About Me

"सार्थबोध" साईटवर माझ्या कविता ,भावगीत ,निरुपण ,पोवाडा ,ओवी ,बंदिश ,मुक्तछंद ,लेख ,गवळण ,चारोळ्या आणि गझल तसेच मराठी आणि हिंदी भजन समाविष्ट केले आहेत.

Latest Posts

नवीन लिखाण:-



Saturday, July 30, 2011

भावगीत - मी तुला पाहताना, असेच हासताना

मी तुला पाहताना, असेच हासताना

मनातले तराणे, चेहऱ्यावरी उमटताना


तुझ्या विचारात मी, सदेह गुंफताना

विसरलो भान सारे, तुझे हास्य स्मरताना


दिसतो एकटा फिरता, असेच भरकटताना

सावलीसम तू जोडीस, ते प्रेम विस्तारताना


विस्मरलो सारे, न फुलती इतर भावना

देहास आचार नुरला, तुझा विरह साहताना


आधीचे माझे प्रयास, चेहरा आरशात खुलवताना

तो आरसाही भासे पृष्ठ, चेहरा माझा न्याहाळताना


पाहिले आरशास त्या, असेच भुरळताना

चेहरा माझाच असला, तरी तुलाच रेखाटताना


ऐकिले आहे मी प्रेमात, बहुतांस बहरताना

लोक बोलतात काहीबाही, आजकाल मला वर्णिताना


श्रावण बरसोनी आहे, हि धरा फुलवताना

मी चातक बनून आहे, तुझी वाट पाहताना


© सचिन पु. कुलकर्णी
sachin.kulkarni78@gmail.com

Tuesday, July 26, 2011

भावगीत - मी तिला असेच पाहिलेले.......

पेमाच्या  व्याख्या  वगैरे  फार  किचकट  विषय  आहे आणि त्यात पडण्यापेक्षा; जे प्रेमात पडतात; त्यांची दुनिया; त्यांचा ढंग, त्यांचे ते दिवस याची धुंदी काही न्यारीच असते.
असेच कुणी, कुणाला; कुठेतरी; एकदा पाहिलेले असते, काहीतरी होते आणि न बोलता एक नाते जुळायला सुरुवात होते.
कुणी तो/ती बोलायला घाबरत असतात, किंवा एखादा तो/ती; त्याच्या/तिच्या बोलण्याची वाट पाहत असतात.
अशाच एका कोणाची; कुणाला तरी पाहून; तरीही अजून व्यक्त न केलेली भावना..........
प्रेमावर निष्ठा ठेवून सगळ्या जगाला झुगारून देऊन; जे लोक पुढे आयुष्यात; सतत आपल्या जोडीदाराबरोबर राहतात; आणि यशस्वी संसार करतात त्यांना माझा सलाम.
कविता खास माझ्या भावाकरिता समर्पित.
-------------------------------------------------------------------------------------------------------------
मी तिला, असेच पाहिलेले 
छबीस त्या, मनी कोरलेले

क्षण माझेच मी, हळुवार चोरलेले
फुरसतीत ते, उलगडुनी पाहिलेले

कटाक्ष तुझा, शितलेप चंदनाचा
पाहणे जसे, हाय SS... खेळ श्रावणाचा

पाऊले पडून, शिडकाव चांदण्यांचा
जीवघेणा प्रकार, वेध काळजाचा

आठवण तुझी, हृदयात जागलेली
झंकारते अजून, वीणा तू छेडलेली

नयनात तुझी, आकृती तोललेली
पुन्हा वळून, नजरेत चोरलेली

दिस गेले अनेक, युग कितीक भासे
तुला एकवार, आस पाहण्याची असे

ठाऊक ना रात, आज जाईल कैसी
मृगजळ मृगास, तिष्ठवी बात तैसी

झाले जरी, उद्या तुला पहाणे
बोलेन की, तैसेच मनी रहाणे

केले कितीक, बोलण्याचे मी बहाणे
विस्मरतो; राहती, मनात प्रेम तराणे


© सचिन पु. कुलकर्णी
sachin.kulkarni78@gmail.com

निरुपण - मानसपूजा ....... एक अनुभव

पूजापाठ रीतीभाती, प्रार्थना की आरती  
देवास पूजण्याला असले, किती प्रकार असती

काय माझी अवस्था, काय माझी परिस्थिती
बाहेरून भासेल काही, माझे मलाच माहिती

असतो देव पाठीशी सदा, मग कशास हव्यात आरती
भाव मनात असेल जर, त्या व्यर्थ साऱ्या चालीरीती

