About Me

"सार्थबोध" साईटवर माझ्या कविता ,भावगीत ,निरुपण ,पोवाडा ,ओवी ,बंदिश ,मुक्तछंद ,लेख ,गवळण ,चारोळ्या आणि गझल तसेच मराठी आणि हिंदी भजन समाविष्ट केले आहेत.

Latest Posts

नवीन लिखाण:-



Thursday, June 9, 2011

लेख:- संस्कार.......

संस्कार.......

माणूस हा अनेक  गोष्टींनी बांधला गेला आहे, जोडला गेला आहे. त्यातसुद्धा त्याच्या आवडी निवडी, विचार, देवावरची श्रद्धा, आवडता देव, आवडता खेळ, जगण्याची पद्धत, जगण्याचे ध्येय  या काही तशा सध्या वाटणाऱ्या; ढोबळ पण; आज काल चर्चेच्या आणि महत्वाच्या  गोष्टी झाल्या आहेतयासारख्या इतर अनेक गोष्टी आहेत, परंतु या गोष्टींची चर्चा झाल्यास एखादा तो किंवा ती कशी आहे?; तिची/ त्याची विचार करायची पद्धत काय आहे हे पटकन समजून येते.

या सगळ्यात एक फार आढळ महत्वाची गोष्ट असते; ती म्हणजे संस्कार. संस्काराची व्याख्या करायला गेल्यास फार शाब्दिक ओढाताण होऊ शकते, कारण या शब्दाची व्याप्ती; एका वाक्यात करणे; हे एका असंस्कारित माणसावर संस्कार करण्याइतकेच अवघड आहे. अगदी माणसाच्या अस्तिवात येण्यापासून म्हणजे गर्भसंस्कार ते शेवटचा अंत्यसंस्कार इथपर्यंत आपण कळत-नकळत या संस्कारांच्या प्रभावाखाली असतो. माणूस लहानपणापासून वडिलधाऱ्या लोकांकडून संस्कार करून घेत असतो. त्याचे/तिचे बालपण, शालेय जीवन, तरुणपण, थोडे थोरलेपण ते चाळीशी पर्यंतची अवस्था, वृद्धावस्था हे सगळे वेगवेगळ्या पण कमी अधिक; काही ठराविक; सामाईक, संस्कारांनी घडवले गेलेले असतात.

कोणाही सामान्य माणसांचे संस्कार हे बऱ्याच अंशी सारखे असतात. जसे की आपण मोठ्या माणसांना आदरपूर्वक बोलावे, खाताना इकडे-तिकडे सांडू नये, अन्न वाया घालवू नये. मुक्या प्राण्याला मारू नये, झाडे तोडू नयेत, पैसे वाचवावेत, गरज नसताना खर्च करू नये, काटकसर करावी, लग्न झाले की पती/पत्नीशी जुळवून घ्यावे, चांगले मित्र जोडावेत; इत्यादी काही अगदी ढोबळ; पण महत्वाचे संस्कार असतात.

माणूस हा निरीक्षणातून सुद्धा स्वत:वर संस्कार करून घेत असतो; जसे की घरातील प्रत्येक तरुणाला थोरले लोक सांगतात अरे! गाडी हळू चालव, पण तेवढ्यापुरते हो म्हणून तो रस्त्यावर जोरातच गाडी चालवतो, कारण त्याला तो विचार तितकासा पटत नाही. पण रस्त्यात गाडी चालवताना चुकून तोल ढळला, जरा ताबा सुटला-गडबड झाली; किंवा एखादा अपघाताचा शोकविव्हळ प्रसंग पाहिला तर पटकन गाडीचा वेग कमी केला जातो, काळजात तो प्रसंग पाहून चर्रsssSS होते आणि घरचे बोलले ते बरोबर होते; राव! असे मनात म्हणत गाडी रुळावर येते. आता हाच विचार त्याला आधी पटलेला नसतो, पण एखादा प्रसंग माणसावर असा प्रभाव पडतो की तो त्याच्या मनात एक संस्कारच जणू करून जातो.

