About Me

"सार्थबोध" साईटवर माझ्या कविता ,भावगीत ,निरुपण ,पोवाडा ,ओवी ,बंदिश ,मुक्तछंद ,लेख ,गवळण ,चारोळ्या आणि गझल तसेच मराठी आणि हिंदी भजन समाविष्ट केले आहेत.

Latest Posts

नवीन लिखाण:-



Thursday, October 7, 2010

लेख:- मी गर्दीत वाट हुडकतोय.................

Article published on Antaraal.
http://antaraal.com/e107_v0617/content.php?content.2464
---------------------------------------------------------------
मी गर्दीत वाट हुडकतोय.................
© सचिन पुरुषोत्तम कुलकर्णी

रोज सकाळ होते, मी जागा होतो, पूर्वीही सकाळ व्हायची मी जागा व्हायचो.

उठून शाळेत जायचो, गर्दीत सामील व्हायचो,
बे एके बे पासून १० वि पर्यंत मी गर्दीत चालत राहिलो,
लोक
वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतात म्हणून मी ही घेत राहिलो, आणि अमुक एक क्लास चांगला आहे म्हणून मी पण जात राहिलो.

शाळा झाली, सगळे ११ वी /१२ वी करतात म्हणून मी ही केली, सगळे जण ढीग भरून फॉर्म भरतात म्हणून मी ही भरत राहिलो.
शेवटी काय मी पण गर्दीत चालत राहिलो. ........................

१२ वी नंतर सगळे कंप्यूटर क्षेत्रात जातात म्हणून मी पण गेलो.
अमुक यांचा तो आणि तमुक यांची ती सध्या एम
एनसी कंपनीमधे असते ,इतके हजार पगार मिळतो हे ऐकत राहिलो, मी पण त्यांच्यातलाच व्हायच्या तयारीला लागलो.

अरे तो यूएस ला गेला, हा यूके हून आला , तो युरोप मधे सेट्ल झला हे ऐकत मी पण इंजिनियर होत गेलो. सगळे कॅम्पस मधे जातात तसा मी पण गेलो आणि पुन्हा एकदा त्याच गर्दीत एक `दिवस सॉफ्टवेर इंडस्ट्रीमधे उभा राहिलो.
शेवटी काय मी पण गर्दीत चालत राहिलो............................

लहान पणापासून गर्दीचा संस्कार झालेला मी असाच आयुष्यात वाहत गेलो.
माझेही इंडक्षन झाले, काम झाले, कष्ट झाले, अप्रेज़ल झाले, मॅनेजरला शिव्या देणे झाले, ३/४ स्विच झाले, पॅकेज वाढले.
मी एक पक्का सॉफ्टवेर इंजिनियर झालो. मी पुर्वी सचिन पुरुषोत्तम कुलकर्णी मधला "सच्या" होतो आता " एस. के." झालो आहे. आता सगळ्या गोष्टी पैश्यात मोजू लागलो आहे.

एक दिवस लक्ष्यात आले की मी गर्दीत आहे खरा, पण मला कोणी जवळचा नाही, वीकेंडला रस्त्यात कुठे भेटेल तिथे उभे राहून माझ्याबरोबर ३/४ तास गप्पा मारणारा मित्र नाही.
मी पण आता अगदी मित्रच नसले तरी पण कलीग बरोबर रिकामा वेळ घालवतो, वीकेंडला फालतू गप्पा आणि लंच/ डिनरसाठी तडफडतो.

घरात पण मी नसतो कारण रोज १२/१३ तास गर्दीत असतो,२ दिवस मिळतात म्हणून घरातले वीकेंड ला मला “”जाउ दे त्याला निवांत”” म्हणून सोडून देतात. असा मी आज काल गर्दीत असलो तरी एकटाच असतो.
आज काल मी टिपिकल सॉफ्टवेअरवाला झालो आहे, माझी कंपनी, माझे पॅकेज, माझे डेसिग्नेशन, माझा वेरियबल, माझा बुक केलेला फ्लॅट, त्याचे प्रोग्रेस मधील फोटो, माझी यूके वारी त्याचे तेच ते पकाव पीकासा वरचे आल्बम, माझी कार………..सगळ्याना दाखवत बसतो…. पण का काही कळत नाही कुठे तरी मनात कुरकुरतो, …....

मला ढीग भरून स्क्रॅप येतात, ऑरकूट /फेसबुक वर शेकडो फ्रेंड्स भेटतात, सगळे स्क्रॅप शेवटी केरात जातात आणि फ्रेंड्स हे फक्त फ्रेंड्सच राहतात. त्यातलाच कोणी काय भावा कुठे असतोस ये की चा मारू हे बोलत नाही, आणि आज काल काका-काकी
कुठ तुझ्याकड की गावाकड असले प्रश्न पण विचारत नाही. कोणी फोन करून लेका गावाकड ये कि एकदा, किंवा यंदा तरी जत्रेला ये कि भावा असे पण म्हणत नाही,

मला कोणीच ऑरकूट वरचा ये की मर्दा घराकड एकदा जेवाय असे पण म्हणत नाही, आम्ही ढीग आउटिंग /पार्ट्या करतो पण त्याची मजा यात नाही. गावाकडे आहेत काही मित्र, पण मी तिकडे जात नाही, आज कुठे तरी हुरहूर वाटते आहे की मी माझे पक्के दोस्त गमावल्याचे, ते गावाकडचे असले म्हणून काय झाले त्या हाकेसारखी आर्तता इथल्या फ्रेंड्सच्या
इनव्हीटेशन मध्ये जाणवत नाही.

