लेख:- घटस्फोट.......संस्कृतीशी

Article published on Antaraal.
http://antaraal.com/e107_v0617/e107_plugins/custom_ant_articles/2011/Sep2011_lekh_SK.pdf
------------------------------------------------------------------------------------------------------------
घटस्फोट.......संस्कृतीशी:-
© सचिन पुरुषोत्तम कुलकर्णी
sachin.kulkarni78@gmail.com
गुरुवार. ग्रंथालयातील पुस्तके बदलायचा माझा दिवस. पुस्तके हुडकत होतो. माझ्यामागे तिशीतल्या दोन महिला काही बोलत होत्या- " बघ ना, बिचारीचे खूप वाईट हाल झाले, शेवटी नशिबाचा भाग असतो. आता तिचे आई-वडील नवीन स्थळ बघत आहेत. पण दुसरे लग्न म्हणले कि जरा अडचणी येतातच ना, अगदी सगळ्या अपेक्षा कशा पूर्ण होणार. ए; तुझ्या माहितीत जरी कोण असेल एखादा चांगला मुलगा तर सांग हं. दुसरी महिला म्हणाली -अग हो आणि तुला त्या मंदिराजवळच्या काकू माहित आहेत ना, त्यांना भेट ना, त्या ”घटस्फोट स्पेशियालिस्ट” आहेत, त्या नक्की तुला मदत करतील.

एवढे बोलून त्यांचा संवाद संपला आणि माझा विचार चालू झाला. कुणी तरी सटकन मुस्काडात वाजवावी तसे काहीसे झाले. त्या दोघी नकळत बोलून गेल्या कि "घटस्फोट स्पेशियालिस्ट", आणि हाच विचार मला खुपला, खरोखर खुपला, क्षणभर अवधूत जवळ असता तर मी त्याला; "हे मला खुपते" असे सांगून टाकले असते.

"घटस्फोट स्पेशियालिस्ट "असे काही तरी कौशल्य असणारी व्यक्ती असावी किंवा आहे अशी वेळ खरोखरच आपल्या समाजावर आली आहे का? या स्पेशियालिस्ट व्यक्तीला आपण नक्की काय करत आहोत असे वाटत असेल?.......... कुणास ठाऊक. आपण एखाद्या मोडलेल्या कुटुंबाला मदत करीत आहोत कि ज्या गोष्टी खरच आपल्या समाजात व्हायला नकोत त्या होत आहेत आणि त्या आपल्याला कराव्या लागत आहेत याचे दु:ख वाटत असेल?. पण शेवटी काय रोग म्हटला कि ईलाज आलाच, तो रोग्याकरिता आणि वैद्याकरिता कितीही कष्टप्रद असला तरी पण दोघांना तो करावाच लागतो, अन्यथा रोगापासून मुक्ती नाही. 

मी सहज विचार केला अशी किती कुटुंबे असतील; ज्यांच्या घरात घटस्फोट झाले असतील किंवा करायचे निश्चित झाले असतील किंवा होण्याच्या वाटेवर असतील. काय परिस्थिती असेल त्या माता-पित्यांची?, येथे मुलगा चूक किंवा मुलगी चूक असा विषय नाहीये. असमाजुतादारपणा, वैचारिक मतभेद हा मुख्य अडथळा आहे पण ज्या मुला-मुलीला तिचे आई-वडील लहानाचे मोठे करतात, रोजचे कटकटीचे आयुष्य कष्ट करून, खचता खाऊन घालवत असतात. काटकसर करून पैसे वाचवून त्यांचे शिक्षण करवतात, पुढे लग्नासाठी बचत करून "एकदाच आहे लग्न; जोरात होऊन जाऊ दे" किंवा "आपल्याकडे पहिलेच आहे किंवा आत्ता काय शेवटचेच लग्न आहे घरातले " असे म्हणून भरपूर खर्च करतात, आपली चालू कर्जे, म्हातारपणातील गरजा ध्यानात न घेता "याचसाठी केला होता अट्टहास" या भावनेने मोठा विधी-समारंभ करून सर्व कोड कौतुक करून एक जबाबदारी पार पडतात.

मग त्या मुलाचा/ मुलीचा संसार चालू होतो. पहिले सणासुदीचे वर्ष असते, पहिला दिवाळी सण, पहिला पाडवा, पहिला दसरा .......सगळे अगदी पहिले- नवे, नव्या पालविसारखे टवटवीत आणि आनंददायी असते ..................काही तरी होते; कुठे तरी खटकते आणि.............आणि बाकी सगळ्या पहिल्या गोष्टींप्रमाणे पहिले भांडण होते. छोट्याश्या भांडणामुळे कुठे तरी मिठाचा खडा पडतो. हे मीठ चव वाढवणारे नसून चव नासवणारे असते. शांत नितळ पाण्यात गाळ उठतो; दोघांनी वर आलेला गाळ निवळू दिला तर पाणी पटकन छान होते आणि ते दोघे एकमेकाचे- त्यांच्या मनाचे प्रतिबिंब त्यात पाहू शकतात आणि पुन्हा असा गाळ उठू द्यायचा नाही असा निश्चय करू शकतात. उठलेल्या गाळाची एक झलक त्यांना "काफी" ठरू शकते. पण हा पणच; पहिला वाहिला पणच फार मोठा निर्णय घेणारा असतो.