कसला देव कसला अवतार, काय असते दगडी मूर्ती
आपल्याच देवाला आपण, दिली मनात एक आकृती

जगणे मुश्कील झाले जिथे, कुठली धन संपत्ती
रोजचे दिवस ढकलण्या, जनता सारी कष्टती

भरडून गेला माणूस, असा नाही जीवास शांती
मागतो विश्राम पळभर, करण्या साधी देवभक्ती

थाळी-ताट; अत्तर; धूप, सर्व कर्मकांड असती
फुले; रांगोळ्या- सडे, मनुष्येच निर्मिली असती

शक्य नाही मजला असले, कोठून करू हि निर्मिती
देवावरी आहे प्रीती पण, भाव मनीच राहू पाहती

असेल देव मनातच तर, मनातच करावी  भावभक्ती
नयन मिटता मूर्ती दिसली, हि मानस पूजेची व्याप्ती

सोडिले सारे; धरिला  देव, मनीच लाखो दिवे-वाती
लाखो फुले; रोषणाई सारी, सुगंध कितीक दरवळती

पंचपक्वान्न सुग्रास जेवण, तूप घालतो त्यावरती
मनातले सर्व मनीच अर्पिले, मनीच माझी गुरुमूर्ती

माझ्या मनाचा मी राजा, मोठे धन; मी प्रजापती
माझ्या मनात येईल ते करण्या, कोण मला अडविती

उत्सव; यात्रा; मूर्तीपूजा, खरेच भव्य भक्तीरस ओतती
शक्य नसते हे सारे तेंव्हा, मानसपूजा हीच सारथी

शक्य नाही सांग पूजा, मानसपूजा उपाय परमार्थी  
करून पाहिलं जो नित्य एकदा, त्यालाच येईल प्रचीती


© सचिन पु. कुलकर्णी  

Wednesday, July 13, 2011

ll भजन ll - आळवितो गुरुनाथा आता.......

आळवितो गुरुनाथा आता.......

आळवितो तुजला मी, आता बोलवितो गुरुदेवा
किती काळ सोसला, तुज भेटीविना, ... आता धावसी मजकरिता.. तू त्राता.... आळवितो गुरुनाथा आता  ll धृ ll
  
पाहिली वाट मी, मळभ जायाची
पाहिली वाट मी, दिवस बदलाची
किती केले मी मुहूर्त सायास, किती केले मी अन्य प्रयास
ना सरतील दिस हे आता, धावसी त्वरिता ......मजकरिता तू आता ....आळवितो गुरुनाथा... मम त्राता..... ll १ ll

नाही कमविले, पुण्य जगामधी
नाही जमविले, माया अन् निधी
कुणी ना येई आता, मज तारण्याला
मी हतबल वाट पाहे, जीवन सरण्याला
तू घेई वेग आता, ना दुजा राही उपाय कोणता ....... आता ....आळवितो गुरुनाथा... मम त्राता.....  ll २ ll

पाय जखडले पूर्ण, ऐरावतासम
शरीरी ना त्राण ना, जगी उरे मान
संकट भासे जैसी, मगर भयाण  
काय मानू मी, याचे अनुमान

दुजा न मार्ग आता, पदी तुझ्या शरण 
करशील का तू, त्रास हे हरण?
व्याकुळ जीव हा; अति हैराण ....... तू पालक मी; बाळ जसा श्रावण  
नको अन्य मार्ग वृथा.... आता.................. आळवितो गुरुनाथा आता... मम त्राता..... ll ३ ll

नजर जिथे धूसर, कैची दिव्यदृष्टी
खितपत राहिलो, व्यापून आज कष्टी
करशील केंव्हा, तुझी कृपावृष्टी
का ऐकत आलो, मी फुक्या तुझ्या गोष्टी
ढळो ना दे विश्वास माझा, पाहू दे तुझा अवतार.. आता.. आळवितो गुरुनाथा आता... मम त्राता..... ll ४ ll

मान्य मज हे माझे, असतील भोग
शरीरी जडले, जैसे बहु रोग 
पुराण सांगती, तव कृपाकोश
नको घेऊ रे, मम वृथा दोष
मिटू दे सर्व व्यथा आता .. आळवितो गुरुनाथा आता... मम त्राता..... ll ५ ll

© सचिन पु. कुलकर्णी 
sachin.kulkarni78@gmail.com

Friday, July 8, 2011

मनन/चिंतन - एका चिमुकलीची मोठी व्यथा.......

