लेख:- गडकोट किल्ले एक सांस्कृतिक ठेवा.
Article Published in Newyork Maharashtra Mandal- Snehadeep July 2011 Edition:-
http://www.maharashtramandalny.com/Snehadeep/Snehadeep_July_2011.pdf
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
गडकोट किल्ले एक सांस्कृतिक ठेवा:-
गुरुवार. कंपनीतला नेहमीचा दिवस. दुपारच्या जेवणात आमच्या अप्पाने ट्रेकचा विषय काढला. कामाचा ताण खूप होता; कुणाचे काही काम तर कोण गावी जाणार होता आम्ही हो-नाही, हो-नाहीला सुरुवात केली. मी, विक्या, वैभ्या, बापू, पप्या, अण्णा, अप्पा ( हायटेक सोफ्टवेर मध्ये असलो तरी घरगुती टोपण नावाची प्रथा आम्ही कायम ठेवली आहे) चर्चेला सुरुवात झाली. पाऊस नुकताच सुरु झाला होता,शनिवार धरून "तिकोणा" गाठायचे ठरले. जेवण आटोपून जागेवर आलो. कोण गुगल वर नकाशे बघू लागला, कोण आधी कोण जाऊन आले आहेत त्यांचे फोटो बघू लागला. आता खरी सुरुवात झाली होती. मी खायला काय न्यायचे, पाणी कि ताक, इत्यादी गोष्टी बघू लागलो. यादी काढली.
दुपारी चहा मारायला जमलो आणि कोण काय आणायचे ते ठरवून दिले. दुसऱ्या दिवशी प्रत्येकजण नक्की येणार आहे कि नाही हे पक्के ठरवले. गाड्या कोण घेणार इत्यादी गोष्टी ठरल्या.
शनिवार सकाळी ५ ला मोबाईल कंपनीचा फायदा करून देत प्रत्येकाने एकामेकाला फोन करत निरोप देत जमायला सुरुवात केली. एक एक जण जमत जमत एकत्र येऊन गाड्या तीकोण्याच्या दिशेने पळवल्या.
तिकोणा म्हणजे तसा लहान किल्ला, गडावर फार मोठे क्षेत्रफळ नाही, पण एक गस्तीचा मोक्याचा टापू म्हणून त्याच्याकडे पाहिले जात असावे. आम्ही गाड्या पायथ्यापासून जरा लांब लावल्या आणि हातात काठी, आणि पाठीवर आमची दप्तरे घेऊन चालू लागलो. आम्ही थोडे लवकर पोहोचलो. हेल्मेट वगैरे काही गोष्टी तिथे एका घरात ठेवल्या, त्याचे काही पैसे घेऊन स्थानिक लोक सेवा पुरवीत होते, त्यांना काही रोजगार त्यातून मिळत होता. आम्ही चुलीवरचा "कडक चा" मारला आणि चालू पडलो. जोरदार घोषणा दिल्या, किल्ला चढायला सुरुवात झाली, तीकोण्याची एक बुलंद बाजू दिसत होती, दुरून डोंगर साजरे त्याप्रमाणे अगदी सोपी चढण वाटत होती.
एके काळी सुवर्णयुग उपभोगलेला तो किल्ला आम्हाला जणू खुणावत होता- या रे मुलानो, या; शनिवार-रविवार तो सुद्धा फक्त पावसाळ्यातला त्याशिवाय कोणी फिरकत नाही माझ्याकडे, या. आम्ही पायथ्याला आलो, सगळ्यांनी वाकून नमस्कार केला, आणि एक एक टप्पा चढायला सुरुवात केली, थोडी दाट झाडी चालू झाली, आणि चिमुकल्या पक्ष्यांचे मधुर आवाज चालू झाले. आमच्यातला कोणी तसे आवाज काढून त्यांना प्रतिसाद देत होता. निसर्ग का काय म्हणतात तो हाच याचा प्रत्यय आला. पाऊस थोडा पडून गेल्यामुळे जमीन राड झाली होती, आमच्यातली काही वजनदार मंडळी आपला तोल सावरत त्या मातीच्या परीक्षेत नापास होत होती.
