About Me

"सार्थबोध" साईटवर माझ्या कविता ,भावगीत ,निरुपण ,पोवाडा ,ओवी ,बंदिश ,मुक्तछंद ,लेख ,गवळण ,चारोळ्या आणि गझल तसेच मराठी आणि हिंदी भजन समाविष्ट केले आहेत.

Latest Posts

नवीन लिखाण:-



Friday, July 26, 2013

लेख - ४ निमिष, ३९ क्षण - अग्निसराव

आमच्या संस्थेत (कंपनी) अग्निसराव (फायर ड्रील) नुकताच पार पडला, त्यातील एकूणच अनुभव इथे मांडत आहे. लेख मुद्दामच पूर्ण मराठीत लिहित आहे, काही शब्दांना कंसात पर्यायी आंग्ल शब्द लिहिले आहेत. या लेखातील नावे / व्यक्ती काल्पनिक आहेत, कुणाचा संदर्भ जुळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.  

आमच्या संस्थेत सहामाही अग्निसराव असतो, या सरावात मी एक सहायक/अधीक्षक (फायर वॉर्डन) म्हणून काम करतो. मागल्या वर्षी देखील मी हे काम केले होते. या वर्षी गेल्या महिन्याभरापासून पुन्हा बैठका (मिटिंग) चालू झाल्या. नेहमीप्रमाणे मारून मुटकून/ भरीला पडून काही लोक सहायक म्हणून तयार करावे लागले, काही स्वत:हून आले. आपल्या देशात स्वत:च्या आयुष्याचीच मुळी लोकांना किंमत नाही, आणि एकूणच एखादी प्रक्रिया/शिस्त पाळायची उदासीनता हि यातून प्रकर्षाने जाणवली.

सुरुवातीच्या बैठकीला बिचारा संस्थेचा व्यवस्थापक (ऐडमिन) आणि तीन-चार टाळकी (मी त्यातील एक सुपीक) उपस्थित होतो.काही केल्या लोक येईनात. व्यवस्थापक फारच उदास आणि वैतागला होता, लोक नसले कि कामाचा असा विचका होतो ! हे समजले.मी त्याला म्हणालो तू नको काळजी करू; पुढच्या वेळी सगळे लोक आणि तीन-चार जास्तच येतील; मी तुला खात्री देतो. हे ऐकून तो एकदम चपापला, मला म्हणला कसे काय? मी म्हणालो मी सगळ्यांना सांगेन कि या हे खूप महत्वाचे आहे, आग लागल्यावर कायकरावे हे माहित असायलाच पाहिजे वगैरे वगैरे....तो फार आनंदी झाला नाही कारण हे सरकारी भाषण त्याने 
सगळ्यांना आधी ऐकवलेहोतेच, त्याला मनात वाटत होते कि फार लोक येणार नाहीत. तो म्हणाला उद्या याचवेळी परत बैठक (मिटिंग) घेऊ, सगळ्यांनीआपल्या आपल्या मजल्यावरील इतर सहायकांना कृपया आणा. मग बाकी लोक निघाले मी हळूच व्यवस्थापकाला बाजूला नेले आणि त्याला माझ्या डोक्यातील कल्पना सांगितली आता जरा त्याच्या डोळ्यात आनंद आणि डोक्यात प्रकाश पडलेला जाणवला; त्याला आता लोक येतील अशी जर आशा वाटू लागली. 

