भजन - सदेह आम्ही भान हरपुनी, ऐसे भजनी रंगतो

कस्तुरीगंध अन् अमृतगोडी, सदा आम्ही चाखतो
सदेह आम्ही भान हरपुनी, जेंव्हा भजनी रंगतो

दोन हाती; दोन पंक्ती, करिता त्यांचा समेळ
किणकिण करी टाळ ती, जोडी परमेश्वरी नाळ

हाती घेता एकतारी, चेतविती दिशा चारी
तार छेडता आम्हा सोडी, आणुनी भक्तीमार्गावरी

धीरगंभीर ऐसा तो, वाजविता दोन्ही अंग
थाप पडता तो मृदुंग, आम्ही ईश्वरचरणी दंग

मधुर निरंतर गुंजे, श्वास तिचा भात्यावरी
पेटी वाजता ती संगे, आम्ही होतो निरंकारी

खळाळते निर्मळ पाणी, नाद ऐसा चिपळीला
आवाज पडता कानी ऐसा, रंगताती हरिलीला

कर दोन कमळ जैसे, टाळी ऐसी पडताना
भ्रमर गुंजारती तैसा, नादब्रह्म निर्मिताना


© सचिन पु. कुलकर्णी 
sachin.kulkarni78@gmail.com

Comments

Popular Posts