हा “पण” काही तरी मनात धरून, मी म्हणेल तेच खरे असा खोटा अहंभाव बाळगून दोघे किंवा कोणीतरी एक हा उठलेला गाळ बसू देत नाही, अजून ढवळतो, समोरचा आत्ता तरी माझा उद्रेक पाहून शांत बसेल अशी अपेक्षा -असा हट्ट करतो. प्रसंगी एक कोणीतरी शांत बसतो किंवा दोघे अडून बसतात. ३-४ दिवस अबोला, मग आई किंवा मोठी भाऊ/बहिण, लग्न झालेला मित्र किंवा मैत्रीण यांना फोन होतो, ते "अरे जाऊ दे हे होतेच, जरा सांभाळून घ्या", किंवा "तुला समजत नाही का- तू समजून घे नव्या घरात गेली आहेस ना" किंवा " ती तुमच्या घरात नवी आहे ना तुला कळायला नको? . जरा "अड्जेस्ट करायला वेळ लागेल"  पण असे करू नका परत. बोला बरे एकमेकाशी. असे सल्ले देतात.

घरच्यांच्या हळूहळू लक्ष्यात येते हे दोघांच्या लक्ष्यात यायला लागते आणि मग काही नाही; नुसती गंमत आणि मग मिटवामिटावी. पुन्हा दोघे  प्रत्येक नव्या दिवसाची सुरुवात नव्याने करतात आणि दिवस पुढे सरू लागतात.
असे भांडणाचे आणि अबोल्याचे अनेक प्रसंग कधी थोडक्यात तरी कधी जरा जास्त दिवस खाऊन संपतात. सगळे बरे चालले आहे असे दिसते. कुठे तरी काही तरी धुमसत असते, ते फार वरपर्यंत येत नाही, पण ते तितकेच खोल असते म्हणून त्याच्या किंवा तिच्या मनात खोलवर जखम करते. हळूहळू अग्नीसमोर घेतलेल्या शपथा वितळू लागतात आणि मनाला चटके बसू लागतात, सात जन्माच्या सोबतीची शपथ घेतलेला तो/ती सात क्षणसुद्धा जवळ नको असे वाटू लागते.

आता दोघे भांडण करून सरावलेले असतात, घरच्यांना काही कल्पना नसते. दोघे संसारच्या एकाच जहाजात असतात पण दोघे वेगळ्या दिशेने वल्हवत असतात. माझेच नशीब असे का? हा/हि अशी का वागते? , जवळच्या  मित्र/मैत्रिणीशी संवाद होतो "ए घरी बोलू नको हं- आईला/बाबांना सहन होणार नाही....बिचारे... त्यांना वाटते आमचे मस्त चालले आहे..........त्यांना काय माहित आमचं हे इतकं बिघडलं असेल "..........सांगताना ओठावरचे पाणी खारट झालेले असते. तो/ ती मित्राला/मैत्रिणीला मी काहीच चुकले/चुकलो नाही हे सांगत असतो... कुठे तरी हा वाद मिटावा अशी मनातून प्रार्थना असते.........देवाला विनवणी असते.........पण त्याच्या/तिच्या समोर तो/ती आले कि मात्र पुन्हा अहंभाव जागृत होतो मी का कमीपणा घ्या? ...तो/ती बोलू दे आधी; या सारख्या क्षुल्लक गोष्टीमध्ये विषय अजून ताणला जातो.
घरच्यांना हळूहळू कल्पना येऊ लागते, ते दोघांना समजावून सांगतात, एखाद वेळी प्रकरण मिटले असे वाटते, पण व्यसन लागलेल्या माणसाप्रमाणे पुन्हा एकदा चुकीने वाईट चव चाखली जातेच. एखादे व्यसन जसे त्या व्यक्तीला गुरफटून टाकते; त्याप्रमाणे गैरसमज या जोडप्याला गुरफटतात. यावेळी मी काही केले नाही असे खुले आरोप होतात, आवाज वाढतात, वातावरण तापते. आयुष्याच्या एका टप्प्यावर आलेल्या आई-बापाला मनाला चटके बसतात, आपल्या मुला/मुलीच्या बाबतीत हि वेळ का यावी? याचे त्यांना अतीव दुख: होते. आम्ही काय असे पाप केले परमेश्वरा कि आमच्या वाटेला हा प्रसंग यावा? आत्ता आत्ता तर लग्न झाले आणि हे काय अचानक.?