किलबिल किलबिल, चिवचिव चिवचिव बागेत एका गर्दी रे
संध्याकाळी बागेत जमती, आजुबाजूचे चिमुकले तारे 

अश्या एका घरात, होती एक चिमुकली
नुकतेच आज-काल, थोडे बोलायलाही लागली
आई-बाब्बा म्हणायला, नुकतीच होती शिकली
दोघेही नोकरी करतात, घरी एकटे राहायला शिकली

एक मावशी होती, त्यांच्या घरी कामाला
तिचे प्रेम मर्यादित, महिना तीन-चार हजार कमवायला
पैसा आणि करिअरमुळे, आई-बाप धावतात
छोटीलाच माहिती तिचे; तास अन् दिवस, कसे जातात

लेकीच्या प्रेमाचा उमाळा कधीतरी, आई थांबते घरी
हट्ट; प्रेम करायला मिळतोय, म्हणून छोटी रडते भारी
उगाच थांबले म्हणते आई, अवघड आहे सगळे
व्याप संसाराचा केलाय, मावशीविना  नाही खरे

छोटी करते विचार, आई अशी का वागते?
जवळ नसता आई, आता मावशीच बरी वाटते
रोज संध्याकाळी, छोटीची बागेत फेरी
सजवलेली झक्कासपैकी, ढकलगाडी भारी

आईने कुशीत घेतलेले, तिने बाळ एक पाहिले
खूप भारी खेळणी बघून, होत नाही तसे झाले
लक्षात आला फरक तिच्या , नजर झाली धूसर
आवंढा गिळून गपकन् , दाटून आला गहिवर  

पाहिले तिने एकदा, आपल्या झगमगीत गाडीकडे
फिरली परत नजर, कडेवरच्या त्या बाळाकडे
पोर बिचारी निरागस ती, डोळ्यात होता आज हेवा
म्हणत होती आपल्यालाही, कोणी जवळचा हवा

गाडी तिची ढकलणारे , बारीक सुरकुतलेले हात
करून काबाडकष्ट, त्यांची नशीबे त्यांच्याच हातात
छोटीला हाती घेता, गरिबी-श्रीमंती एका ताटात
छान सुंदर द्राक्षे जशी, बांधली वडाच्या पानात

आली मावशी दुसऱ्या दिवशी, आई-बाबा गेले बाहेर
आठवून बाळ बागेतले, चिमुकल्या डोळ्यांना ओला आहेर
गुंतली मावशी कामात, रे बाळा करत
एकटी पडली छोटी, नशीब आपलेच कुरवाळत
काळीज तुटले तीळतीळ, छोट्या मनात मोठे वादळ
रोजचीच जखम ती, रोजचे दुखणे आणि भळभळ        

एकटेपणाची सवय इतकी, तिला आता झाली
ओले व्हायला आजकाल, डोळ्यांना सवड नाही राहिली
बाहुलीकडे पाहता छोटीला, एकदम लक्षात आले
मावशी आहे आपल्याला, हिला कुणीच नाही राहिले

अंगात तिच्या नकळत, एक थोरलेपण आले
बाहुलीला आपल्या, तिने  पटकन जवळ धरले
ललू नको बाला, आता मी इथे आहे
कुणी त्लास दिला सांग, त्याला फत्त्ता  देऊन आले

तिच्या कोवळ्या वयात तिला, परिस्थितीने शिकवले
जगात कुणी कुणाचे नसते, हे जरा जास्तच लवकर कळले
आता फरक तिला पडत नव्हता, आई-बाबा असले काय नसले
इतके रडून; देव बाप्पा गप्प कसा, असे तर नसेल वाटले?

असे काही घरात सगळे , औपचारिक झाले
इतके करून सगळे, त्या आई-बापांनी काय कमावले?
पैसा; नोकरी; भविष्य, घर ह्या आहेत वेगळ्या दिशा
जपल्या पाहिजे सांभाळून, आपल्या कुटुंबाच्या आशा

