ll भजन ll - आळवितो गुरुनाथा आता.......

आळवितो गुरुनाथा आता.......

आळवितो तुजला मी, आता बोलवितो गुरुदेवा
किती काळ सोसला, तुज भेटीविना, ... आता धावसी मजकरिता.. तू त्राता.... आळवितो गुरुनाथा आता  ll धृ ll
  
पाहिली वाट मी, मळभ जायाची
पाहिली वाट मी, दिवस बदलाची
किती केले मी मुहूर्त सायास, किती केले मी अन्य प्रयास
ना सरतील दिस हे आता, धावसी त्वरिता ......मजकरिता तू आता ....आळवितो गुरुनाथा... मम त्राता..... ll १ ll

नाही कमविले, पुण्य जगामधी
नाही जमविले, माया अन् निधी
कुणी ना येई आता, मज तारण्याला
मी हतबल वाट पाहे, जीवन सरण्याला
तू घेई वेग आता, ना दुजा राही उपाय कोणता ....... आता ....आळवितो गुरुनाथा... मम त्राता.....  ll २ ll

पाय जखडले पूर्ण, ऐरावतासम
शरीरी ना त्राण ना, जगी उरे मान
संकट भासे जैसी, मगर भयाण  
काय मानू मी, याचे अनुमान

दुजा न मार्ग आता, पदी तुझ्या शरण 
करशील का तू, त्रास हे हरण?
व्याकुळ जीव हा; अति हैराण ....... तू पालक मी; बाळ जसा श्रावण  
नको अन्य मार्ग वृथा.... आता.................. आळवितो गुरुनाथा आता... मम त्राता..... ll ३ ll

नजर जिथे धूसर, कैची दिव्यदृष्टी
खितपत राहिलो, व्यापून आज कष्टी
करशील केंव्हा, तुझी कृपावृष्टी
का ऐकत आलो, मी फुक्या तुझ्या गोष्टी
ढळो ना दे विश्वास माझा, पाहू दे तुझा अवतार.. आता.. आळवितो गुरुनाथा आता... मम त्राता..... ll ४ ll

मान्य मज हे माझे, असतील भोग
शरीरी जडले, जैसे बहु रोग 
पुराण सांगती, तव कृपाकोश
नको घेऊ रे, मम वृथा दोष
मिटू दे सर्व व्यथा आता .. आळवितो गुरुनाथा आता... मम त्राता..... ll ५ ll

© सचिन पु. कुलकर्णी 
sachin.kulkarni78@gmail.com

Comments

Post a Comment

Popular Posts