About Me

"सार्थबोध" साईटवर माझ्या कविता ,भावगीत ,निरुपण ,पोवाडा ,ओवी ,बंदिश ,मुक्तछंद ,लेख ,गवळण ,चारोळ्या आणि गझल तसेच मराठी आणि हिंदी भजन समाविष्ट केले आहेत.

Latest Posts

नवीन लिखाण:-



Wednesday, June 29, 2011

ll भजन ll - स्वामी समर्थ, स्वामी समर्थ तोची जगण्याचा अर्थ

स्वामी समर्थ, स्वामी समर्थ
तोची जगण्याचा अर्थ
स्वामी समर्थ, स्वामी समर्थ  ll धृ ll

कृपा करिती स्वामी, त्यात ना असे कोणता स्वार्थ
गाठुनी देती प्रत्येकास, तो मधुर असा परमार्थ
स्वामी समर्थ; स्वामी समर्थ, जगण्याचा अर्थ  ll १ ll

चालविती त्रैलोक्याचा, सारा ते चरितार्थ
स्वामींचे पद्जल धारण करितो, मी माझ्या उदरार्थ
स्वामी समर्थ; स्वामी समर्थ, जगण्याचा अर्थ ll २  ll

नाम स्वामींचे स्मरतो, माझ्या जन्मा उद्धारार्थ   
आळवितो स्वामी ऐका, करुण  माझी आर्त
स्वामी समर्थ; स्वामी समर्थ, जगण्याचा अर्थ  ll ३ ll

नाही दुजी इच्छा, स्वामी भेटी कारणार्थ
दर्शन द्या ते मजसी, होऊ दे नरजन्म हा सार्थ
स्वामी समर्थ; स्वामी समर्थ, जगण्याचा अर्थ   ll ४ ll

स्वामींची अगाध लीला, चरित्र जैसे वेदार्थ
अनेक लीला करुनी राहिल्या, लोकांच्या स्मरणार्थ
स्वामी समर्थ; स्वामी समर्थ, जगण्याचा अर्थ  ll ५ ll

स्वामींचे नाव घेऊ आता, नको जास्त शास्त्रार्थ
त्यांची कृपा होईल जाणा, हित त्यात सर्वार्थ  
स्वामी समर्थ; स्वामी समर्थ, जगण्याचा अर्थ  ll ६ ll

स्वामी वाट दाखविती आम्हा, ते केशव आम्ही पार्थ
स्वामी पाद्यपूजा करुनी, मनी भाव सेवार्थ
स्वामी समर्थ; स्वामी समर्थ, जगण्याचा अर्थ  ll ७ ll

समर्थ कृपाभिलाषी,

© सचिन पुरुषोत्तम कुलकर्णी
sachin.kulkarni78@gmail.com

ll भजन ll - जय जय माऊली गजानन, जय जय स्वामी गजानन

श्री गजानन महाराजांच्या चरणी समर्पित माझे हे भजन.
ll जय गजानन, श्री गजानन ll 
ll गण गण गणात बोते ll 


Friday, June 17, 2011

कविता:- एखादी गोष्ट करण्यामागे काय बुद्धी असावी?

क्रीयेमागच्या प्रक्रियेची, काय नक्की मेख असावी?
कोणी कुठली गोष्ट केली, बुद्धी त्यामागे काय असावी?

सारे प्राणी; मनुष्य; पक्षी, आपल्या वंशा वाढविती?  
पुढे चालावा वंश आणि; मातृपितृत्वाची आस असावी?

कोणास कोणी वाचविले संकटी, त्यात उपकाराची भावना असावी?
केलेच जरी अन्नदान कोणी, त्यात पुण्यकमाईची भावना असावी?

मेदिनीस त्या बीज पेरता, छाया फळांची इच्छा असावी?
तहानलेल्यास देता पाणी, तेंव्हाहि पुण्यकमाईची भावना असावी?

शिकविता लेकरास कोणी, चांगल्या संस्कारांची शिस्त असावी?
पालन संस्कारांचे व्हावे, अन् वृद्धपणीची सोय पहावी?      

नजरेत पहिल्या दिसता भावना, गुलाबी प्रेमाची गोडी असावी?
साथ मिळावी आयुष्याची, हि पुढाकारामागची  मनीषा असावी?

अनेक विधी; पूजा-पोथ्या, देवधर्माची आवड असावी?
होवू नये कोप देवाचा, हि कदाचित भीती असावी?

रोजची गडबड आयुष्याची, हर दिवस तसाच जगायची; तलफ असावी?
शेवट अन् पूर्णविराम माहित असुनी, जगण्याची सारी धडपड असावी?

मन उद्वि्ग्न असता, जगण्याची पक्की वाट दिसावी?
मार्गस्थ कोणी भेटेल का समयी, हि नेत्रांची धडपड असावी?

ज्ञान होता; प्रकाश पडता, शंका सारी दूर व्हावी?
साधक अवस्थेत देखील, परमेश्वर भेटीची हाव असावी?

सूर्य, नद्या, अग्नी, समुद्र, वारे, पंचमहाभूतांची उत्पत्ती थोडी वेगळी असावी?
कोणी मानो वा  मानो, कर्तव्यपूर्तीची निस्वार्थ प्रेरणा असावी?

