ll भजन ll - औदुंबराच्या वृक्षातळी स्वामी माझा गुरुराय तो
ll भजन ll
औदुंबराच्या वृक्षातळी स्वामी माझा गुरुराय तो
सज्जनांसी रक्षितो दुर्जनांसी दंडितो
तयापुढे यावया काळही न धजावतो
सदा भक्तांसी तारितो भक्तवत्सल माय तो
औदुंबराच्या वृक्षातळी स्वामी माझा गुरुराय तो ll १ ll
असेन मी इथे जरी, नसेन मी इथे जरी
सतत वर्षते कृपा तयाची ती माझ्यावरी
व्यापुनी ब्रह्मांड साऱ्या असे माझा सांगाती
औदुंबराच्या वृक्षातळी स्वामी माझी माय ती ll २ ll
भक्त कोणी मार्ग चुकता न रागवे तयावरी
पैलतीरा पार करण्या धाडी योग्य मार्गावरी
म्हणोनी निष्ठा सदा असू द्या त्या सावळ्या मूर्तीवरी
औदुंबराच्या वृक्षातळी वसे माझी पंढरी ll 3 ll
स्वामींपुढे दु:ख जैसे अग्निपुढे कपाशी
काय सांगू थोरवी माझा गुरु जो पुण्यराशी
संकट भक्तावरी येता धावून येई तो दयाघन
औदुंबराच्या वृक्षातळी समर्थ माझा गजानन ll ४ ll
समर्थ कृपाभीलाषी,
© सचिन पुरुषोत्तम कुलकर्णी
Comments
Post a Comment