एखादा विचार हा मनाला पटला पाहिजे, जिथे काही विचार पटत नाहीत तिथे त्या विचारांचे संस्कारात रुपांतर होऊ शकत नाही; असे मला वाटते, कारण तो संस्कार तसाच न राहू देता त्याचे आयुष्यभर अवलंबन करून; पुढच्या पिढीला अनुभवाचे लोणचे लावून सांगायचा असतो.

संस्कार हा कुणी वयाने थोरल्या व्यक्तीने करावा असे नाही. तुमच्यापेक्षा वयाने लहान; अगर एखादी कर्तुत्वाने मोठी व्यक्ती काही संस्कार करू शकते; जसे की आजपर्यंत; कधी काही दान न केलेले काहीजण जेंव्हा शाळकरी मुले एखाद्या नैसर्गिक आपत्तीमुळे अडचणीत आलेल्या लोकांना मदत करतात; तेंव्हा मोठे लोकही हा प्रकार पाहून मदतीसाठी पुढे होतात, चिमुरड्यांनी केलेला हा एक संस्कारच म्हणावा लागेल, ज्यातून आपल्यातले थोडे काढून गरिबाला, अडचणीत असलेल्याला मदत करा हा संस्कार प्रकट होतो.

आपली एखादी जुनी वस्तू; आपण लहानपणापासून जपून ठेवलेली असते, एखादे पेन, खेळणे, जी पहिली वहिली वस्तू असते, पहिल्या पगारातील मोबाईल, गाडी; अगदी कितीही जुनी झाली; तरी बरेच जण बदलत नाहीत, कारण त्या वस्तूशी तुमची नकळत नाळ जोडलेली असते, कितीही अद्ययावत वस्तू आल्या तरी त्या आठवणींच्या संस्कारापायी; आपण ती जुनी वस्तू बदलत नाही.

माणसावर संस्कार होतो तसा एखाद्या प्रक्रियेवर देखील संस्कार होतो. आपण घरात जेवण करतो, आई-आजी-बहिण-बायको आपल्याला रुचकर जेवण करून वाढत असतात, स्वयंपाक करताना त्यांच्या मनात एकच विचार असतो की; हे अन्न चांगले शिजू दे, माझ्या घरातील लोकांची तब्येत उत्तम राहू दे, हा नकळत केलेला एक संस्कार असतो, माझी आजी स्वयंपाक करताना सतत देवाचे नाव घ्यायची ती म्हणायची; अरे हा अन्नावर केलेला संस्कार असतो! त्यामुळे अन्न शुद्ध आणि सात्विक होते आणि अन्न चांगले पचून शरीर आणि मुख्य म्हणजे त्यायोगे मन सुसंस्कारित राहते. आज-काल हा विचार कुणाला किती पटेल हा वेगळा प्रश्न आहे, पण उलट बाजू बघितली तर खानावळीत आपण बरेच पैसे खर्च करून खातो; चव मसालेदार असते; पण एक प्रकारची मानसिक तृप्ती सगळ्याच ठिकाणी होते असे नाही, कारण अन्न तयार करणाऱ्याने त्यावर फक्त "त्याचा फायदा व्हावा" हाच संस्कार केला नसेल कशावरून?. पण या सगळ्या गोष्टी ज्याच्या त्याने; वैयक्तिक विचार करून ठरवायच्या असतात.
   
वाईट व्यसन असू नये; असा संस्कार प्रत्येकावर लहानपणापासून केलेला असतो, मोठेपणी अशी वेळ येते की संस्कार आणि प्रसंग यांच्यात चढाओढ होते कधी प्रसंग जिंकतो तर कधी संस्कार. संस्काराला कधी इतका चांगला संस्कार केला असे काही मोजमाप नसते, तो एक विचार असतो, त्याचे पालन कुणी किती करायचे हे ज्याच्या त्याच्या व्यक्तिमत्वावर अवलंबून असते. आपण बऱ्याच वेळा ऐकतो की काय संस्कार केले; आई-बापाने काय माहित?. यात कुणाच्या आई-वडिलांचा दोष नसतो, आई-वडिलांप्रमाणे, काही प्रसंग, मित्र, नातेवाईक किंवा दुसरी कोणी जवळची व्यक्ती एखाद्या माणसाला घडवू शकते; बदलवू शकते. पण तो बदल; हा चांगला की वाईट? हे ज्याने त्याने त्याच्या बुद्धीप्रमाणे ठरवावे. ते ठरवताना सुद्धा तो इतर झालेल्या संस्कारांची मदत घेऊ शकतो.