आम्ही स्वत:शी काही नियम केले आहेत, एकदा का गड चढायला सुरुवात केली कि मोबाईल वर किंवा कसलीही गाणी लावायची नाहीत, बोलण्याखेरीज इतर आवाज न करता शांतपणे वारा, पक्षी, झाडांची पाने, कीटक यांचे आवाज ऐकत चालायचे, कोणीही कसलेही व्यसन करायचे नाही. अधून मधून घोषणा; जय भवानी, जय शिवाजी !!!, हर हर महादेव!!!, किंवा आमचा अण्णा इतिहासातील गोष्टी सांगण्यात पटाईत, त्या सांगायला आणि ऐकायला मुभा होती. मधेच कुठे झाडाखाली बसून दोन घोट पाणी पिऊन परत चढायला सुरुवात करायची. आम्हाला बऱ्याचदा या आधी गरुड, खंड्या (किंग फिशर- मी फक्त पक्ष्याबद्दल बोलतोय ), रान कोंबडी, घुबड, घार, जंगली कबुतर, कोकीळा, पोपट इत्यदी पक्षी पाहायला मिळाले आहेत. आम्ही वाटेने जाताना अनेक खेकडे बिळातून बाहेर येऊन आपल्या नांग्या उभारून "खबरदार पुढे याल तर..........हे आमचे घर आहे " असे जणू आव्हान देत होते. आम्ही त्या बिचाऱ्यांना त्रास न देता पुढे जात होतो.
एक वरचा माथा आला, एक मोठीं विहीर आणि डोंगराच्या कपारीत २/३ गुहा आणि एक देऊळ होते, तिथे चहा आणि नाश्त्याची सोय होती, आम्ही देवाचे दर्शन घेतले, गुहेत राहणारा माणूस किल्ल्याची माहिती सांगत होता, वर किल्लेदार/रक्षक आहेत म्हणाला, म्हणजे; माकडे बरीच आहेत असा त्याचा अर्थ होता. आम्ही त्या माणसाला काही पैसे देऊ केले. तो घेत नव्हता; पण देवळाची दक्षिणा म्हणून घेण्यास भाग पाडले. २ जंगली कुत्री होती, त्यांना थोडा फार खाऊ देऊन पुढे निघालो. जरा वर आल्यावर दोन दगडी भले थोरले गोल पडले होते, अधिक पाहणी केल्यावर ते “चुना मळण्याचे जाते” होते असे लक्ष्यात आले. आम्ही अजून वर आलो, आणि एक दगडी मोठी चढण लागली, एका बाजूला खोल दरी होती; मागून काही अजून लोक येताना दिसत होते त्यातील काही जण "अजून किती राहिले" असे विचारात होते. "आलेच आता; सावकाश या भावांनो" असे सांगत काहीही निष्काळजीपणा न करता एकमेकाची काळजी घेत वर आलो. चढून येणाऱ्या लोकांशी बोलले कि त्यातील काही नवख्या लोकांना थोडा आधार वाटतो.
वर आल्यावर अजून एका वरच्या छोट्या टप्प्यावर एक देऊळ दिसले, ते शिवाचे प्राचीन मंदिर आहे, बाजूला एक तळे होते. आम्ही वर आलो, घोषणा दिल्या, किल्ल्याचे रक्षक -वानर गण आमच्याकडे अपेक्षेने पाहू लागले, शनिवार होता, मारुतीराया दिसला असे वाटले. आम्ही त्यांना आणलेला काही खाऊ, केळी खायला दिली. थोडा वेळ आम्ही झाडाखाली बसलो, एव्हाना बरीच गर्दी जमा झाली होती. छान धुके होते,ढग किल्ल्यावर अगदी पांघरुणासारखे पसरले होते, मधून मधून बारीक पाऊस, ढग बाजूला झाले कि बाजूची शेती, लहान लहान घरे दिसत होती. वाटेने चढत येणारे काही लोक त्यांच्या घोषणा ऐकू येत होत्या, वातावरण एकूण प्रसन्न होते, श्री सत्यनारायणाच्या पुजेसारखे.
