मनन/चिंतन - उत्कृष्ट शिक्षणाची ध्येयासक्ती असलेला एक वृद्ध तरुण.......

अनेक वर्षांनी भेटीचा प्रसंग आला, मी पेठकर सरांच्या घरी गेलो.
जुनाच सगळा कारभार होता, तरीपण भारावून गेलो

सर घरात बसले होते, कुठलेसे संस्कृत पुस्तक हातात होते
वयाच्या मानाने शिकवणे जमत नवते, पण आयुष्याचा स्वानंद लुटत होते

घरात जाताच सर स्वत: उभे राहिले, स्वागत करून ये बैस म्हणाले
त्यांची वृद्धावस्था पाहून डोळ्यात पाणी आले, आणि नकळत माझे हात त्यांच्या पायाजवळ गेले.

सरांच्या शिकवणीचे दिवस, डोळ्यासमोरून जात होते
पेठकर सर....... चालते बोलते; संस्कृत, मराठी आणि इंग्रजीचे वाङमय होते

अंगात पांढरा बनियन, आणि पायजमा होता
जुना असला तरी, त्यांच्या चारित्र्यासारखा स्वच्छ होता

डोक्यावर तुरळक, अशी पंढरी झालर होती
क्षीण झाली तरी, दृष्टी पूर्ण समाधानी होती

थकलेल्या चालीत, तरी एक आत्मविश्वास होता
त्यांच्या अवतीभवती, एका विशिष्ठ पुण्याईचा वावर होता

कपाळाला छानसा, सुगंधी गंध लावला होता
त्यांच्या आयुष्याचा, एक प्रकारे सुगंध दरवळत होता

अंगावर त्वचेतून, शिरा फुगून दिसत होत्या
तरुणपणी काढलेल्या कष्टाच्या, त्या जणू खुणाच होत्या

वाकलेला थोडा देह, जणू आयुष्याबद्दल आदर दाखवत होता
आणि थरथरत्या हातामध्ये, भरभरून आशीर्वाद होता

गळ्यामध्ये लहानशी, वैजयंती माळ होती
आयुष्य एकदाच येते, छानपणे जगा”, अशी जणू गळ घालीत होती

अंगावरची सगळी हाडे, डोके वर काढून बघत होती
इतकी वर्षे पाय रोवून आयुष्याची लढाई कशी जिंकलो”, हेच जणू सुचवत होती

जुने दिवस आठवले; सरांचा धाक आठवला; शिक्षण कसे असावे, हा त्यांचा हातखंडा विषय होता
संस्कृत आणि मराठी आपल्या भाषा आहेत; त्या आल्याच पाहिजेत, असा त्यांचा आग्रह होता

कुणाकडे पैसे नसतील, तर तो महत्वाचा मुद्दा नसायचा  
पण शिक्षण हे व्यवस्थितच झाले पाहिजे, असा त्यांचा रोख असायचा

शिकवणीमध्ये ते फक्त भाषा, अशी शिकवत नव्हते
माणूस म्हणून कसे जगायचे!!, याचे ते एक विद्यापीठ होते

शिकवणे हे दैवी काम आहे, असेच त्यांचे म्हणणे होते
"जमत नाही, येत नाही" असले काही त्यांच्या आयुष्यातच नव्हते

त्यावेळच्या शिक्षण पद्धतीवर, त्यांचे रोख-ठोक विचार होते
आजच्या मतलबी जगात; ते शिक्षक नाहीत, हे एका दृष्टीने बरेच होते

त्यांना उत्कृष्ट शिक्षक, म्हणून ओळखणाऱ्यांची एक पूर्ण पिढी होती
कर्तुत्व म्हणजे आमच्यासारख्यांची, त्यांनी कितीएक आयुष्ये फुलवली होती

आयुष्यात कितीही संकटे येवोत, मला त्याची धास्ती नव्हती
पेठकर सरांच्या तालमीत, आमची मने सोन्यासारखी झळाळली होती

आता; अनेक वाईट परिस्थितींना तोंड देण्यास, माझा देह तयार होता
कारण; कधीतरी या लोखंडी तुकड्याला, एक "पेठकरी" परीसस्पर्श झाला होता


© सचिन पुरुषोत्तम कुलकर्णी

Comments

Popular Posts