लोकही माझे मेल/स्क्रॅप/ पीकासा आल्बम पाहतात आणि ते पण;
च्यायला हा ऑनसाइट जाऊन आला वाटते असे म्हणत फोटो न बघता लॉग ऑफ मारतात , त्याना फार आवड नसते बघायची, एखादा कॉमेंट टाकून बस गर्दीचा नियम पाळत असतात.

गर्दीत राहून पण मी आज एकटा आहे………नावाला फक्त लोक गर्दीत उभे आहेत, आयुष्यात एक वेळ अशी येते की ही गर्दी कामात येत नाही, कलीग म्हणणारे तुमचे जवळचे तुमच्या सुखात नक्की एन्जॉय करायला येतील, पण दुखा:च्या वेळची ग्यारेंटी नाही. पण
 जाणो; हे गर्दीतले लोक सुद्धा कधीतरी दु:खी होतील, त्या वेळेला कलीग, डिलीवरेबल्स, मीटिंग्समधे व्यस्त असतील आणि वीकेंड ऑलरेडी प्लान झाला रे.... सॉरी... असे म्हणत कलटी टाकतील. सॉफ्टवेअरवाला झाला म्हणून काय?? दु:ख कधी तरी येतेच त्याला तुम्ही इंस्टालमेंट अमाउंट देऊन टाळू शकत नाही. प्रत्येक अडचण पैश्याने सोडवता येत नहीं.
अश्या वेळी लागतात ते फक्त मित्रच, जे बिचारे कधी कलीग नसतात अणि ते कुठल्याच गोष्टी पैश्यात मोजत नसतात.

मी विचार करतो की मी या गर्दीत का चालत राहिलो??सगळे करतात तेच बरोबर असेल, जे काय व्हायचे ते सगळयांचे होईल, या गर्दीच्या फुटकळ तत्वावर विश्वास ठेवत राहिलो.
काय असते ही गर्दी? इयत्ता १ ली ते …..इंटरव्यू राउंड पर्यंत काय करते ही गर्दी?? कोण ठरवतो यांची दिशा? या गर्दीत कोणच कुणाला ओळखत नाही......पुढचा चालतो म्हणून मागचे चालतात........आणि मागे खूप लोक आहेत म्हणून पुढचा चालत राहतो.

आपण जगत नाही आहोत आपण आपल्याला जगवत आहोत, कशासाठी ते कुणालाच माहीत नाही, मी माझे वैयक्तिक आयुष्य विसरत चाललो आहे का? मला पक्के मित्र मिळत नाहीत का? का मीच त्या वाटेला जातच नाही. विचार करून डोके दुखु लागले , उपाय म्हणून कायतर मशीनची हॉट कॉफी मारुन स्मॉकिंग झोन मधे कलीगला घेऊन चक्कर मारुन आलो.

पण आता ठरवले आहे……काही तरी केले पाहिजे, जुन्या आयुष्यात परत गेले पाहिजे, का मी
जाऊ शकत नाही? माझे डेसिग्नेशन मला आडवे येते का?? कोण मला आडवणार? का नाही मी सुखी एवढे पैसे मिळवून, का नाही मला कोण अगदी जवळचा मित्र इतके सगळे कलीग असून?

बरेच काही हरवलय........बरेच काही गमावलय.............नक्की कुठे वाट चुकली हे पण कळत नाहीए........गर्दी कुठे तरी जाते म्हणून मी माझे स्वत:चे असे सगळे सोडून गर्दीतला दर्दि झालोय..........गर्दी करते ते सगळे नियम पाळायला लागलोय.

कधी तरी या कळपातून वेगळा रस्ता काढून बाहेर जायचे आहे.
बसस्स.......आता ...ठरवले आहे…आणि सुरुवातही केलेली आहे, कलीग म्हणतात हा आजकाल वीकेंड ला येत नाही बरोबर, हा थोडा वेगळाच वाटतो आहे, लास्ट वीक म्हणे तेच्या गावी गेला होता तिथे सुट्टी टाकून त्या लोकांबरोबर राहिला. आज काल म्हणे पुन्हा पेटी वाजवायला विठ्ठल मंदिरात जातो, ए हा असा का करतो? या वेळी वारीला सासवडपर्यंत पायी गेला होता म्हणे, अजुन काय तर या वेळी म्हणे पुन्हा गणपती मंडळात ढोल वाजवायला जाणार आहे, हे हा खरेच असे करणार आहे?

मी थोडा वेगळा झालो आहे, गर्दीत आत्ता थोडी
कुरबुर 
आहे , अगदी मान खाली घालूनच चालत आहे..........लोक वाट चुकलेला का म्हणेना मला……पण मी मान खाली घालून माझी वाट शोधत आहे.

एकदा विचार करा मित्रांनो या सगळ्या गडबडीत आउटकम काय?? समाजात फक्त आपण आपल्या नावावर काही
स्क्वेअरफूट
घेण्यासाठी धडपडत आहोत काय??  का उगाच फ्रेंड्स ग्रुप वरचे फ्रेंड्स काउंट दाखवून स्वत:चे समाधान करत आहोत काय?

मला पुन्हा "एस.के." नाव सोडून सच्या व्हायचे आहे........

© सचिन पुरुषोत्तम कुलकर्णी

2 comments:

  1. Ka saglyanna ase vaat chukalyasarakhae jhale aahe?
    Ki pratyek jan swataha sathi na jagata dusryanchya apekshansathi jagat aahe?
    Dusrya-sathi jagata jagata agadich waat harawun gela aahe,
    Chala re chala sagalyanbarobar ase mhanatana garditahi ekta padat chalala aahe?

    ReplyDelete

LIKE Saarthbodh !!!