कविता:- कर्म, धर्म आणि मर्म
कर्म, धर्म आणि मर्म
प्रश्न पडतो धर्म कसला, कर्म म्हणजे काय आहे
ज्याच्या त्याच्या वृत्तीप्रमाणे, कर्म करणे मर्म आहे?
रेशमाच्या त्या किड्याला, गुंफिलेले विश्व आहे
विश्व त्याचे अल्प आहे, कसे त्याला पटणार आहे?
राबणाऱ्या गर्दभाला, उकिरडे हे अन्न आहे
कष्टणाऱ्या यश आहे, हे कसे पटणार आहे?
मालकाचा विश्वास जिंकून, श्वान जगती ख्यात आहे
खरेच विश्वासास किंमत, आजच्या जगतात आहे ?
चोरुनी निर्वाह करणे, मांजराचा धर्म आहे
चौर्य करुनी खेद नाही, यात काय तथ्य आहे ?
नित्य उदय नित्य अस्त, हे सूर्याचे कर्म आहे
अस्त होऊनी नूतन प्रभा, हेच त्यातले मर्म आहे
शुद्ध आचार करुनी, जगणे मानस धर्म आहे
कितीही पराजय येओत, लढणे हेच मर्म आहे
कष्ट आणि कर्म करता, उत्तुंग यश हा विश्वास आहे
सत्य धर्माचा आचार करता, सदा प्रभूचा सहवास आहे
© सचिन पुरुषोत्तम कुलकर्णी
sachin.kulkarni78@gmail.com
Comments
Post a Comment