About Me

"सार्थबोध" साईटवर माझ्या कविता ,भावगीत ,निरुपण ,पोवाडा ,ओवी ,बंदिश ,मुक्तछंद ,लेख ,गवळण ,चारोळ्या आणि गझल तसेच मराठी आणि हिंदी भजन समाविष्ट केले आहेत.

Latest Posts

नवीन लिखाण:-



Wednesday, February 29, 2012

लेख - संवेदना

रोजच्याप्रमाणे कामावरून घरी जात होतो, दुकानातून काही घेण्याकरिता थांबलो, पुन्हा गाडी चालवत निघणार; तेंव्हा 
रस्त्यात कडेला एक कुत्रा विव्हळताना दिसला, बहुदा पायावरून गाडी गेली असावी, लोक पहात होते, मला फार वाईट 
वाटले, त्याला काही बिस्किटे टाकली. गडबड नेहमीची पाचवीला पुजलेली, घरी गेलो. काही केल्या तडफडणारा कुत्रा 
डोळ्यासमोरून जाईना. आवरून झोपायला गेलो, पुन्हा तेच विचार! काय वेदना होत असतील त्याला?, त्याचे सोबती? 
ते तरी काय मदत करणार? त्याचे खायचे काय? मला असले फार विचित्र प्रश्न पडू लागले, उत्तरे मिळत नव्हती मी 
कूस बदलून काही फरक पडत नव्हता. दुसऱ्या दिवशी कामावर गेलो, परत येताना मुद्दाम पाहिले, कुत्रा तिथे नव्हता, 
उतरून दुकानदाराला विचारले तर "अहो गेले असेल इकडे तिकडे, कुणाला टाईम आहे बघाय" असे उत्तर आले. त्याच्या 
नजरेत बहुदा मी फार रिकामटेकडा माणूस आहे असा भाव दिसला. 
www.saarthbodh.com
विचार केला; खरेच माणूस म्हणून आपण इतके संवेदनाहीन झालो आहोत काय? रामेश्वराला अभिषेक करायचा सोडून 
आणलेले पाणी तहानलेल्या गाढवाला पाजणारे श्रेष्ठ संत एकनाथ महाराज आपण खूप वेळा ऐकले आहेत. हि फक्त एक 
गोष्ट म्हणून ऐकून सोडायची का?, हा काळाचा महिमा म्हणावा कि लोकांची निरीच्छा?. माणूस फार वैयक्तिक झाला आहे 
का? अगदी रोजचे तेच तेच काम, वर्षानुवर्षे करणे, कुठे काही समस्या, अपघात, वाईट गोष्ट झाली तर फक्त, हळहळ 
व्यक्त करणे इतक्या पुरतीच माणुसकी शिल्लक राहिली आहे काय? 

एकदा आमच्या कंपनीच्या बाहेर, उंच काचेच्या भिंतीला धडकून एक छोटा पक्षी पडला होता, वाऱ्याने उडत येऊन तो 
आदळला असावा, त्याला धड उडता येत नव्हते,संध्याकाळ झाली होती, त्या पक्षाच्या घरट्यात त्याचे जवळचे वाट 
पाहत असतील का? त्याला पिल्ले असतील तर ती काय विचार करत असतील, आज उशीर का झाला?, किती वेळ 
लागणार, भुकेने व्याकूळ झाली असतील का? वाट बघून कोमेजून बिचारी सुक्या डोळ्याने झोपून तर गेली नसतील?, 
या पक्षाचा जोडीदार असेल तर तो काय विचार करत असेल?, काय माहित उद्या बरा होऊन सकाळी तो पक्षी पुन्हा 
घरट्याकडे जाईल का नाही? त्या पिलांना मदत करावी असा विचार आला डोक्यात, पण शक्य नाही, कुठला पक्षी?, 
कुठले घरटे? काय माहित. त्याची थोडी आड बाजूला पाणी प्यायची सोय केली आणि कुणाचा धक्का लागणार नाही अशा 
ठिकाणी ठेवले. दुसऱ्या दिवशी सकाळी तो पक्षी तिथे नव्हता…उडून गेला असावा बहुतेक परत घरट्याकडे... अशी भाबडी 
आशा मनात ठेवली आणि रहाटगाडगे चालू ठेवले. www.saarthbodh.com
www.saarthbodh.com
पूर्वी मला आठवते आमच्या वाड्यातून कोणी घर/खोली सोडून चालला कि एक अवकळा असायची वाड्यावर, मग ते 
देणे-घेणे, अश्रुंचे ओघळणे आणि समोरच्याचा वाटणारा विरह, आहे का हे सारे आज-काल? आपण मोबाईल द्वारे जोडले 
गेलो आहोत, पण मनाने/ भावनेने कुठे निखळले गेलो आहोत का?, कि पुन्हा "हे तर होतच राहणार...वाईट काय 
वाटायचे? आहे ना मोबाईल! करायचा फोन" असले सल्ले मिळणार? आपल्याला जरा आनंद झाला, क्रिकेट विश्वचषक 
जिंकला कि रस्त्यावर येऊन साजरा करतो, मग हि अशी दुसऱ्याबद्दलची संवेदना का बरे दडवून ठेवायची? दुसऱ्याकरिता 
काही वाटून डोळ्यात पाणी येणे, अथवा त्याला मदत करणे हे जर विचित्र किंवा गरजशून्य वाटत असेल तर आपण 
मानवी जीवनाच्या एका महत्वाच्या प्रक्रियेला हळू हळू विसरत, फिकट करत चाललो आहोत काय?

