About Me

"सार्थबोध" साईटवर माझ्या कविता ,भावगीत ,निरुपण ,पोवाडा ,ओवी ,बंदिश ,मुक्तछंद ,लेख ,गवळण ,चारोळ्या आणि गझल तसेच मराठी आणि हिंदी भजन समाविष्ट केले आहेत.

Latest Posts

नवीन लिखाण:-



Monday, August 29, 2011

भजन - जाणे सर्व गुरुनाथ

जाणे सर्व गुरुनाथ 
 
देवरूप गुरुनाथ 
संतरूप गुरुनाथ 
योग्यमार्ग गुरुनाथ 
योग्यवेळ गुरुनाथ 
 
पापपुण्य गुरुनाथ 
कर्मधर्म गुरुनाथ 
प्रारब्धभोग गुरुनाथ 
जाणे सर्व गुरुनाथ
 
मोक्ष मुक्ती गुरुनाथ
ज्ञानदाता गुरुनाथ
विवेकबुद्धी गुरुनाथ
चित्तशांती गुरुनाथ
 
संकटहरण गुरुनाथ
मार्गदर्शक गुरुनाथ
प्रमादक्षमा गुरुनाथ
योग्यतत्व गुरुनाथ
 
विदेही जाण गुरुनाथ
पुण्यराशी गुरुनाथ
ब्रह्मांडनायक गुरुनाथ
कृपासिंधू गुरुनाथ
 
तात जैसा गुरुनाथ
ममताही गुरुनाथ
पांथस्थ मित्र गुरुनाथ
प्रभूचरण गुरुनाथ
 
धाव पाव गुरुनाथ
वाट पाहे मी गुरुनाथ
आतुरला जीव गुरुनाथ
आळवितो गुरुनाथ
 
© सचिन पु. कुलकर्णी

Wednesday, August 24, 2011

फटका - उधार आहेस घेतला जन्म, सोडशील एकदा या देहाला


गीत - कस्स फुलवावं.......प्रेम अपुन दोघांनी फुलवावं

मराठी चित्रपट सृष्टीतला हुकुमी एक्का, मराठी चित्रपट सृष्टीची चाल मंदावली असताना मरगळ झटकून थेट अवकाशाला यशाची गवसणी घालणारा, 
एकप्रकारे यशाची दादागिरीच करणाऱ्या  शाहीर दादा कोंडके (कृष्णा)  यांचा गोकुळाष्टमी तिथीदिवशी जन्म झाला होता. नुकत्याच झालेल्या गोकुळाष्टमिनिमित्त  त्यांना माझ्याकडून हे गाणे एक विनम्र आदरांजली.
लहान तोंडी मोठा घास- दादांच्या शैलीत लिहायचा प्रयत्न केला आहे, गाणे बरे झाले तर दादांचा आशीर्वाद आणि सपशेल काही चुकले तर माझ्या तोकड्या बुद्धीप्रमाणे लिहिले असे समजून माफी असावी.  
---------------------------------------------------------------
माझ्या मनात तू, चांदणं फुलवावं 
तुझ्या हृदयात मी, जीवाला भुलवाव
कस्स अपुन, दोघांनी प्रेम फुलवाव
कुठ मिळतोय का, भेटायला थोडा वाव
कस्स फुलवावं.......प्रेम अपुन दोघांनी फुलवाव
 
तुला पाहून, माझ्या काळजान सोडलाय ठाव
अस्सा घातलायं, तुझ्या नजरेन हृदयात घाव
तू लावशील का, तुझ्या नावापुढ माझ नाव  
मग जमवुया, दोघ लग्नाचा झक्कास डाव
लगीन कराव्वं.......आहा.......कस्स फुलवावं.......प्रेम अपुन दोघांनी फुलवाव
 
काय सुधरना, तुला कुठ  कुठं फिरवाव
अस्स जोडीन, बाजाराला बी न्याव
कस्स हृदयात, गोंदून तुला बसवावं
डोळ मीट्टून, सप्न तसच जपून ठीव्वाव
सप्न खुलवाव.......कस्स फुलवावं.......प्रेम अपुन दोघांनी फुलवाव
 
तुल्ला हाताच्या, झोपाळ्यामधी झुलवाव
तुझ रूप तू,  ऐन्यामधी ग खुलवाव
घालून हातात हात, बागेमंदी बसाव
तुझ्या वेणीत, गुलाब फुल माळाव
अस्सं फिर्राव.......कस्स फुलवावं.......प्रेम अपुन दोघांनी फुलवाव
 
