निरुपण - मानसपूजा ....... एक अनुभव

पूजापाठ रीतीभाती, प्रार्थना की आरती  
देवास पूजण्याला असले, किती प्रकार असती

काय माझी अवस्था, काय माझी परिस्थिती
बाहेरून भासेल काही, माझे मलाच माहिती

असतो देव पाठीशी सदा, मग कशास हव्यात आरती
भाव मनात असेल जर, त्या व्यर्थ साऱ्या चालीरीती

कसला देव कसला अवतार, काय असते दगडी मूर्ती
आपल्याच देवाला आपण, दिली मनात एक आकृती

जगणे मुश्कील झाले जिथे, कुठली धन संपत्ती
रोजचे दिवस ढकलण्या, जनता सारी कष्टती

भरडून गेला माणूस, असा नाही जीवास शांती
मागतो विश्राम पळभर, करण्या साधी देवभक्ती

थाळी-ताट; अत्तर; धूप, सर्व कर्मकांड असती
फुले; रांगोळ्या- सडे, मनुष्येच निर्मिली असती

शक्य नाही मजला असले, कोठून करू हि निर्मिती
देवावरी आहे प्रीती पण, भाव मनीच राहू पाहती

असेल देव मनातच तर, मनातच करावी  भावभक्ती
नयन मिटता मूर्ती दिसली, हि मानस पूजेची व्याप्ती

सोडिले सारे; धरिला  देव, मनीच लाखो दिवे-वाती
लाखो फुले; रोषणाई सारी, सुगंध कितीक दरवळती

पंचपक्वान्न सुग्रास जेवण, तूप घालतो त्यावरती
मनातले सर्व मनीच अर्पिले, मनीच माझी गुरुमूर्ती

माझ्या मनाचा मी राजा, मोठे धन; मी प्रजापती
माझ्या मनात येईल ते करण्या, कोण मला अडविती

उत्सव; यात्रा; मूर्तीपूजा, खरेच भव्य भक्तीरस ओतती
शक्य नसते हे सारे तेंव्हा, मानसपूजा हीच सारथी

शक्य नाही सांग पूजा, मानसपूजा उपाय परमार्थी  
करून पाहिलं जो नित्य एकदा, त्यालाच येईल प्रचीती


© सचिन पु. कुलकर्णी  

Comments

Post a Comment

Popular Posts