ll भजन ll - गुरु वरदहस्त आहे ना
ll भजन ll
गुरु वरदहस्त आहे ना
गुरु वरदहस्त आहे ना
आठवोनी आठवणींचा, आठव आज का आठवेना
स्मरूनी स्मृती साऱ्या स्मृतीतल्या, आज मजला का स्मरेना
लेवुनी लेणे तुझे ते, आज मजला लेववेना
केलेल्या कृतींची प्रतिकृती, आज मजला का करवेना ll १ ll
निजानंदी निजमनाला, नीज आज निजवेना
खेळलेले खेळ सारे, खेळ म्हणता खेळवेना
मौजीलेली मौज आता, मौजेखातर मौजवेना
बोललेले बोल सारे, बोलविता बोलवेना ll २ ll
शोधलेले शोध सारे, शोधूनी का सापडेना
पाहिलेली स्वप्ने सारी, स्वप्नात आता पाहवेना
पेरीलेले बीज सारे, पेरुनी का अंकुरेना
बोलविता साद देता, हाक फिरुनी का येईना ll ३ ll
वाट पाहता; पाहे वाट, वाट पुढची का दिसेना
जगुनिया जगतात आता, जीव सुखे का जगेना
भासलेले आभास सारे, भासवीता भासवेना
ठेवुनी विश्वास भोळा, विश्वस्त कैसा सापडेना ll ४ ll
चिंतीलेली चिंता माझे, चित्त सोडूनी जाईना
भोगीतसे जे भोग आता, भोग म्हणुनी भोगवेना
दैन्य आले; दु:ख आले, परी हार मी मानीना
अंतरंग सांगताहे, थांब, वेड्या गुरु आहे ना ll ५ ll
येउ दे आपत्ती कितीदा, भोग तरी संपत आहे ना
केली किती मस्ती विपक्षे, तुज तयारी होत आहे ना
केली किती मस्ती विपक्षे, तुज तयारी होत आहे ना
शक्ती किती योजिली विपक्षे, यश त्यांना येईना
ठेव तू श्रद्धा दृढ , तुज गुरु वरदहस्त आहे ना ll ६ ll
श्री गुरु चरणरज,
© सचिन पुरुषोत्तम कुलकर्णी
Comments
Post a Comment