मुक्तछंद:- जर देवाने माणसाला भूक दिली नसती तर.......
जर देवाने माणसाला भूक दिली नसती तर.......
मोकळा बसलो असताना, रिकामटेकड्या डोक्यात एक विचार आला
माणसाला भूक लागत नसती, तर काय झाले असते? असा विचार झाला
भुकेसाठी एवढी वणवण, कुणी केली असती का?
पोटासाठी एवढा आटापिटा, कुणी केला असता का?
चांगली शाळा मिळावी म्हणून, पालक रांगेत रात्री उभे राहिले असते का?
चांगले गुण मिळावेत म्हणून, विद्यार्थ्यांनी रात्री जागवल्या असत्या का?
दहावी-बारावी; पुढले शिक्षण, इतके महाग झाले असते का?
बारावीनंतर इतक्या मोठ्या फी भरायला, पालक धावले असते का?
पदवी मिळाल्यावर कुणी नोकरीसाठी, तडफड केली असती का?
आणि नोकरी मिळून वरच्या जागेसाठी, कुणी धडपड केली असती का?
कुणाचे लग्नाचे बघताना, चहा-पोहे झाले असते का?
लग्न ठरले म्हणून, कुणी पेढे वाटले असते का?
काही गोड बातमी लोकांनी, कशाने साजरी केली असती?
आणि सगळ्या आपल्या दोस्तांनी, कशाकरता पार्टी केली असती ?
कुणाचे लग्न ठरले असते, तर काय नुसतेच अक्षता टाकून यायचे
आणि चींगुसपणा म्हणाल, तर आहेर देऊन न जेवताच जायचे?
जोरात पाऊस आला तर, त्याला काय मजा आला असता?
गरम गरम खेकडा भजी आणि चहाला, काय पर्याय असता?
चहा आणि कॉफीचा काय, रांगोळी म्हणून उपयोग झाला असता?
फुला ऐवजी फळांचा; देखाव्यासाठी, फळगुच्छ झाला असता?
सवाष्ण, मेहुण, अंगत पंगत, या सगळ्याचे काय झाले असते?
असेच सगळ्यांनी भेटायला, काय कारण मिळाले असते?
कुणाचा निरोप समारंभ; कुणाचा वाढदिवस, कुणाची पगारवाढ, कशी साजरी केली असती?
नुसत्या कोरड्या टाळ्या आणि गप्पा मारून का वसुल केली असती?
हॉटेल आणि खानावळीच्या ठिकाणी काय सगळ्या जागा रिकाम्या असत्या?
तवा; उलतने; पातेली; भांडी, या शोध न लागलेल्या वस्तू असत्या?
कुठल्याही सरकारचे, एक दडपण नक्की कमी झाले असते
भाज्या; धान्याचे भाव वाढले, तरी कुणाचे डोके भडकले नसते
लोकांचे वाक्यप्रचार, पण थोडेफार बदलले असते
"पोटावर नको पाठीवर मारा", असे कुणाला बोलावे लागले नसते
लोकांनी पगारवाढीसाठी, नोकऱ्या बदलल्या असत्या का?
मुळात भूक नसताना कुणी, नोकऱ्या केल्याच असत्या का?
साला; भूक नसती तर, निवडणूक झाली असती?
एकमेकावर आरोप-प्रत्यारोप, याची वेळच आली नसती
मिळकत कर भरणे आणि न भरल्यास, त्याची वसुली झालीच नसती
एखादी बँक जन्मालाच आली नसती, तर लोकांनी कर्ज कशाला काढली असती?
शेती, दुकाने, मॉल, पर्यटन सगळे काही झालेच नसते
भूक नसती तर नाटक, सिनेमे जन्माला आले असते?
अहो मुळात कुणालाच. कसली पडली नसती`
शाळा; नोकरी; पैसा अडका. कसली गरजच लागली नसती
एक शंका अशी होती; भुकेवीना चव, उद्दिष्ट, प्रगती, कला आणि संस्कृती आली असती?
भूकच नसती, तर माणसाला काय किंमत राहिली असती?
लोक सगळे अस्ताव्यस्त, सगळी परिस्थिती जंगली असती
कशाला आपल्या पूर्वजांनी, गारगोटीवर गारगोटी घासली असती?
विचारांचे वादळ डोक्यात उठले होते, माझी बुद्धी धावत होती
असला काहीतरी विचार करायची, मला बुद्धी कशी झाली होती?
काय विचार करतोय कळेना, पुढचे विचार थांबेना
अमुक गोष्टीचे काय झाले असते?, हा विचार डोके सोडीना
असला काहीतरी भयानक विचार करून, माझी जाम सटकली होती
काय सांगू तुम्हाला, पोटात भुकेचीच आग लागली होती
© सचिन पुरुषोत्तम कुलकर्णी
Comments
Post a Comment