About Me

"सार्थबोध" साईटवर माझ्या कविता ,भावगीत ,निरुपण ,पोवाडा ,ओवी ,बंदिश ,मुक्तछंद ,लेख ,गवळण ,चारोळ्या आणि गझल तसेच मराठी आणि हिंदी भजन समाविष्ट केले आहेत.

Latest Posts

नवीन लिखाण:-



Saturday, March 9, 2024

सखा - कृष्ण, देह - घडा , पाणी -अंतरंग

 सखा - कृष्ण, देह - घडा , पाणी -अंतरंग 

कृष्णाच्या अनेक लीला त्याच्या बालपणात त्याने केल्या, हा बालगोपाल सर्वांच्या अगदी प्रेमाचा आणि जिव्हाळ्याचा विषय. कृष्ण आणि गोपिका यांचे नाते देखील अगदी विलोभनीय, कृष्णाने त्यांचे दही दूध खावे, आणि लपून बसावे. या मोहक लाडक्या  कान्हाने हे केले तर त्याची तक्रार घेऊन यशोदामाईकडे जावे व गाल फुगवून तक्रारी कराव्यात, पण  कुठेतरी कृष्णाने हा खट्याळपणा केल्याचा आनंद देखील, सगळा भावविभोर भावनांचा खेळ. कृष्ण आणि त्याचे सवंगडी गोपी हे गोपिका पाण्याचे घडे भरून आणल्यावर खडे मारून ते फोडायचे, त्या पाण्याने गोपिका चिंब भिजून जायच्या, पाणी सगळे वाया, कष्ट सगळे वाया. हा प्रसंग तसा अल्लड आणि खट्याळपणाचा. पण सृष्टीचे आर्त आणि विश्वाचे सार जाणणारा हा श्रीकृष्ण गंमत म्हणून फक्त घडे फोडत असेल का !

कि या अवतारात बाललीलांमधून देखील त्याला काही दर्शवायचे होते. या साधा घडा फोडण्याचा आणि सामान्य माणसाच्या आयुष्यातील घटना, त्याचा दृष्टिकोन पाहण्याचा, असा यात काही तत्वज्ञान-विचार सहजेच तर लपला नसेल ना !

प्रसंग तोच आहे, काही गोपिका पाण्याचा घडा भरून जात आहेत, प्रत्येकाला हवा असणारा तो कृष्ण , गोपिकांचे भावुक डोळे त्याला शोधत आहेत, तो दिसला तरी घडा फुटण्याचे भय , नाही दिसला तरी हुरहूर कि कान्हा गेला कुठे. माणसाच्या आयुष्यात आपण यालाच घटना म्हणतो, ती वाईट कि चांगली हि ज्याच्या त्याच्या दृष्टीकोनातून ठरते, पुढे प्रसंग अजून फुलतो, कृष्ण कुठला तरी एक घडा अचूक टिपतो , ज्या गोपिकेचा घडा फुटतो आणि तिची चिडचिड होते, तिने मनात बहुदा आधीच ठरवलेला त्रागा करायची तिला संधी मिळते, पण बाजूलाच असलेल्या तिच्या संख्यांचा घडा हा दुसरा कोणी गोपी फोडतो , त्याचे त्यांना दुःख होते, कि त्या मधुसूदन मोहनाने आमचा घडा का फोडला नाही. आयुष्याची हीच ती बाजू, हे माझ्या बाबतीत का झाले, ते दुसऱ्यांच्या बाबतीत का होते. 

आता जिचा घडा फुटला तिला काय वाटत असेल !, हे असे का झाले, कृष्णाने माझाच घडा का फोडला. कृष्ण सखा या रूपाने तुमची सोबत, तुमचे आराध्य हे तुमच्या भावविश्वात तुमच्या सोबत आहेच, तुमची श्रद्धा तितकी घट्ट असावी. असा तो कृष्ण सखा तुम्हाला पाहतो आहे; लक्ष ठेवून आहे, त्याच्या या सर्व संसारी लीला आहेत तुम्ही काय पद्धतीने पाहता हा तुमचा दृष्टिकोन आहे. जसा हा कृष्ण सखा तसाच आपला देह हा जणू तो घडा आहे, कधी भरलेला असेल तर कधी रिकामा असेल, आणि त्या त्या मानसिक अवस्थेत आपण त्याच्या सोबत त्या लीलेचा भाग झालो आहोत. या देहासच आनंद, दुःख, वेदना, अपेक्षा, मत्सर, आश्चर्य या सर्व प्रसंगांचा अनुभव येणार आहे. 

आता घड्यात पाणी असेल किंवा नसेल, त्याचप्रमाणे आपल्या देहरूपी घड्यात कधी आनंद कधी दुःख असेल, असा हा भाव भावनांचा देह जन्म , चंचल विचारांनी ग्रासलेले क्षण , त्याचप्रमाणे पाणी हे अंतरंग, सर्व आनंद, दुःख आणि इतर भावना हे आपले अंतरंग भरून आहेत, आपण कोण आहोत, कृष्ण नक्की कोण आहे, माझ्या बाबतीत हे झाले, तिच्या / दुसऱ्याचा बाबतीत ते झाले, अमुकच झाले, असेच का झाले, हा सगळं इहलौकिक भ्रम तर नव्हे, हा संसारच भ्रम आहे का? हा कसा मिटायचा , कि कृष्णाने अचूक नेम धरून घडा फोडला, आतील अंतरंग स्वरूप पाणी अंगावर आले, क्षणात सगळा भ्रम निमाला. तो खडा म्हणजे तुम्हाला काही शिकवण्याचे निमित्त, घडा स्वरूप देह सुटल्यावर , हा भ्रम अस्तित्वात राहातच नाही, कोण पाहणार, कुणाला सांगणार. आणि घडा फुटल्यावर कृष्ण तिथून निघून गेला, आता तुम्ही काय करणार, तक्रार करणार कि फुगून बसणार. बरं  उद्या परत पाण्याला यायचे आहेच, नित्य कर्म करायचे आहेच, मग आपण यातून काय शिकलो, नित्य कर्म करा, म्हणजे भ्रमात राहू नका, जी साधना आहे ती करत राहा, आसक्त राहा कि विरक्त राहा, हे ज्याच्या त्याच्या विचार प्रक्रियेवर अवलंबून आहे, हा साधा प्रसंग आहे, पण आपण अर्थ पाहायला गेलो तर फार पारमार्थिक अर्थ यात दडला आहे असे मला वाटते. कृष्णाने या साध्या गोष्टीतून आयुष्याकडे कसे पाहायचे हे सुचवले तर नसेल ना. गीता वाचून लगेच समजत नाही, तसेच या प्रसंगात देखील त्याने सुचवले पण आपले लक्ष्य गेले नाही असे असेल का?

थोडक्यात अगदी चार ओळी लिहायच्या तर,

देह जन्म घड्यासम,
पाणीयाचे अंतरंग   I
सुखाने भरोनी, दुःखाने उरोनी
खडा मारी फोडी भ्रम... कान्हा II 

जय श्रीकृष्ण
-सपु - सचिन पु. कुलकर्णी 

LIKE Saarthbodh !!!