प्रेम / आपुलकि / स्नेह... - स. पु.

प्रेम / आपुलकि / स्नेह...

जेंव्हा दोन व्यक्तींमध्ये प्रेम असते, ते वृद्धिंगत होत जाते, अशा काही नात्यांमध्ये मी गेले काही दिवस पहात आहे की, त्यावेळी कुणा एकाला असे वाटू लागते की, याचे/ हिचे आपल्यावर खरच अजून इतके प्रेम आहे का?, अजूनही तितकीच ओढ आहे का !. हा असा विचार कदाचित मानसिक स्थितीचा भाग असू शकतो, नैसर्गिक कुतूहल असू शकते, कारण जे प्रेम आहे ते अजून मजबूत व्हावे हाच मूलतः छुपा उद्देश त्यात असतो. पण सतत अशी शंका येणे, सतत त्या नात्याची परीक्षा घेणे, सतत त्या निष्ठेची पडताळणी करणे , याचा अतिरेक झाला की, तो पोरकटपणा अथवा असमंजसपणा वाटू शकतो, अशा स्थितीत समोरील तो अथवा ती, कंटाळून किंवा उद्विग्न होऊ शकते. अशा आचरणाने जे नाते तो किंवा ती शंका घेऊन, सतत तेच ते बोलून जास्त घट्ट करायला पाहते, त्या नादात नेमक्या चुकीच्या मार्गाची निवड केली जाते. याचा प्रत्यय म्हणून जो ती किंवा तो व्यक्ती जवळ रहावा, असे वाटते , त्याउलट ती किंवा तो, दुरावला जायची शक्यताच जास्त असते. मुळात प्रेम आहे तर शंका घेणे किंवा खातरजमा करणे हे स्वतः त्या शंका घेणाऱ्या व्यक्तीला लाजिरवाणे वाटायला हवे, याचा अर्थ तुझेच प्रेम खात्रीचे नव्हते का? म्हणून तुला शंका येते !!!, असा स्वाभाविक अर्थ निघू शकतो, नाही का!. अशा सतत शंका घेणाऱ्या किंवा नात्याची सतत फेर तपासणी घेणाऱ्या त्याची किंवा तिची भविष्यातील स्थिती ही एकाकी होऊ शकते, कारण असे करणे ही एक नकळत सवय होऊन जाते, मग समोर इतर कुणीही व्यक्ती असली तरी हेच होत राहणार.
थोडक्यात आपल्या शंका अथवा पडताळणी पायी आपण त्या मुख्य दृढ आणि आपल्या जवळच्या नात्याला पोखरत तर नाही ना, याची जाण, शुद्ध ठेवायला हवी, नाहीतर अपयश किंवा मनस्ताप ठरलेला आहेच.

मुळात प्रेम किंवा ओढ ही अशी असावी, की तुम्ही आततायीपणा करण्यापेक्षा, त्या व्यक्तीशी असे वागा, त्याची/तिची मूलभूत मानसिक स्थिती, त्याचे व्याप, त्याची/ तिची वैयक्तिक आव्हाने, अडचणी समजून घ्या. त्याला अशी भक्कम साथ आणि अधिकचे बळ द्या की त्याला/ तिला शंभर हत्तींची ताकद आपल्याला मिळाली असे भासायला हवे. त्याला/तिला वाटायला हवे की काय योग्य निवड आहे माझी, आता मला प्रगती किंवा यश करायला कुणीच अडवू शकणार नाही, मी माझी सर्व स्वप्ने अगदी सहज पूर्ण करू शकतो. खरे तर प्रेमातील साथ ही अशी हवी, गरज पडली तर जोडीदाराने पुढे येऊन आव्हानांचा समाचार घ्यायला हवा.
पण आजकाल प्रेमात देखावा जास्त वाटतो, सतत अनुमोदन घेणे, चित्रपटातच शोभेल असले नाटकी प्रकार करणे, यालाच जास्त महत्व आहे. नुसत्या भेटी, एकत्र फिरणे, खाणे, भेट वस्तू देणे, नव्या प्रथा येतात त्याप्रमाणे वर्तन करणे, याला अर्थ नाही, हे चित्रपटात बरे दिसते, फक्त असलेच प्रकार म्हणजे फारच उथळ प्रेम झाले. खरे तर प्रेम करणे, निभावणे हा आयुष्याचा अत्यंत नाजूक आणि महत्त्वाचा भाग आहे, मुळात सगळे उत्तम असताना प्रेम करणे/ होणे, पण तेच भविष्यात काय प्रसंग येईल माहित नसतात, अशा वेळी आपल्या जोडीदाराला साथ देणे, आपणही नाण्याची दुसरी बाजू आहोत, समोरच्याकडून आपण जी अपेक्षा करतो, ती मुळात आपण त्याच्या/ तिच्या बाबतीत पूर्ण करू शकतो का?, तेवढी आपली ताकद आहे का?, ती अपेक्षा मुळात योग्य किंवा आपल्या नात्याला सिद्ध करण्यासाठी रास्त गरजेची आहे का?. आपल्या नात्यातील आपला सहभाग, आपली जबाबदारी किती आहे, आपण कुणी जगावेगळे आहोत का ? या सगळ्याची आपले वय आणि आपल्या स्वतःच्या कुटुंबाच्या स्थितीनुसार समज आली, तर अशी प्रेमाची नाती सुकर व्हायला काहीच अडचण येणार नाही.
अर्थात प्रत्येकाला हे जमेल असे नाही, न जमल्यास निदान चूक समजल्यावर तरी सुधारणा करायला हरकत नाही, कारण वय/ निसर्ग कुणाकरीता थांबत नाही, एकदा नात्यात दुरावा आला की तो पुन्हा सांधणे हे फार अवघड असते. वेळीच त्याने/ तिने सावरणे... हीच त्या प्रेमाची यशोगाथा ठरेल...


© सपु - सचिन पु. कुलकर्णी

Comments