कविता:- वारा अवखळ तुझी भेट घडवूनी गेला.......
मी झाडाचे, एक एकाकी पान
तू दुसऱ्या, वेलीवरी रममाण
जवळपास माझ्या, किती अनेक पाने
तरी कोणी नाही, मिसळले स्व-मनाने
दिवस उगवूनी, तसाच जातो
वेळ खर्चतो, असा कितीक तो
तू वेलीवरील, कोमल हिरवे पान
तुला दुरूनच, पाहतो वळवूनी मान
मला वाटते, तुला येऊन मिळावे
फांदीस बिलगलो, कसे मी सुटावे
एकदाच काल, वारा स्वच्छंद झाला
तुझ्या वेलीला, तो झुलावोनी गेला
तुझ्या पानावरील, दव बिंदू बिथरले
तुला सोडता सोडता, पुन्हा जखडले
वारा असा काय, काल बेफाम झाला
झुलता झुलता, तुझा एक स्पर्श झाला
जगण्यास माझ्या, असा अर्थ आला
तो रोजचाच वारा, पण मनी भावलेला
असे वाटले वाऱ्याने, रोजच अवखळावे
सारे लता वृक्ष कसे, मस्तीत झुलवावे
त्याकरणे भेट, तुझी होईल
तुझे दव बिंदू, मला हितगुज बोलतील
एखादा दवबिंदू, मी हळूच टिपेन
तरी त्याचा ठसा, तुझ्या पर्णी असेल
बहु वेळ झाला, कशी आशा दिसेना
वाऱ्याचे मला, आज अस्तित्व दिसेना
एकदा स्पर्श होवोनी, मी हरवलो आहे
तुझी वेल कधी झुलते, हे पाहतोच आहे
परमेश्वरास एक, दान मागताहे
देठ पिवळा होणेआधी, एक वाऱ्याची झुळूक मागताहे
© सचिन पुरुषोत्तम कुलकर्णी
Comments
Post a Comment