आलेले लोक कोणी बिस्कीट, कॅडबरी खात होते, चिप्स, कुकुरे असले चमचमीत पदार्थ खात होते काही गोष्टी आता मला खुपू लागल्या, काही जण मोठ्यांदा चित्रपटातील गाणी लावून तेथील निसर्गातील शांतता भंग करत होते. प्लास्टिक पिशव्या , इतर कचरा टाकून घाण करत होते. आम्ही उठून बाजूला तळ्याकडे गेलो तळ्यात पण चिप्सच्या रिकाम्या पिशव्या, प्लास्टिक बाटल्या ढीग पडल्या होत्या. भरीत भर म्हणून बरेच सुशिक्षित अडाणी लोक सिगरेट पीत होते होते, त्या मंद धुक्यात सिगरेटचा धूर सोडून शहरात जे अमाप आहे ते “प्रदूषण” पसरवत होते. सुशिक्षित आणि अडाणी या माझ्या मते दोन वेगळ्या गोष्टी आहेत, अडाणी म्हणजे ज्याला लिहिता वाचता येत नाही, सुशिक्षित अडाणी म्हणजे जो शिकून सुद्धा अडाणी माणूस पण वागणार नाही असा वागतो;असा माणूस. अत्यंत वाईट अनुभव होता हा. एवढा अमोलिक ठेवा आपला, आपण लोक वाट लावत आहोत; याची जाणीव झाली. रोजच्या दगदगीतून बाहेर येऊन किल्ल्यांवर येणे आणि जे शहरात आहे तेच इथे करणे- कचरा टाकणे, प्रदूषण करणे, हि कसली मानसिकता. हा तर शुद्ध बिनडोकपणा आणि असमंजसपणा आहे.
किल्ला-दुर्ग म्हणजे आपले वंशज, त्यांनी छत्रपतींच्या स्वराज्याच्या हर एक लढतीत अहम भूमिका बजावली. एक एक किल्ला म्हणजे एक एक घरातील वडील माणूस याप्रमाणे महाराजांनी त्यांची काळजी घेतली होती. मावळे जीवाचे रान, रक्ताचे पाणी करून त्या दुर्गांना मजबूत करीत असत. अश्या कितीएक किल्ल्यांवर अनेक जण जन्मास आले असतील, त्यांनी पावन केलेल्या या मातीत लोक खरेच किती घाण करत होते. माझे रक्त तापत होते, पण आज-कालचा समाज, काही केल्या इतक्या सहजतेने असल्या विचारांना किंमत देणारा नाही. आजकालच्या " विकेंड आणि एन्जॉय" विचारसरणीने किल्ल्यांना मात्र नक्कीच त्रास सहन करावा लागत असेल.
मला आठवण झाली; मी एकदा नेदरलॅँडला असताना तिथे "अर्न्हेम" या ठिकाण गेलो होतो, तिथे लोकांनी राडारोडा आणि काही इतर बांधकामाचे साहित्य वापरून एक २ मजली असेल; एवढी टेकडी निर्माण केली होती, तिला पायऱ्या बनवल्या होत्या आणि बऱ्याच कंपनीतील लोक शुक्रवारी तिथे कोण पटकन टेकडी चढेल याची शर्यत घेत होते, मजा करत होते, फोटो काढत होते, टेकडीचे कौतुक करीत होते, नेदरलॅँडमध्ये असे किल्ले वगैरे काही नाहीत, सगळा सपाट प्रदेश, त्या लोकांना त्या टेकडीचे एवढे कौतुक, आपण मात्र आपल्या संस्कृतीने भरभरून दिले आहे त्याची अवहेलना करीत आहोत. मन विषण्ण झाले, माणसामाणसात; वागायच्या पद्धतीत असेलला फरक ध्यानात आला. ती टेकडी मनातून हसत असेल, आणि इकडे आमच्या इतिहासाचे साक्षीदार हे दुर्ग रडत असतील असे वाटले.
आम्ही उठलो वर शिवाच्या मंदिरात गेलो, पाण्याने पिंडीला स्नान घातले. ताकाने अभिषेक केला. फुले उदबत्या गडावर जाताना आम्ही आवर्जून घेऊन जातो, उदबत्त्या लावून छान पूजा केली. बाहेर गोंगाट चालू होता, आम्ही “श्री सूक्त” आणि “लक्ष्मी सूक्त” आणि आरती मोठ्या आवाजात म्हणायला सुरुवात केली, तसा बाहेरच्या वातावरणात बदल जाणवला, अगदी काही थोड्या वेळात मोबाईल वरची गाणी बंद झाली, लोक शांत झाले, काहीजण आरतीला येऊन उभे राहिले होते. काहींना आपण नक्की कुठे आलो आहोत याचे भान आले असावे. आम्ही जोरदार घोषणा देऊन बाहेर आलो. बाकी लोक "हे आपल्यापेक्षा वेगळे आहेत" या भावनेने आमच्याकडे पाहत होते.
