कविता - दिवस.......पालटलेले
एका त्याची/तिची व्यथा, जी कधीच संपली नाही. वयाप्रमाणे आणि सावलीप्रमाणे देहाला कधीच सोडत नव्हती; अशी व्यथा. कुठलेंच काम त्यांचे होत नव्हते; जणू त्यांचे दु:ख काही संपतच नव्हते. सगळी आशाच सोडली होती; कारण आता कुठलेच काम न होण्याची सवयच लागली होती.
घेतला जन्म, अवतार कार्याला
घेतला जन्म, अवतार कार्याला
पण तो दिवस आला, त्याची/ तिची सगळी कामे अडचण न येता पार पडू लागली. हे कसे झाले यावर त्याचा / तिचा विश्वास बसे ना. तो अनुभव इथे शब्दात मांडायचा केलेला एक प्रयत्न.
-------------------------------------------------------------------------------------------------
भोग संगे, जडून देहाला
आयुष्य झडता, काळ सरायाला
एके दिनी परत, पुढच्या प्रवासाला
केले हात पुढे, जीवनास भेटण्यासी
वाटले धरेल, मजला असा उराशी
नियम जगण्याचे, उमगले विखारी
नित्य याचना करून, मी भिकारी
न रमलो; पचलो, दुनियेत या
अस्तित्व सांडोन, लागलो भटकाया
दाही दिशा हाच, राहिला मार्ग
मी एकटा, कसा ओळखू असली मार्ग
हेलावत शोधू लागलो, किनारा
ना कधी निवारा, फक्त डोक्यात वारा
पाण्यास शोधता, ते मृगजळ निघाले
मी सावलीस जाता, वृक्ष निष्पर्ण झाले
सरळ वाट धरिता, तरी पायी मोडे काटा
माझ्या हर एक निश्चयाला, मिळे नवा फाटा
वेळ बरी माझी, तरी काळ रुसलेला
या सगळ्या खटाटोपी, मी आयुष्य ओघळलेला
आज झाले अजब, धरती अंबरास मिळाली
मला वाटते माझी, सारी व्यथा होळीस मिळाली
आज मी पाणी शोधता, वरुनी मेघ बरसला
कुठे सावलीस पाहता, पुरा बगीचा मिळाला
जुनाच; रोजचाच त्रास, असा काही निवळला
भले पुरता बुजला वार, तरी घाव सोडून गेला
पालटले दिवस तरी, घाव उठावदार आहे
जुन्या दिवसांचा आठव ठेवून, पाय धरतीस आहे
© सचिन पु. कुलकर्णी
sachin.kulkarni78@gmail.com
Comments
Post a Comment