आम्ही निघालो, मी जागेवर जाऊन व्यवस्थापकाला निरोपकावर (मेसेंजर) संदेश दिला (पिंग केले), कि उद्या सगळे लोक येतील, फक्त मी सांगितले तसे कर; तुझे नाव येणार नाही... पण कोणी काही म्हणलेच तुला; तर फक्त "हो; विचार चाललाय" असे म्हण. मी त्याला जे सांगायचे ते आधी सांगून टाकले होतेच. मी संध्याकाळी जी सकाळची तीन-चार टाळकी होती त्यांना घेऊन चहाला गेलो आणि सहज एकाला म्हणालो; अरे! तुझ्या सदऱ्याचे माप/ क्रमांक ( टी-शर्ट साईझ) काय आहे रे?. तो म्हणाला, का रे? एकदम मधेच सदरा का आठवला तुला? मी म्हणालो; अरे आता मिळणार ना सदरा- (टी-शर्ट!) मग योग्य मापाचा नको का मिळायला?. तो म्हणाला कसला सदरा (टी-शर्ट)?, मी म्हणलो; अरे आपण अग्निसरावमधे मदत करणार आहोत ना! मग 
आपल्याला एक एक सदरा देणार आहेत. बास!!! झाले सगळ्यांचे कान उभे राहिले. मला विचारले; कोण म्हणले?? कोण म्हणले??, मी म्हणलो, अरे... कोणी म्हणाले नाही पण मी मगाशी व्यवस्थापक समूहामध्ये (क्युबिकल) गेलो होतो तिथे कोणीतरी एकजण बाबा....म्हणत होता , कोण होता ते दिसले नाही. मी दुसऱ्याशी पाठमोरा बोलत होतो ना; काय माहित!.काय आहे!

मी आणखी वर पावशेर हाणला कि जे आले नाहीत त्यांना आता सांगायला नकोच; जे इथून पुढच्या सगळ्या बैठकांना हजार राहणार आहेत त्यांनाच सदरे मिळणार आहेत. आता आपण हे कुणालाच सांगयला नकोच, आपणच आता फक्त सदरे घेऊ छान पैकी, काय रे? मी हळूच म्हणालो! नेहा तू केद्याला बोलू नकोस हं आणि राहुल तू पण प्रीतीला बोलू नकोस. बसू दे त्यांना तसेच, आले नाहीत ना मिटींगला जरा खिजवूच त्यांना. झाले माझी गोळी योग्य ठिकाणी लागली होती. नेहा केद्याला आणि राहुल प्रीतीला न बोलल्याशिवाय राहणे शक्यच नव्हते. चहा झाला आणि सगळे आपापल्या जागेवर गेले, नेहा, राहुल; केद्या आणि प्रीतीला अनुक्रमे निरोपकावर पकडून पकडून सदरयाबद्दल सांगत होते. माझे त्यांच्याकडे बारीक लक्ष होते, जणू काहीतरी कडक आतली बातमी हाती लागली आहे; असा बातमीदाराचा आव आणून दोघे एकदम सुसाट सुटले होते. हेच कारण काढून राहुलने प्रीतीला चहा प्यायला उपहारगृहात नेल्याचे मी पाहिले. त्याला पण तिच्याबरोबर जायला कारण हवेच होते. मी मजा बघत होतो. दुसऱ्या दिवशी बैठकीच्या स्थळी काय सांगू भावांनो-बहिणींनो आमच्या आधी वीस एक लोक तिथे आधीच सरड्यासारखे तत्परतेने येउन उभे होते, इतर वेळी कलटी हाणणारे लोक एका टी-शर्ट पायी आगीशी खेळायला तयार झाले होते ..हा हा हा !!!. केद्या आणि प्रीती हे अनुक्रमे त्यांच्या त्यांच्या बातमिदाराबरोबर छायाचीत्रकारासारखे (क्यामेरामन राहुल के साथ प्रीती .....अशा पद्धतीत) उभे होते. केद्या आणि प्रीतीच्या डोळ्यात आपल्या मित्रानी/ मैत्रिणीनी आपल्याला काय भारी गोष्ट मिळणार याची आतली बातमी सुमडीत दिल्याबद्दलची सद्भावना म्हणा प्रेमभावना म्हणा डोळ्यात चमकत होती.
आम्हाला सरावाच्या दिवशी आम्ही सहायक आहोत अशी ओळख इतरांना पटावी म्हणून पिवळे चकाकणारे अंगरखे आणि गळ्यात "अग्निसराव सहायक" असे छोटे ओळखपत्र (आयडी कार्ड) असलेली माळ घालायला दिली, आधीच संस्थेच्या नावाचे मंगळसूत्र (आयडी कार्ड) किंवा कमरेला छल्ला (योयो- खेचली जाणारी गोलाकार वस्तू ) होताच, त्यात हि भर. 

