कविता - पाऊस.......नवसंजीवन

तप्त निखारा जैसा, वैशाख हा पेटलेला
रापून अंग थकले, उष्मा निवळलेला

वाट पाहतो जैसी, आतुरला चातक वेडा
बरसेल कधी घन, मिळेल उसासा थोडा

मेघही रुसला जैसी, सांगून सखी येईना
येरझार जीवाची, समजूत मनीची होईना

आला क्षण तो एके दिनी, दाटले मेघ श्यामल ऐसे
भेटता एकमेकास ते, गडगडाट हर्ष जैसा भासे

सुटला संयम; बरसले बेजोड, जुळविले नाते
अंबरातून धरतीस प्रेम; जीवन, पाण्यातून वाहते

आल्हाद घेई जागा, सारुनी दूर हा उष्मा
कण कण संजीवला, दूर पळविले ग्रीष्मा

धरती आकंठ प्याली, झेललेला थेंब अन् थेंब
जैसी गंगाच उगमली, देई प्रसाद तो भोळा सांब

होते पाणीच ते, दिसले गढूळ कईकांस
ते धरतीस ठावे, त्यास ती माने अमृतासम

काडीसम वाळले गवत, निष्पर्ण हर एक वृक्ष
हि वेळ दर वेळची, त्यास माहित होणार ते रुक्ष

होते तग धरुनी; त्यांचे वरती वाळके; हर एक अंग
परी धरतीत रोवले मूळ, पुनर्जीवनाचे ठाम मनी मर्म

परी जाईल समय; एके दिनी हाही, मिळेल नवजीवन
कदर ज्याची त्याला, हर एक थेंब करी नवनिर्माण

कैक म्हणती; हा किती बरसला, साचला; ना वाटही जाण्याला
त्या वृक्षास विचारा मोल; ज्याच्या फुलविले निष्पर्ण देहाला  

© सचिन पु. कुलकर्णी

Comments

Popular Posts