मनाचा उद्वेग होतो, बघू आपण काहीतरी करू, पत्रिका दाखवूं, शांती करू, गुरुजींना भेटू, असे बोलून तापलेल्या मनाला आधाराचा थोडा गारवा दिला जातो, तरी मनात कुढत आई-बाप एकमेकाला झोपूया आता तुला/ तुम्हाला आधीच "बी.पी./शुगर" आहे ,सगळे ठीक होईल, काळजी करू नका असा आधार देत शेवटी दोघे हि जागून रात्र काढतात आईची बिचारीची उशी ओली होते, बाप सुद्धा पुन्हा एका नव्या आव्हानाला सामोरे जायला तयार होतो.

व्याहींना फोन होतात, बोलणे होते; समजुतीने घेतले जाते. दोघांना समाज देऊन; धाक दाखवून काही गोष्टी सांगितल्या जातात, काही दिवस जातात पुन्हा एकदा गैरसमज जिंकतो आणि आपली करामत दाखवतो, या वेळेला व्याहींचा सूर बदललेला असतो आमचा बाप्याच/बापीच बरोबर असा आग्रह धरला जातो पुन्हा एकदा शेवटची संधी दिली जाते, अहंकार आणि असमजुतदारपणा पुन्हा आपली करामत दाखवतो आणि आत्ता मात्र ताल सुटतो आणि तोल जातो. संस्कार कुठे तरी मागे पडतात, ईर्ष्या जागृत होते. आम्ही आमच्या मुला/मुलीवर असले संस्कार केले नाहीत, तुमचाच प्रोब्लेम आहे असे आव्हान दिले जाते, पोटच्या पोरा-पोरी पायी वडील मंडळी भांडतात, मनात कुठेतरी दोघांचा उद्देश "हे सगळे मिटावे" हाच असतो पण मार्ग भरकटलेला असतो.

विवेकाची जागा अविवेकाने/अहंकाराने घेतलेली असते."अरे जाऊ दे जगात घटस्फोट कुठे होत नाहीत का?" असे बोलून एकदाचा तुकडा पडला जातो; तारीख ठरवली जाते.

दोघे वेगळ्या दिशेने एका टोकापर्यंत वल्हवत जातात आणि जहाज मधोमध फुटते, कुणालाच किनारा गाठता येत नाही. आई-बाप किनाऱ्यावरून मदतीसाठी आरडा-ओरडा करतात, पण त्यांच्या वयाच्या मानाने ते तेवढेच करू शकतात; कारण वेळ निघून गेलेली असते. जहाजावर येणारा ताण हा आत बसलेल्या दोघांनी समजायचा असतो. झाड तोडायला एक क्षण लागतो वाढून मोठे व्हायला वर्षे जातात ......त्याची सावली आणि फळे मिळणे फार दूरची गोष्ट.
मग अनेक स्थळे पहिली जातात, पण प्रत्येक ठिकाणी काही तरी बोचरे असते, शेवटी तुम्ही रस्ता चुकून वेगळ्या रस्त्याने तुमच्या ठिकाणापर्यंत निघाले आहात सरळ सोपा रस्ता आणि मनासारखा जोडीदार या चुकलेल्या रस्त्यावर मिळणे कठीण. आणि मग त्या तथाकथित "घटस्फोट स्पेशियालिस्ट" चा शोध आणि आधार घेतला जातो. 

आपण लहानपणापासून ऐकतो संसार म्हणजे गाडी आहे "एक चाक कमी पडले तर दुसऱ्याने जास्त ओढायचे, दोघांनी मिळून गाडा ओढावा लागतो". पण हि आपली संस्कृती; तिचे विचारधन आणि आचारधन हे फक्त ऐकीव ज्ञान राहते, वापर मात्र केला जात नाही.

विचार करा - आपल्या आई-वडिलांनी, फार मौज न करता, प्रचंड जिकिरीची अवस्था असताना, महिन्याची हाता-तोंडाची मिळवणी करत वर्षे काढली, स्वत:च्या इच्छा, आवडी, स्वप्ने बाजूला ठेवून, संसार यशस्वी करायचा आहे या एका जिद्दीने त्यांनी सगळा व्याप संभाळला, एक जीवन यज्ञ परिपूर्ण केला. त्यांचे इच्छित फळ त्यांना मिळाले, पण एक यज्ञ पूर्ण केल्याच्या त्यांच्या अनुभावासमोर त्यांची पुढची पिढी अयशस्वी ठरली, या नव्या यज्ञात विघ्न आले.   
आपल्याकडे एवढी शिकवण, संस्कार, वैचारिक समृद्धी असताना असे का होते? कुठे आणि कोण चुकते? त्या आई-बापाचे हाल आणि अवस्था पाहून चित्त भरकटते, आपण हयात आहोत तो पर्यंत तरी हिचे/याचे मार्गी लागेल का अशी ओली चिंता सतत त्यांच्या डोळ्यात दिसते. त्यांचे हाल पाहून या आज-कालच्या संगणक युगात या नवीन जोडप्याकडून झालेल्या चुका पटकन दुरुस्त करण्यासाठी काही "कंट्रोल झेड" आहे का? असा विचार मनात येतो.

