कविता:- सर्व काही चालवणारा, कोण असा सूत्रधार आहे?
सर्व काही चालवणारा, कोण असा सूत्रधार आहे?
आयुष्य कधीतरी, संपणार आहे
कोण जाणे, कसे तरणार आहे
जन्मून कश्याकरता, मारणार आहे?
याचा अर्थ, कोण सांगणार आहे?
बाल्य- तारुण्य, सरणार आहे
कधीतरी वार्धक्य, येणार आहे
सर्व साधून, काय गमक मिळणार आहे?
कधीतरी; या पाठ-कण्याला, आराम असा मिळणार आहे?
शाळा; शिक्षण, उच्च पदव्या,
पगार; बढती, बड्या नोकऱ्या
मुले, घर, गाडी....अरे किती त्या इच्छा
कधी संपणार, अश्या वाढत्या अपेक्षा?
वेड्या गर्दीत, भरधाव धावणे
लक्ष्य नक्की, ठाऊक नसणे
हेच का आहे, आयुष्य जगणे?
राम नक्की, कश्यात मानणे?
जीवन; ध्येय, आयुष्य; फलप्राप्ती
याची आहे, भव्य-दिव्य व्याप्ती
गडबड धावपळ सोडून, एकदा कधी
तपास घेतला, पाहिजे आधी
जन्म कधी? कुठे? कुणाकडे?; हे आपल्या हातात नाही
आयुष्यात काय करावे?,हे सुद्धा आपण ठरवीत नाही
बोचऱ्या दुखा:त, परमेश्वरास बोलणे सोडत नाही
नांदत्या सुखात, त्याला पळभरही आठवत नाही
माणूस जगणे-मरणे, चालणार आहे
निसर्ग; सूर्य; पाऊस; वारा, तसाच असणार आहे
प्रत्येक आयुष्याला, पैलतीर हा असणार आहे
सर्व काही चालवणारा; आयुष्याचा अर्थ जाणणारा, कोण असा सूत्रधार आहे?
© सचिन पुरुषोत्तम कुलकर्णी
Comments
Post a Comment