मुक्तछंद:- देवाला सुद्धा, चमत्काराचा; साक्षात्कार व्हावा लागला.......
मोठ्या घर संकुलांच्या गर्दीत, अनेक लोकांचा राबता होता
बागेच्या पलीकडे कोपऱ्यात, एक सात्विक चौथरा होता
आजूबाजूला आणि दुकानात, फिरणाऱ्या लोकांची अमाप गर्दी असायची
वयस्कर आणि भाविक, अशी तुरळक कुणी त्या चौथऱ्यावर यायची
लहानसा चौथरा, त्यावर कोणता आडोसा केला नव्हता
लहानगी पणती लावण्यास, एक छोटा कोनाडा केला होता
बाकी तप्त आणि चिंब निसर्गाची, बेसुमार वर्षा होती
अशातच लहानगी पणती, संध्येला उजेडाची साथ करत होती
चौथऱ्यावर; चौकोनी आणि लंबगोल आकारांचा, मेळ होता
शेंदुरालेल्या देवाचा, दुर्लक्षित असा तो खेळ होता.
इतर वेळी कोणीच मंडळी, तिकडे फारशी भटकत नव्हती
देवालाच जरा एकाकीपणाची भावना, मनातून वाटत होती
एक दिवस देव म्हणला, चला जरा गंमत करून बघू
आज पहिले कोण येतील, त्यांचे म्हणणे तरी ऐकून घेऊ
देवाला वाटले थोडासा, चमत्कार करून बघू
त्या निमित्ताने, जास्त लोक भेटायाल येतात का बघू
संध्याकाळी काही जण येऊन, नमस्कार करून गेले
जाता जाता मनातील, काही इच्छा नकळत बोलून गेले
त्यातील काही जण, तिथलेच रहिवासी होते
काही फक्त सुट्टीला, भटकायला आले होते
बाहेरच्यांचा एक दिवस, इथल्या नातेवाईकांना; खुशीतच फोन झाला
अहो, तुमच्या इथले ते देवस्थान, खूपच जागृत आहे असा निर्वाळा झाला
आमच्या याचे गा-हाणे, तुमच्या तिथल्या त्या देवाने ऐकले
अहो; इतके दिवसाचे पडीक काम, नेमके तिथे बोलल्यामुळे कसे झाले
म्हणे; एवढी मोठी समस्या, आम्ही तर सगळी आशाच सोडून दिली होती
मनातल्या मनात त्यांना, शेंदुरालेल्या देवाला; परत भेटायची घाई झाली होती
असेच; कुणाचे काय आणि कुणाचे काय, चर्चा वाढत होती
कोपऱ्यावरच्या देवाची, भक्त मंडळी आता वाढू लागली होती
एकूणच सगळ्यांचे अनुभव ऐकून, अंगावर प्रत्येकाच्या शहारा आला
इतके दिवस; देवाचे अस्तित्व कसे जाणवले नाही, याचा बोजवारा झाला.
लगबग झाली; बैठक झाली, काहीतरी करायची तयारी झाली
लहानसेच एक देऊळ बांधायच्या निर्णयावर, सर्वांनी मोहोर उठवली
समारंभाचा दिवस आला, नुसता झगमगाट झाला
इतके सारे भक्त बघून, आज देव सुद्धा खुश झाला
देवाला हवे तसे झाले, धूप-आरत्या झाल्या,
भक्त गण जमू लागले, प्रसाद खिरापती झाल्या
एकूणच काय, भव्य दिव्य असा दिपत्कार झाला
त्यासाठी देवाला सुद्धा, चमत्काराचा; साक्षात्कार व्हावा लागला
© सचिन पुरुषोत्तम कुलकर्णी
Comments
Post a Comment