कविता:- माझ्या घरी घननिळा, श्रावण फुलोनी आहे.......
संसाररुपी वेलीवर बालरूपी फुल उमलणे, हि प्रत्येक आई-बापाची इच्छा असते.
थोडा उशीराच का होईना, पण काहींच्या घरात बाळराजा किंवा एक परीराणी अवतरते.
आपल्या लहानग्या बद्दलचे त्याचे/तिचे मनोगत.......खास करून कामावरून घरी जाताना.
अविश्रांत दिस सरताना, गोकुळीची साद येते
पाहीन कधी साजिरे, दृष्टी पथास आहे ll १ ll
हलकेच घरी जाताना, मंद झुळूक भासे
ओढ अधीर झाली, पाऊलांना वेग आहे ll २ ll
घरचा ध्यास आता, रोजचा वाढला आहे
माझ्या घरी घननिळा, श्रावण फुलोनी आहे ll ३ ll
भाबडे भाव गोजिरे, दृष्टी असीम आहे
निरागस नजरेत भरुनी, परमेश्वर निस्सीम आहे ll ४ ll
विश्वात असा आमुच्या, चैत्र बहरला आहे
परमेश्वरी कृपेचा, घन खास बरसला आहे ll ५ ll
सांजेस तिमीर भरताना, दीप तेजाळला आहे
लहानग्या तेजात सारा, उद्याचा प्रयास आहे ll ६ ll
उपकार त्या विधात्याचे, आमचे भाग्य उदेले
त्याच्याच कृपेने दुडके, पाऊल घरी पडलेले ll ७ ll
© सचिन पुरुषोत्तम कुलकर्णी
Comments
Post a Comment