ll भजन ll - जायाचे संत भेटीला, देवाला बघायाला.......
ll भजन ll
जायाचे संत भेटीला, देवाला बघायाला
मला जायाचे संत भेटीला, माझ्या देवाला बघायाला
संत देवाचे ते रूप, देव संतात भरुनी अमूप
डोळा भरुनी पाहू, आता आम्ही त्यांचे रूप ll धृ ll
मला जायाचे शेगावाला; बाबा करी “गण गणाला”
गजानना येतो तुझ्या मी भेटीला
भरून पाहीन मी डोळ्याला ll १ ll
मला जायाचे शिर्डीला, पाहू परब्रम्ह साईला
साई बोले "सबका मलिक एक"
तुझ्या कृपेचा एक तुकडा फेक ll २ ll
मला जायाचे सज्जनगडी , दासांच्या जांब गावी
सज्जनगडी राहावे खूप, रामदास रामरूप
त्यांच्या पादुका सेवाया, त्यांचा कल्याण व्हावया ll ३ ll
मला जायाचे गोंदवल्याला, “राम राम” स्मरायाला
ऐसे भासे गोंदवले; जिथे रामाची पाऊले
रामरायाचे गुणगान गायाला ll ४ ll
मला जायाचे आळंदीला, पहायाचे देहू गावाला
माउली; तुकोबा पाहाया, नामगजर कराया
द्वय संत श्रेष्टी पहायाला ll ५ ll
भेटायाचे गाडगेबाबाला, जो करी “गोपाला गोपाला”
माणुसकी शिकवाया जगाला, बोला “गोपाला गोपाला”
त्याच्या शिकवणुकीचे धडे गीरवाया ll ६ ll
मला जायाचे कोल्हापूरला, माझ्या आईला बघायाला
माझ्या आईची सेवा करायाला
माझ्या मातेला पूजायाला ll ७ ll
मला जायाचे तुळजापूरला, माय भवानी पूजायाला
जरा लढाया शक्ती मागाया
माझ्या आईला भजायाला ll ८ ll
मला जायाचे रायगडी, शिवनेरी, प्रतापगडी
माझ्या लाडक्या राजा शिवबाला
भेटायाला महाराष्ट्राच्या कलीजाला
मागेन जरा शक्ती अन् बळाला, वाटे पुन्हा स्वराज्य बांधाया ll ९ ll
मला जायाचे पंढरपुरी, जिथे पांडुरंग विटेवरी
रखुमाईच्या पायाला डोई ठेवाया
ते सावळे तेज पहायाला ll १० ll
मला जायाचे अक्कलकोटी, स्वामी बोले “मी तुझ्या पाठी”
वडाची धकधक ऐकायाला
त्याचे गोजिरे रूप पहायाला ll ११ ll
मला जायाचे औदुंबरला, तिकडे वाडी, गाणगापूरला
ब्रह्मा विष्णू महेश ओवाळाया
गुरु महाराजाच्या पादुका पूजायाला ll १२ ll
जाईन पिठीकापुराला, पाहाया श्रीपाद श्रीवल्लभाला
दत्तरूप मनी साठवाया
गुरुकृपेची भिक मागाया ll १३ ll
मला जायाचे संत भेटीला, माझ्या देवाला बघायाला
संत देवाचे ते रूप, देव संतात भरुनी अमूप
डोळा भरुनी पाहू, आता आम्ही त्यांचे रूप ll धृ ll
श्री गुरु चरणरज,
© सचिन पुरुषोत्तम कुलकर्णी
Comments
Post a Comment