कविता - पळभर रिकामा असताना, मी कोणामध्ये नसताना

पळभर रिकामा असताना, मी कोणामध्ये नसताना
पाण्यात पडावा खडा तसा, मन माझे आज ढवळताना

उगाच का मी विचार करतो, विषय तसाही नसताना
आत्ता देखील शाळेत जातो, घड्याळात अकरा वाजताना
 
बाकावरचे मित्र आठवती, अन् सुट्टी मधले खेळ
आज असा का कुठे जमेना, कोणाचाही मेळ
 
आठवती सुट्टीच्या गमती, भावंडे सारी जमती
आज असे का उदास वाटे, कोणी ना अवतीभवती
 
गावाकडची मजा आगळी, होती आपुलकीने फुलली
अनेक राहती सभोवती, परी काळजातली जागा नाही भरली
 
पूर्वी एकदा साद देता, जमती सारे मित्र
आजकालचे जरा अजबच आहे, जगण्याचे हे सूत्र
 
परत फिरू कि जुळवून आणू, जुने दिस मी कैसे
सगळीकडे एकच ध्येय, बस.......वस्तू आणि पैसे
 
माहित नाही मी काय गमवले, आणि काय कमवले
बरेच कमवूनी ठेविले, परी कुठेतरी काही चुकले
 
असा काय मी विचार करतो, आज रिकामा असताना
कोणास पडत असतील प्रश्न असले, काही कारण नसताना
 
© सचिन पु. कुलकर्णी 

Comments

Post a Comment

Popular Posts