वास्तविक हा संसार एक फार पवित्र यज्ञ; फार सोपा पण आणि फार अवघड पण, आपण त्याकडे कसे पाहतो यावर ते अवलंबून आहे चुकूनही काही अमंगल झाले तर ईप्सित फळ-प्राप्ती होत नाही. याउलट प्रत्येकाने अपार कष्ट आणि साधना करून यात समजुतदारपणाची, त्याग भावनेची, जबाबदारीची आणि संस्कार पाळण्याची जितकी उत्कृष्ट समिधा टाकली तितके लवकर आणि उच्चकोटीचे फळ मिळून हा संसाररुपी यज्ञ सफल होतो.
आजकाल मिळणारा पैसा, साधने, वस्तू, उपभोग, करिअर-आव्हान, समोरच्याच्या अपेक्षा, इच्छा, हट्ट, ताण-तणाव या सगळ्यात एक तारतम्य बाळगून, आपल्या जोडीदाराला एक मित्र मानून एका निष्ठेने त्याला साथ देण्याचे महत्वाचे कार्य जर प्रत्येकाने केले तर कुणालाही "घटस्फोट स्पेशियालिस्ट "कडे जायची नौबत येणार नाही.  

आपल्या या समृद्ध भारतीय संस्कुतीची जाण, आठवण आणि शिकवण ध्यानात घेऊन प्रत्येकाने आपली सद्सदविवेक बुद्धी जागृत ठेवून, प्रसंगी त्यागभावना आणि कमीपणा घेऊन आलेला आव्हानाचा क्षण मार्गी लावला पाहिजे. आपल्या जोडीदारा बरोबर स्पर्धा, असूया किंवा कुणाचे तरी ऐकून "आपलाच अधिकार चालला पाहिजे" हा स्वत"ला बुडवणारा विचार मनातून काढला पाहिजे. ज्या फांदीवर बसतोय ती फांदी तोडण्याचे काम करू नये, त्याचा शेवट कपाळमोक्षच होणार आहे.

हे सगळे समजून सुद्धा; शेवटी माणूस आहे चूक होऊ शकते, चूक झालीच तर वेळीच उपाय करणे गरजेचे आहे; प्रेमाचे, विश्वास आणि निश्चयाचे ठिगळ लावले पाहिजे; नाहीतर कापडाला पडलेल्या छीद्राचे रुपांतर कापड ताणले जाऊन; फाटून दोन वेगळ्या ओबडधोबड तुकड्यात व्हावयास वेळ लागत नाही, हे फाटके कापड कुणाच्याच कामी येत नाही, कुणालाच ऊब अथवा निवारा देऊ शकत नाही.

मला वाटते बदलत्या जगाप्रमाणे विचार पद्धती बदलली पाहिजे, नवा जमाना आणि जुने भुरसट विचार चालणार नाहीत. नवा वेग हवा तर नवेच वाहन पाहिजे. त्याप्रमाणे प्रत्येकाने हि गोष्ट लक्षात ठेवावी अशी विनंती आहे, तुमच्या आसपास मित्र/मैत्रिणींमध्ये जर कोण अशा परिस्थितीतून जात असेल तर त्यांना आपण वेळीच सावध केले पाहिजे, एक छोटे भांडण सोडून त्याच्या पलीकडचा मोठा विचार त्यांना करायला भाग पाडले पाहिजे. तर आपण आज केलेल्या या विचाराचा काही तरी फायदा झाला असे म्हणता येईल.

कारण एकूण परिस्थिती पाहता गैरसमज माणसाच्या मनाचा ताबा घेतो, कमीपणा घेणे आजकाल खरेच कमीपणाचे झाले आहे आणि कमी सुद्धा झाले आहे. वाद होतो; पराकोटीला जातो आणि दोन जीवांचा घटस्फोट होतो.

मला वाटते हा दोन जीवांच्यापेक्षा आजकालच्या एकूण परिस्थितीने आपल्या संस्कृतीशी घेतलेला "घटस्फोट" आहे.

© सचिन पुरुषोत्तम कुलकर्णी
sachin.kulkarni78@gmail.com

Comments

  1. farach sundar lekh ahe. ekdam wicharpurvak lihilela n wichar karayala lawnara sudha

    ReplyDelete

Post a Comment

Popular Posts