सुख्खी संसारी या, गोडीन दोन घास खाव
एक तू; एक मी, मला तुला भरवाव
मन मिसळावं, जस्सं दुधात केशर पडाव
संभूपार्वती, रामशितावानी अपुन राहावं
अस्सं राहावं.......कस्स फुलवावं.......प्रेम अपुन दोघांनी फुलवाव
 
© सचिन पु. कुलकर्णी
 

Friday, August 19, 2011

जागरण - जागा हो रे माणसा , तू जागा हो रे माणसा

जागा हो रे माणसा, तू जागा हो रे माणसा
कशापायी रडतो सदा, नशिबाला कोसतसा

ज्ञानदान बुद्धी न देता, प्राणी; पक्षी समाधानी
किरकोळ संकटाला माणूस, नशिबाला कारण मानी

ईश्वराने केली सृष्टी, प्राणी पक्षी निर्मिले
काय सांग मेख असावी, माणसाला बी बनविले

कष्टी होता बिचारे प्राणी, ते फक्त ओरडू शकती
वाचा-मेंदू दिला जरी, माणूस विचार करी उरपाटी

बिना हात पाय पक्षी, घरटे सुबक बांधती
हात; पाय असुनिया माणसे, संकटाला घाबरती

पडो किती न थकता, मुंगी चढू पाहे भिंत
भविष्य कसे घडेल अपुले, माणसाच्या मनी खंत

नजर करा कुत्र्यावारी, मुका परी लई ईमानी
बेईमानीच्या चढवी माणूस, रोज नव्या कमानी

निसर्ग नियम पाळती प्राणी, असती जरी बेजुबान
सारे नियम धाब्यावारती, माणसाची जात बदनाम

वरुनी पाहता धरतीस, देवही झाला असेल मूक
कशी अशी बुद्धी झाली, माणूस बनविला हीच चूक

© सचिन पु. कुलकर्णी
sachin.kulkarni78@gmail.com

Thursday, August 18, 2011

कविता - पळभर रिकामा असताना, मी कोणामध्ये नसताना

पळभर रिकामा असताना, मी कोणामध्ये नसताना
पाण्यात पडावा खडा तसा, मन माझे आज ढवळताना

उगाच का मी विचार करतो, विषय तसाही नसताना
आत्ता देखील शाळेत जातो, घड्याळात अकरा वाजताना
 
बाकावरचे मित्र आठवती, अन् सुट्टी मधले खेळ
आज असा का कुठे जमेना, कोणाचाही मेळ
 
आठवती सुट्टीच्या गमती, भावंडे सारी जमती
आज असे का उदास वाटे, कोणी ना अवतीभवती
 
गावाकडची मजा आगळी, होती आपुलकीने फुलली
अनेक राहती सभोवती, परी काळजातली जागा नाही भरली
 
पूर्वी एकदा साद देता, जमती सारे मित्र
आजकालचे जरा अजबच आहे, जगण्याचे हे सूत्र
 
परत फिरू कि जुळवून आणू, जुने दिस मी कैसे
सगळीकडे एकच ध्येय, बस.......वस्तू आणि पैसे
 
माहित नाही मी काय गमवले, आणि काय कमवले
बरेच कमवूनी ठेविले, परी कुठेतरी काही चुकले
 
असा काय मी विचार करतो, आज रिकामा असताना
कोणास पडत असतील प्रश्न असले, काही कारण नसताना
 
© सचिन पु. कुलकर्णी 

Tuesday, August 16, 2011

कविता - तरी चंद्र माझा का डागाळलेला

तरी चंद्र माझा का डागाळलेला

जगी लोक, सारे आश्वस्तलेले
मला माझे काही,  अजुनी  उमगलेले

अशी कोजागिरी, लख्ख उजाळलेली
तरी चंद्र माझा, का डागाळलेला

जगी सूर्य, अवकाशी झळाळलेला
मनी सूर्य माझा, का झाकोळलेला

वसंतातूनी  पुष्प,  लता बहरल्या
मनी अंकुर आशेचा, अजुनी कोमेजलेला

जगाच्या मनीषा, पुऱ्या  पूर्णलेल्या
पवन वेधी लक्ष्य, हलवूनी झोळीस माझ्या

पंगती मंडळी, सुग्रास तृप्तलेली
उदरी माझ्या अजुनी, आग का पेटलेली

किती एक लोकांस, तो देव पावलेला
मी असा; मला न साधे, अस्तित्व दावलेला

जनांची भक्ती, लख्ख पैश्यात न्हाली
दिव्याचा यत्न माझा, परी वात शांत झाली

© सचिन पुकुलकर्णी  

LIKE Saarthbodh !!!