आपण देवपूजा करताना; ज्याप्रमाणे भावभक्तीने परमेश्वराच्या चरणी सुगंधी फुल अर्पण करतो, त्याच पद्धतीने आपल्यावर झालेले संस्कार; हे मनात ठेवून त्यातील गर्भितार्थ लक्षात घेऊन त्या संस्कारांनी आयुष्याचे जतन करावे. जसे अर्पण केलेले फुल आणि आपली भक्ती एक अलौकिक सुगंध आणि निरव शांतता आपल्या मनास मिळवून देतात; त्याप्रमाणे संस्कारक्षम आयुष्य; हे आपल्याला सतत प्रगती पथावर वाट न चुकता; योग्य ध्येयापर्यंत पोचवू शकते.   

थोडक्यात; आपल्याला जे बारीक-सारीक शिकवले गेले आहे; त्याला आपण चांगले विचार किंवा एक जगायची पद्धत किंवा एका शब्दात संस्कार म्हणतो. फरक इतकाच की माणूस ज्यावेळेला स्वत:ला संस्कारापेक्षा मोठा समजू लागतो; तेंव्हा एक तर तो सुधारित- अधिक चांगला काही विचार करत असतो किंवा समाजाच्या विरोधामुळे दबून जाऊन; जुन्या विचारांना मूठमाती देऊन; इतर वाहवत गेलेल्या लोकांप्रमाणे वागणार असतो, किंवा नकळत स्वत:ला फसवणार असतो. मला वाटते इतर कुणाला; किती फसवले? यापेक्षा माणूस जेंव्हा स्वत:ला फसवतो; तेंव्हा तो खरा एकाकी पडलेला असतो. कारण आयुष्यात अनेक प्रसंगी जेंव्हा काही गोष्टींची उत्तरे मिळत नाहीत, तेंव्हा तुमचे विवेकी मन तुम्हाला त्यातून मार्ग काढायला मदत करत असते, पण स्वत:ला फसवलेल्या माणसाला कुठेतरी एक कुणकुण असते; ज्यायोगे त्याला अशा प्रसंगातून तरून जाणे अवघड पडू शकते.   

संस्कार पद्धती किंवा अमुक एक संस्कार चांगला; अमुक एक फालतू पद्धत आहे; हा विचार करण्यापेक्षा, सामान्य दृष्टीकोन ठेवून; एखादा विचार कसा चांगला आहे?, तो पाळला तर काही वाईट तर होत नाही ना?, किंवा कुणाचे दुसऱ्याचे काही भले होऊ शकते का? या सगळ्याची जर सकारात्मक उत्तरे मिळत असतील, तर तो संस्कार म्हणजे जगण्यातला एक विचार मानायला काय हरकत आहे?

संस्कारांच्या रूपाने; जर आजकालच्या धकाधकीच्या आणि जीवघेण्या जगायच्या पद्धतीत; माणूस काही चांगल्या गोष्टींना बांधला जात असेल; तर असले संस्कार; स्वत:च्या बुद्धीच्या कसोटीवर पडताळून त्यांचे आचरण करण्यात काय गैर आहे?      

खरे पहिले तर "संस्कार" आणि त्याच्या व्याप्तीबद्दल; मी फारच तोडके मोडके लिहिले आहे, लिहिण्यासारखे बरेच आहे. तुमचे सुद्धा अनुभव बरेच असणार आहेत. पण संस्कार म्हणजे नक्की काय हे आपल्या सगळ्यांना  समजेल अशा भाषेत मांडण्याचा एक प्रयत्न आहे. मला अशा आहे आपल्याला हा प्रयत्न बरा वाटला असेल. 

© सचिन पुरुषोत्तम कुलकर्णी

No comments:

Post a Comment

LIKE Saarthbodh !!!