परमेश्वराचे मात्र वेगळे , त्याची सगळी बातच निराळी 
त्यास भजा अथवा  भजा, त्याची जग चालवण्याची ती रीत असावी?

© सचिन पुरुषोत्तम कुलकर्णी

Wednesday, June 15, 2011

मुक्तछंद:- जर देवाने माणसाला भूक दिली नसती तर.......

जर देवाने माणसाला भूक दिली नसती तर.......

मोकळा बसलो असताना, रिकामटेकड्या डोक्यात एक विचार आला
माणसाला भूक लागत नसती, तर काय झाले असते? असा विचार झाला

भुकेसाठी एवढी वणवण, कुणी केली असती का?
पोटासाठी एवढा आटापिटा, कुणी केला असता का?

चांगली शाळा मिळावी म्हणून, पालक रांगेत रात्री उभे राहिले असते का?
चांगले गुण मिळावेत म्हणून, विद्यार्थ्यांनी रात्री जागवल्या असत्या का?

दहावी-बारावी; पुढले शिक्षण, इतके महाग झाले असते का?
बारावीनंतर इतक्या मोठ्या फी भरायला, पालक धावले असते का?

पदवी मिळाल्यावर कुणी नोकरीसाठी, तडफड केली असती का?
आणि नोकरी मिळून वरच्या जागेसाठी,  कुणी धडपड केली असती का?

कुणाचे लग्नाचे बघताना, चहा-पोहे झाले असते का?
लग्न ठरले म्हणून, कुणी पेढे वाटले असते का?

काही गोड बातमी लोकांनी,  कशाने साजरी केली असती?
आणि सगळ्या आपल्या दोस्तांनी, कशाकरता पार्टी केली असती ?

कुणाचे लग्न ठरले असते, तर काय नुसतेच अक्षता टाकून यायचे
आणि चींगुसपणा  म्हणाल, तर आहेर देऊन जेवताच जायचे?

जोरात पाऊस आला तर, त्याला काय मजा आला असता?
गरम गरम खेकडा भजी आणि चहाला, काय पर्याय असता?

चहा आणि कॉफीचा काय, रांगोळी म्हणून उपयोग झाला असता?
फुला ऐवजी फळांचा; देखाव्यासाठी, फळगुच्छ  झाला असता?

सवाष्णमेहुणअंगत पंगत, या सगळ्याचे काय झाले असते?
असेच सगळ्यांनी भेटायला, काय कारण मिळाले असते?

कुणाचा निरोप समारंभ;  कुणाचा वाढदिवस, कुणाची पगारवाढ, कशी साजरी केली असती?
नुसत्या कोरड्या टाळ्या आणि गप्पा मारून का वसुल केली असती?

हॉटेल आणि खानावळीच्या ठिकाणी काय सगळ्या जागा रिकाम्या असत्या?
तवा; उलतने; पातेली; भांडी, या शोध लागलेल्या वस्तू असत्या?

कुठल्याही सरकारचे, एक दडपण नक्की कमी झाले असते  
भाज्या; धान्याचे भाव वाढले, तरी कुणाचे डोके भडकले नसते

लोकांचे वाक्यप्रचार, पण थोडेफार  बदलले असते
"पोटावर नको पाठीवर मारा", असे कुणाला बोलावे लागले नसते 

लोकांनी पगारवाढीसाठी, नोकऱ्या बदलल्या असत्या का?
मुळात भूक नसताना कुणी, नोकऱ्या केल्याच असत्या का?

साला; भूक नसती तर, निवडणूक झाली असती?  
एकमेकावर आरोप-प्रत्यारोप, याची वेळच आली नसती

मिळकत कर भरणे आणि  भरल्यास, त्याची वसुली झालीच नसती
एखादी बँक जन्मालाच आली नसती,  तर लोकांनी कर्ज कशाला काढली असती?

शेतीदुकानेमॉल, पर्यटन सगळे काही झालेच नसते
भूक नसती तर नाटक, सिनेमे जन्माला आले असते?  

अहो मुळात कुणालाच. कसली पडली नसती`
शाळा; नोकरी; पैसा अडका. कसली गरजच लागली नसती

एक शंका अशी होती; भुकेवीना चवउद्दिष्टप्रगतीकला आणि संस्कृती आली असती?
भूकच नसती,  तर माणसाला काय किंमत राहिली असती?

लोक सगळे अस्ताव्यस्त, सगळी परिस्थिती जंगली असती
कशाला आपल्या पूर्वजांनी, गारगोटीवर गारगोटी घासली असती?

विचारांचे वादळ डोक्यात उठले होते, माझी बुद्धी धावत होती
असला काहीतरी विचार करायची, मला बुद्धी कशी झाली होती?

काय विचार करतोय कळेना, पुढचे विचार थांबेना
अमुक गोष्टीचे काय झाले असते?, हा विचार डोके सोडीना

असला काहीतरी भयानक विचार करून, माझी जाम सटकली होती
काय सांगू तुम्हाला, पोटात भुकेचीच आग लागली होती

© सचिन पुरुषोत्तम कुलकर्णी

LIKE Saarthbodh !!!