासचे लक्ष्यच राहिले असते असे वाटते. क्षेत्ररक्षण पण सीमेवरील जवान करतात तसेच वाटत होते. रैना, कोहली आणि युवराज यांच्या जवळून चेंडू सोडाच साधा वारा वाहायालाही बंदी होती. भज्जीला या स्पर्धेत खूप कमी बळी मिळाले, पण कालचे  महत्वाचे  बळी घेवून त्याने कसूर भरून काढली.

कालचा एकंदरीत सामना बघता आपल्याकडे घरी एखादा समारंभ कसा संपन्न होतो त्याप्रमाणे संपन्न झाला, याला दुसरा योग्य शब्द अजून मिळणार नाही. इप्सित फळ प्राप्ती झाली. रडतखडत होता सामना एखाद्या पठ्ठ्या वाघासारखा जिंकला गेला. आपल्या खेळाडूंनी संघ भावना, नेत्याने दिलेली जबाबदारी, प्रत्येकाचे ठरवून दिलेले काम, कष्ट, जिद्द, अनुभव आणि मेहनत यांची समिधा टाकून कालचा "चेंडू फळीचा" यज्ञ "संपन्न" केला. आपल्या संघाची खरच एकदा दृष्ट काढायला पाहिजे.
मला खात्री आहे; आता  मियांदादने मारलेली शेवटची सिक्स कोणाला यापुढे आठवणार नाही, आणि स्वतःहून आपल्यातला कोणी पुढच्या पिढीला ते जुने पुराणे दु: सांगत बसणार नाही, कारण तो विषय इतिहासात जमा झाला आहे, आणि पुढील पिढीला आपल्या सर्व मंडळींनी एका नवा इतिहास सांगण्याकरता लिहून ठेवला आहे.

त्यामुळे आता आपल्याकडे सांगण्यासारखे पुष्कळ आहे, तेंव्हा या एका "कडक" विजयाची चर्चा करणे , क्षणचित्रे पाहणे, अगदी नावडती वर्तमानपत्रे पण उघडून बघणे आणि पुढील काही आठवडे चहा आणि या विजयाची चर्चा करण्यात घालवणे हे प्रत्येक क्रिकेट प्रेमीचे कर्तव्य आहे असे मला वाटते.
आता पुढचा सामना पण महत्वाचा आहे, यात फार भावनिक गुंतागुंत नाही, पण समोरचा संघ पण लेचपेचा नाही, १० गाडी राखून जिंकलेली माणसे आहेत, फक्त तीच जिद्द, संघभावनाधोनीची नवी  उलगडणारी शक्कल, प्रेक्षकांचा पाठींबा, तीच सचिन-सेहवागची भागीदारी. गोलंदाजांचे आक्रमण आपल्याला नक्की यश मिळवून देईल.

सचिनचे १०० वे शतक झाले असते तर बासुंदीत केशर पडले असते. असो; पण बासुंदी अजून गोड आहे, मधुर आहे या शनिवारी त्यात वाटीभर केशर पडणार हे निश्चित. खऱ्या अर्थाने आता आपल्या खेळाडूंनी जीवाची मुंबई करावी अशी इच्छा आहे.

कालच्या विजयाची गुढी उभारून गुढीपाडवा आपण आधीच साजरा केला आहे, आता २०११ ची दिवाळी थोडी आधी; या शनिवारी साजरी करायला काय हरकत आहे.

श्रीलंकेला घाबरण्याचे कारण नाही, कारण लंकादहन तर आपण पूर्वीही केले आहे, आणि ज्या हनुमंताने ते केले त्याचा शनिवार राखून आपण या लंकेचे क्रिकेटरुपी दहन नक्की करूच.

बोला जय हनुमान !!! 

© सचिन पुरुषोत्तम कुलकर्णी
sachin.kulkarni78@gmail.com

LIKE Saarthbodh !!!