मनन/चिंतन - एका चिमुकलीची मोठी व्यथा.......
किलबिल किलबिल, चिवचिव चिवचिव बागेत एका गर्दी भरे
संध्याकाळी बागेत जमती, आजुबाजूचे चिमुकले तारे
अश्या एका घरात, होती एक चिमुकली
नुकतेच आज-काल, थोडे बोलायलाही लागली
आई-बाब्बा म्हणायला, नुकतीच होती शिकली
दोघेही नोकरी करतात, घरी एकटे राहायला शिकली
एक मावशी होती, त्यांच्या घरी कामाला
तिचे प्रेम मर्यादित, महिना तीन-चार हजार कमवायला
पैसा आणि करिअरमुळे, आई-बाप धावतात
छोटीलाच माहिती तिचे; तास अन् दिवस, कसे जातात
लेकीच्या प्रेमाचा उमाळा कधीतरी, आई थांबते घरी
हट्ट; प्रेम करायला मिळतोय, म्हणून छोटी रडते भारी
उगाच थांबले म्हणते आई, अवघड आहे सगळे
व्याप संसाराचा केलाय, मावशीविना नाही खरे
छोटी करते विचार, आई अशी का वागते?
जवळ नसता आई, आता मावशीच बरी वाटते
रोज संध्याकाळी, छोटीची बागेत फेरी
सजवलेली झक्कासपैकी, ढकलगाडी भारी
आईने कुशीत घेतलेले, तिने बाळ एक पाहिले
खूप भारी खेळणी बघून, होत नाही तसे झाले
लक्षात आला फरक तिच्या , नजर झाली धूसर
आवंढा गिळून गपकन् , दाटून आला गहिवर
पाहिले तिने एकदा, आपल्या झगमगीत गाडीकडे
फिरली परत नजर, कडेवरच्या त्या बाळाकडे
पोर बिचारी निरागस ती, डोळ्यात होता आज हेवा
म्हणत होती आपल्यालाही, कोणी जवळचा हवा
गाडी तिची ढकलणारे , बारीक सुरकुतलेले हात
करून काबाडकष्ट, त्यांची नशीबे त्यांच्याच हातात
छोटीला हाती घेता, गरिबी-श्रीमंती एका ताटात
छान सुंदर द्राक्षे जशी, बांधली वडाच्या पानात
आली मावशी दुसऱ्या दिवशी, आई-बाबा गेले बाहेर
आठवून बाळ बागेतले, चिमुकल्या डोळ्यांना ओला आहेर
गुंतली मावशी कामात, “ओ रे बाळा” करत
एकटी पडली छोटी, नशीब आपलेच कुरवाळत
काळीज तुटले तीळतीळ, छोट्या मनात मोठे वादळ
रोजचीच जखम ती, रोजचे दुखणे आणि भळभळ
एकटेपणाची सवय इतकी, तिला आता झाली
ओले व्हायला आजकाल, डोळ्यांना सवड नाही राहिली
बाहुलीकडे पाहता छोटीला, एकदम लक्षात आले
मावशी आहे आपल्याला, हिला कुणीच नाही राहिले
अंगात तिच्या नकळत, एक थोरलेपण आले
बाहुलीला आपल्या, तिने पटकन जवळ धरले
“ललू नको बाला, आता मी इथे आहे”
“कुणी त्लास दिला सांग, त्याला फत्त्ता देऊन आले”
तिच्या कोवळ्या वयात तिला, परिस्थितीने शिकवले
“जगात कुणी कुणाचे नसते”, हे जरा जास्तच लवकर कळले
आता फरक तिला पडत नव्हता, आई-बाबा असले काय नसले
इतके रडून; देव बाप्पा गप्प कसा, असे तर नसेल वाटले?
असे काही घरात सगळे , औपचारिक झाले
इतके करून सगळे, त्या आई-बापांनी काय कमावले?
पैसा; नोकरी; भविष्य, घर ह्या आहेत वेगळ्या दिशा
जपल्या पाहिजेत सांभाळून, आपल्या कुटुंबाच्या आशा
© सचिन पुरुषोत्तम कुलकर्णी
nice!! Sachin.
ReplyDeleteNikhil Bhusari
Silvercoin b5