एक-दोन जण पुढे येऊन आम्ही कुठले, काय करतो याची विचारपूस करू लागले. तुम्ही फार चांगले काम करता इत्यादी प्रतिक्रिया मिळू लागल्या, एका सिगरेट पिणाऱ्या व्यक्तीने गडावर सिगारेट पिवून चूक केली, परत किल्ल्यावर कधी व्यसन करणार नाही अशी शपथ घेतली. अनेक नवीन मित्र मिळाले. इमेल आईडी घेऊन पुढच्या ट्रेकला; आम्हाला आधी कळवा असेही ठरले.
आम्ही तळ्यावर गेलो तेंव्हा तिथे काही मुले तळ्यात उतरून पाण्यात पडलेला कचरा काढीत होती ती मुले "श्रीशिव प्रतिष्ठान या संघटनेची होती" असे कळले. आम्हीपण यातून काहीतरी शिकून आजूबाजूचा प्लास्टिक कचरा गोळा करून रिकाम्या पिशव्यात भरायला सुरुवात केली. एकूण जरा गडावरचा सूर बदलला होता. आमच्या आणि कचरा गोळा करणाऱ्या मुलांच्या वर्तणुकीने काही लोक शहाणे झाले होते. फार बरे वाटले. खऱ्या अर्थाने एक दोन जण जरी "दुर्ग म्हणजे सांस्कृतिक ठेवा" असा विचार करू लागले असतील तर आमचा "ट्रेक" सफल झाला असे वाटले. थोड्या वेळाने हात-पाय धुवून आम्ही जेवण केले , जागा साफ केली , काही अन्न माकडांना दिले आणि गोळा केलेला कचरा घेऊन उतरायला सुरुवात केली.
खरच मित्रानो; आपण गडावर जाताना नक्कीच काही गोष्टींची काजळी घेतली पाहिजे . गडावर ध्वनी प्रदूषण करू नये, नाहीतर शहरातून गायब झालेल्या चिमण्या आणि इतर लहान पक्षी उद्या आपल्याला गडावर सुद्धा बघायला मिळणार नाहीत, तिथली झाडे वगैरे तोडू नयेत, प्लास्टिक किंवा अन्य कुठलाच कचरा टाकू नये, अन्न पदार्थ शिल्लक राहिल्यास तेथील वन्य प्राण्यांना देता येतात का ते पाहावे. एकूणच गडावर जाऊन काही तरी नाश करण्यापेक्षा काही चांगले काम करता येते का ते पाहावे.
आत्ता उन्हाळा जोरदार चालू आहे, पहिला पाऊस आला कि अनेक "ट्रेक " ठरतील, आपण नक्की या गोष्टींचा विचार करू आणि त्याचा प्रसार करू. या वेळेला आम्ही कडूलिंबाची , पिंपळाची आणि इतर काही झाडे नेऊन गडावर लावायचे ठरवले आहे, म्हणजे पावसाळ्यात झाडे वाढून उन्हाळ्यापर्यंत वाढून तग धरू शकतात. काय माहित कदाचित काही वर्ष्यांनी परत तिकडे गेलो तर तेच झाड मोठे होवून आपल्याला सावली पण देईल. एक वेगळा आनंद आहे या सगळ्या गोष्टीत. आपण पिझ्झा, पार्ट्या, अनेक प्रकारचे डे इत्यादी पाश्च्यात्य गोष्टी बऱ्याच शिकल्या आहेत, आपल्या राष्ट्राच्या संस्कृतीचे जतन (आपल्याला माहित असूनही) सुद्धा त्यांच्याकडून परत एकदा शिकुयात.
वेस्टर्न शिक्का पडला कि आपल्याकडे बऱ्याच गोष्टी पटकन खपतात किंवा सवयी लागू पडतात , खरे तर दु:ख याचेच आहे, काही गोष्टी या आपणच अनुकरण न करता ठरवल्या आणि राबवल्या पाहिजेत. तर निश्चय करूया आपण सगळेजण; कि गडकोट किल्ले हा एक सांस्कृतिक ठेवा आहे आणि आपण तो नक्की जतन करू आणि लोकांमध्ये याबाबतीत जागरूकता जागवू.
गडकोट किल्ले अबाधित राहोत !!!
बोला हर हर महादेव !!!
© सचिन पुरुषोत्तम कुलकर्णी
sachin.kulkarni78@gmail.com
Comments
Post a Comment