कविता:- परमेश्वराने आयुष्य दिले, कोणाचे कसे असावे
परमेश्वराने आयुष्य दिले, कोणाचे कसे असावे
फुलाचेच बघा कसे फुलावे, कोणाकरिता उमलावे
कोणी उमले रानीवनी, कोणी दुर्गम डोंगरी
कोणाला खास कुंडी मिळे, कोणी ओढ्याकीनारी
कोणाचे आयुष्य फक्त पावसाळी, त्याची व्यथा वेगळी
कोणाचे बारमाही कौतुक, त्याची तऱ्हाच निराळी
कोणाच्या वाट्याला भ्रमर फुलपाखरे, वाढविती ते साज त्याचा
कोणाच्या नजरेसही चिटपाखरू नाही, साज वाया जाई ज्याचा
कोणाचे सवंगडी गुलाब; चाफा, कोणाचे बकुळ; जाई
कोणाला सोबती गवत रानटी, त्याच्या समवेत आयुष्य जाई
जन्मून कोणी गुंफला जाई, सखीच्या वेणीत
कोणास फक्त फेकले जाई, दुकानी गर्दीत
कोणी विराजमान नववस्तूंच्या, आगमनी आनंदात
कोणी असाच फेकला जाई, उरूनी उकिरड्यात
कोणी विलासे शय्येवरी, मधुचंद्राच्या राती
कोणी लटके अनेक मास, उभ्या पुतळ्याच्या साथी
कोणास नशीब लाभले ते, लीन परमेश्वराच्या पायी
कोणी दुर्दैवी बांधले हाती, एका वासनेच्या पायी
वासनेचे शिकारी कोमेजून झाले, कचऱ्याचे धनी
परमेश्वराच्या सानिध्यात कुणी, निर्माल्याचे मानी
© सचिन पुरुषोत्तम कुलकर्णी
Comments
Post a Comment