असल्या गोष्टींची चिंता/ विचार म्हणजे खरेच फालतुचा वेळ घालवणे आहे का? जे वेळ घालवतात त्या लोकांना या 
व्यवहारी जगात काही स्थान आहे का? कि ते फक्त चेष्टा अथवा दुर्लक्षेचा विषय होतात. मला वाटते असा वेगळा विचार 
असणारी मने आहेत त्यामुळे कुठे तरी संवेदना जिवंत आहे. आपल्या इमारतीतला/ गल्लीतला कुत्रा चुकून दुसऱ्या 
गल्लीत गेला आणि त्याच्यावर तिथल्या कुत्र्यांनी हल्ला चढवला तर बिचारे कुत्रे गांगरून जाते, अशा वेळेला तुम्ही तिथे 
आहात आणि तुम्ही त्या बाकी कुत्र्यांना हटकले नाहीतर तुमच्यात संवेदना नाही कि तुम्हाला असल्या फालतू गोष्टीत लक्ष 
द्यायला वेळ नाही? काय म्हणावे?

वर्तमानपत्रात किती जाहिराती येतात, शस्त्रक्रियेसाठी मदत हवी आहे,, दहावी / बारावी नंतरच्या शिक्षणाला मदत हवी 
आहे, सत्यता पडताळून पाहणे योग्य आहे, खूप जणांना वाटते देखील "अरे..रे..रे बघा पैशाअभावी किती त्रास होतो 
या लोकांना", पण आपण कधी उठून मदत करायला गेलो का? कि फक्त "अरे..रे" करण्यापुरती संवेदना आपल्यात 
शिल्लक आहे? काही हजार रुपये दिले तरच मदत होते असे नाही, आपण जे शक्य आहे ते देऊन आपला भाव प्रगट 
करावा, न जाणो आपले बघून कोणी इतर लोक सुद्धा मदत करतील. 
www.saarthbodh.com
पूर्वी दूरदर्शनवर काही मालिका/सिनेमे लागायचे, त्यात काही दु:खद प्रसंग असला कि माझ्या आजीच्या- आईच्या 
डोळ्यात पाणी यायचे, मला फार कळत नसे, पण वाटायचे कि हे का रडतात?, पण आज लक्षात येते हि माणसे 
माणुसकीने तुडुंब भरली होती, निसर्गाने दिलेली वेदना आणि ती जाणून घेण्याची संवेदना त्यांच्याकडे खूप होती, जी 
आज-कालच्या जगात फार कमी पाहायला मिळते. कित्येकदा मी पंढरीची वारी हा चित्रपट पहिला आहे, त्यात पायी 
वारीमध्ये एक मुलगा त्या नायिकेच्या बरोबर वारीत सामील होतो, ती नायिका त्या मुलाला सुरुवातीला फार हिणवत 
असते, पण तो त्यांच्यासोबतच राहतो- एकदा तर अगदी तो तिचे पाय चेपतो, नंतर त्यांचा एकमेकला लळा लागतो, 
पण ऐन वेळेला विठोबाचे दर्शन घेण्याच्या वेळी तो मुलगा दिसत नाही, म्हणून ती नायिका इकडे तिकडे पाहू लागते, 
तर तिला त्या समोरच्या सावळ्या ओजस्वी मूर्तीत तो मुलगा दिसतो; अगदी त्याच बाल वेशात, तो प्रसंग शब्दात 
अवर्णनीय आहे. त्यावेळी ज्याच्या डोळ्यात पाणी येते, त्या माणसात मला वाटते ती; संवेदना आहे, तो सावळा 
अविष्कार वर्णन करण्यासाठी शब्द नव्हे काळजातून आलेले दोन अश्रू पुरसे होतात. 
www.saarthbodh.com
वेदना हि सर्वत्र भारलेली आहे, माणसात, निसर्गात, झाडत, प्राण्यात, ती वेदना ज्याला समजते ते मन संवेदनशील 
आहे, त्याला जाणीव आहे असे म्हणता येईल. खरे तर संवेदना/जाणीव हा विषय फार मोठा आहे, पण जे काही 
अनुभवातून जाणवले; ते माझी संवेदना जागी ठेवून मांडायचा हा एक प्रयत्न, आपले पण असे अनुभव नक्की असतील 
यात तिळमात्र शंका नाही. आपले अनुभव वाचून त्यातील आनंद घ्यायला मला नक्की आवडेल. 

LIKE Saarthbodh !!!