मनन/चिंतन - आयुष्यातली एक जीवघेणी तडजोड.......

आयुष्यासागाराच्या विराण किनाऱ्याला, एक वेगळ बेट होतं
मोडक्या; ढासळलेल्या जहाजांचे, लांबून विदारक चित्र होतं

पुष्पगुछातून बाजूला काढलेल्या, फुलांचा तो गठ्ठा होता
एके काळी त्यांनी सुद्धा, भरपूर सुगंध आणि आनंद दिला होता

डेरेदार आपल्या आकाराने, अनेकांना सावलीचा; सुखद अनुभव दिला होता
त्याच मोठ्या वृक्षांचा, वयोमानाने आज; कणा करकर वाजत होता

जुन्या पुराण्या गाड्यांच, आता ते एक दालन होतं
एके काळी भरधाव असणाऱ्या गाड्यांच, कुरकुरणार बोलण होतं

आपापल्या घराचा; त्यांनी, छप्पर बनून; उन-पावसात आडोसा केला होता
छप्पर आता जुने झाले, त्यातून कवडसा आणि तुषारांचा पाऊस होता

कोटीकोटी अनुभवांचं, ते विलक्षण गूढ पुस्तक होतं
फक्त; जुनं झाल म्हणून, कुणी त्याला जवळ जाऊन; उघडत नव्हतं

कित्येक पाऊले टाकून, ती; घराजवळ नेणारी; छान मळलेली वाट होती
थोडी पुराणी होती म्हणून, घरच्यांनी ती वाट सोडली होती

शहराच्या मध्य वस्तीत, एका वळणावर; एक कलाटणी होती
बऱ्याच वेळा माझी, त्या रस्त्यावर ये-जा होती

रोजच्या गजबजलेल्या रस्त्यातून, दुरूनच तिकडे; एक नावडीची शांतता भासत होती
ठराविक वेळ झाली कि, पक्ष्यांप्रमाणे, बाहेरच्या बाकड्यांवर, लटपटणारी गर्दी होत होती

खचता खाऊन; पोटतिडकीने, त्यांनी एक पिढी घडवली होती
त्या पिढीवर; आयुष्य जगण्याकरिता त्यांनी, संस्कारांची कवचकुंडलं चढवली होती

नव्या पिढीला नवे संस्कार, त्यांचे नवे जोडीदार; नवे आचार-विचार; पचनी पडले होते
जुन्या भक्कम संस्कारांचे कवचकुंडलं; कधीच गळून पडले होते

जुने ते सोने”, हे; नव्यांना मुळी मान्यच नव्हते 
नव्याचे नऊ दिवस आहेत, हे कुठे त्यांना समजले होते?

विचारांसकट जुने सगळे बदलून, त्यांना अद्ययावत चकाचक करायचे होते
मनातच आपल्या नाळेशी, नाते तोडायचे त्यांनी ठरवले होते

कारण उकरायाचेच होते, किंवा बेमालूम बनवायचे होते
जिथली आवडच संपली, ती निवड आता टाळायचे ठरले होते

बिचाऱ्या जुन्या गोष्टींचे, दिवस आता फिरले होते
स्वत:च्या आई-बापाचे नाव, त्या यादीत पहिले होते

एक दिवस; जुन्या पुस्तकांच्या मजकुराला, नव्यांनी हात घातला
इतके दिवस लिहिलेले, कसे फालतू आहे; हे सांगायचा घाट घातला

सगळे वातावरण बघून, जीर्ण पुस्तके आज; विदीर्ण झाली होती
रात्रभर निखळलेली पाने सांभाळून; एकमेकांना साथ देत, विचारांची फडफड करत राहिली होती

सारासार विचार करता, त्यांना त्यांच्या अस्तित्वाची; अडचण उमगली होती
नव्या पिढीच्या नव्या तोऱ्यातून, आपली पुराणी अडगळ उचलायची, त्यांनी तयारी केली होती

ताज्या दमाच्या पिढीला, हाच थकवा; आणि निरुपाय अपेक्षित होता
त्यांनी पेरलेल्या विषारी वेलीला, हवा तसा अंकुर उगवला होता

वरून आग्रह झाला, माणुसकी एकदम जागी झाली
महिन्याच्या महिन्याला पैसे देऊ, अशी उद्दाम बोलणी झाली

अंगात ताकत नसताना, बिचाऱ्यांना दुसरा पर्यायच नव्हता
नशिबाचे उलटे वारे अंगावर घेत, त्यांनी वृद्धाश्रमाचा रस्ता धरला होता

जीर्ण शरीराचे जुने अनुभव, पुन्हा शर्थीला लागणार होते
स्वत: न खचता; आता नवीन आयुष्य; पुन्हा एकदा उभे करायचे, दोघांनी ठरवले होते

बाहेर जाताना सुद्धा, लटपटत्या चालीत एक धमक; आणि विचारात; एक उभारी होती
स्वत:चे सोडून आपल्यासारख्यांचे, भले करायची; त्या दांपत्याने मनात खात्री केली होती

कर्म; भोग, दैव आणि पुण्याई, याची सांगड मनात बसत नव्हती
थोरल्या लोकांनी आयुष्यातली, एक जीवघेणी तडजोड केली होती 
   
घरातून बाहेर जाताना, घराचा हर-एक कोपरा आज रडला होता
देवघरात असणाऱ्या मूर्तीचा डोळा सुद्धा, आज किंचित ओला झाला होता

© सचिन पुरुषोत्तम कुलकर्णी

Comments

Popular Posts