कविता:- एखादी गोष्ट करण्यामागे काय बुद्धी असावी?

क्रीयेमागच्या प्रक्रियेची, काय नक्की मेख असावी?
कोणी कुठली गोष्ट केली, बुद्धी त्यामागे काय असावी?

सारे प्राणी; मनुष्य; पक्षी, आपल्या वंशा वाढविती?  
पुढे चालावा वंश आणि; मातृपितृत्वाची आस असावी?

कोणास कोणी वाचविले संकटी, त्यात उपकाराची भावना असावी?
केलेच जरी अन्नदान कोणी, त्यात पुण्यकमाईची भावना असावी?

मेदिनीस त्या बीज पेरता, छाया फळांची इच्छा असावी?
तहानलेल्यास देता पाणी, तेंव्हाहि पुण्यकमाईची भावना असावी?

शिकविता लेकरास कोणी, चांगल्या संस्कारांची शिस्त असावी?
पालन संस्कारांचे व्हावे, अन् वृद्धपणीची सोय पहावी?      

नजरेत पहिल्या दिसता भावना, गुलाबी प्रेमाची गोडी असावी?
साथ मिळावी आयुष्याची, हि पुढाकारामागची  मनीषा असावी?

अनेक विधी; पूजा-पोथ्या, देवधर्माची आवड असावी?
होवू नये कोप देवाचा, हि कदाचित भीती असावी?

रोजची गडबड आयुष्याची, हर दिवस तसाच जगायची; तलफ असावी?
शेवट अन् पूर्णविराम माहित असुनी, जगण्याची सारी धडपड असावी?

मन उद्वि्ग्न असता, जगण्याची पक्की वाट दिसावी?
मार्गस्थ कोणी भेटेल का समयी, हि नेत्रांची धडपड असावी?

ज्ञान होता; प्रकाश पडता, शंका सारी दूर व्हावी?
साधक अवस्थेत देखील, परमेश्वर भेटीची हाव असावी?

सूर्य, नद्या, अग्नी, समुद्र, वारे, पंचमहाभूतांची उत्पत्ती थोडी वेगळी असावी?
कोणी मानो वा  मानो, कर्तव्यपूर्तीची निस्वार्थ प्रेरणा असावी?

परमेश्वराचे मात्र वेगळे , त्याची सगळी बातच निराळी 
त्यास भजा अथवा  भजा, त्याची जग चालवण्याची ती रीत असावी?

© सचिन पुरुषोत्तम कुलकर्णी

Comments

Popular Posts