© सचिन पुरुषोत्तम कुलकर्णी

Wednesday, July 6, 2011

अभय ..........नावाप्रमाणे

आपण सगळे रोजच्या नोकरीच्या तणावात  राहत असतोकित्येकदा वैतागून सगळे सोडून दुसरेमनाला पटेल-आवडेल असे करायचा विचार डोक्यात येतोज्यात मन रमते ते करावेसे वाटतेचार पैसे कमी मिळाले तरी चालेल; घेऊ जमवून इतकी पण मनाची तयारी होते; पण धाडस होत नाहीहोते फक्त चर्चा आणि विचार.
आपण सगळे घरकर्ज आणि इतर चक्रात अडकले आहोतबाहेर पडता येत नाही. धावायचे थांबलो तर
मागे लागलेले  व्याप पाठीवर येऊन आदळतील; म्हणून रोज धावतच राहतोसतत धावणे सहन होत नाहीपुन्हा कधीतरी मित्रमैत्रिणींबरोबर चर्चा "कि आता बस झालेसोडावे सगळे". पण नेमके तेच होत नाही. आपण दुसरा विचार आणि त्याची तयारी करतच नाही. प्रत्येक उद्विग्न अवस्थेत दुसरे काही मिळावे अशी प्रयत्नावीण  नुसती आशा आणि एक बालहट्ट  मनातल्या मनात करत राहतो.


मागच्या वर्षी; माझ्या एका मित्राने "अभयने"  हा पराक्रम केलामोठी हुद्य्याची जागा आणि पगार सोडून हे दिव्य केलेत्या दिवशीचा माझा जसाच्या तसा अनुभव आणि त्यावेळेला त्याच्याबद्दल
काहीबाही खरडलेली हि कविता.      

 अभय ..........नावाप्रमाणे 

रोजच्यासारखा उठलो ,उठायची गडबड झाली
आवराआवर केली, बस पकडायची धडपड केली
कामावर आलो, सिस्टम चालू केली
नाश्त्याला चाललो होतो, एवढ्यात फोनवर रिंग आली .

कानावर विश्वास बसेनातू पेपर टाकला?
स्वत:वर विश्वास ठेवून, स्वत:चा उद्योग चालू केला?
बातमी ऐकून आनंदच झाला, साल्या तू तर कमालच केली
आम्ही कंपनीला नुसती नावे ठेवतो, तू तर कंपनीचीच काशी केली.

आम्ही रोज असेच वागणार, असेच जगणार
पाच दिवस कंपनीची हमाली, इमाने-इतबारे करणार
पैसे मिळत असून, त्यात सुखी नसणार
दुसरी बरी वाटते म्हणून, आहे तिला नावे ठेवणार

आम्ही रोज, असाच दिवस ढकलणार
संध्याकाळी कंपनीला, शिव्या देत घरी जाणार
रोज शुक्रवार कधी येतो, याची वाट पाहणार
आणि अप्रेजल कधी होते, याकडे डोळे लावणार

अनेक शुक्रवार, येणार जाणार
अप्रेजल पण होणार, मनासारखे काही नाही मिळणार
दिलेले गाजर खात राहणार, झालेला पचका पचवत राहणार
पॉलिसी आणि मॅनेजरला बोलत, स्वीचच्या ताज्या गप्पा मारत राहणार

एक स्वीच पण होणार, नव्याचे नऊ दिवस जाणार
नवीन शाळेला पण, अशाच शिव्या देणार, आणि पुन्हा त्याच चक्रात अडकणार
हे सगळे दुकान बंद करावे, असे वाटणार, पण धमक नाही होणार
साला, आम्ही नुसताच विचार करणार

सगळ्या मित्रात, तूच हिम्मत दाखवली
आम्ही ज्याचा फक्त विचार करतो, त्याची तू कृती केली
अवघडच वाट तशी, पण ती तू जवळ केली
खरच अभ्या कंपनी सोडून, तू मोठी गोष्ट केली

निर्णय घेतला त्याला, जोड आहे मागच्या २/३ वर्षाची
फालतू गोष्टी सोडून, सोसलेल्या कष्टाची
तुला कदाचित वाटत पण असेल, आपण बरोबर केले का नक्की
पण तू नक्कीच यशस्वी होणार, हि गोष्ट माझ्या मनी आहे पक्की

त्यामुळे, परत नको जुना विचार
आता करायचा आहे, पुढचा कारभार
आम्ही आहेच सदैव, तुझ्या मदतीला तयार
तू फक्त लढ, तुला अडचणी आल्या तर आम्ही आहे; घ्यायला त्यांचा समाचार  

खरच अभ्या भावा, कमालच केली
तू तर कंपनीचीच काशी केली       

© सचिन पुरुषोत्तम कुलकर्णी

LIKE Saarthbodh !!!