आमची ती बैठक यशस्वी पार पडली, व्यवस्थापक माझ्याकडे बघून हसला; त्याला नंतर एकट्याला सुमडीत घेऊन मी लोकांना आधी बोलल्याप्रमाणे अग्नीसरावासाठी येण्याबद्दल कसे पेटवले हे सांगितले; माझी करामत विसकटून सांगितली. तसा तो पण एकदम खुश झाला.तो म्हणाला; अरे! नंतर लोक म्हणतील ना! काय झाले सदऱ्याचे, मग काय उत्तरे देणार?, मी म्हणालो "तुमच्या पूर्ण समूहात मी फक्त असे सदऱ्याबद्दल ऐकले आहे आणि कोण बोलले ते मी पहिले नाही"; हे मी आधीच सर्व लोकांना स्पष्ट केले आहे. आणि मी म्हणालो मेल्या..इतकी वर्षे हे काम करतोस ना...लोकांना सांगायचे आर्थिक अडचणी (बजेट इशु) आहेत. लोक गप बसतील रे ! तू नको काळजी करू . माझे हे असले सरकरी उत्तर ऐकून त्याला पण आधार वाटला. नंतरच्या बैठकीत आमचा बाकी सगळा ठराव ; "काय करायचे, काय नाही करायचे" याचा सराव झाला. अग्निसरावाची तारीख ठरली. कुणी कुठल्या बाजूच्या लोकांना कुठल्या जिन्यातून बाहेर काढायचे; उपस्थित लोकांची आधी जाऊन संख्या (काउंट) घेणे, बैठक खोल्या (मिटिंग रूम), प्रसाधनगृहात (टोएलेट) कोणी पहायचे? या सगळ्याची महिला आणि पुरूष प्रकारात योग्य विभागणी केली.

पण काही फितुरांनी अग्निसरावाची तारीख आपल्या जवळच्या मित्रांना-मैत्रिणींना सांगितली असावी- कारण सरावाच्या एक चतुर्थांश प्रहर (पंधरा मिनीट) आधीच; बरेच लोक उदवाहन (लिफ्ट) वापरून खाली टपरीवर जाताना दिसले. हा सगळा विचित्र प्रकार आहे, लोकांना स्वत;च्या सुरक्षेच्या गोष्टी तरी समजून घ्यायची मानसिकता अंगात यायला किती काळ लोटावा लागणार आहे! हे देवासच ठाऊक.

मी तयार होतो. मला मागच्या वर्षीचा अनुभव पाठीशी होताच, पण मागच्या वर्षी माझी एक-दोन लोकांबरोबर कचकच झाली होती, एक-दोन साहेब लोकांनी (म्यानेजर) मला उडवून लावले होते; कसले अग्निसराव करता?, आमची महत्वाची कामे सुपूर्त करायची (टास्क डिलिव्हरी) वेळ आहे आज- वगैरे वगैरे. मी जरा गडबडला होतो त्यावेळी..बघा आम्हाला असे आदेश आहेत; कुणी वर राहता कामा नये, सगळ्यांनी खाली जायला हवे वगैरे वगैरे..... मी अडखळत बोललो होतो, पण त्या साहेबाने माझे ऐकले नव्हते आणि काम करत बसला होता, त्याचे इतर एक-दोन लोक पण मग टरकून थांबले होते आणि मी तिथून सटकलो होतो. पण 
यावर्षी मी मुरलो होतो, आधीच खात्री करून घेतली; तो साहेब नव्हता; बहुतेक संस्था (कंपनी) सोडून गेला असावा! पण तसल्या जातकुळीचे एक-दोन जण; चेहऱ्यावरूनच खाष्ट वाटणारे; लोक मला दिसले होते. 

मी एकाचे नाव लक्षात ठेवले होते. झाले ती घटिका आली "किर्र-टीर्र", "क्यांव-ट्यावं" भोंगे आणि इतर सहायकांच्या शिट्ट्या वाजायला लागल्या, मी जोरजोरात ओरडू लागलो, चला जागेवरून उठा !!! हा आग लागल्याचा इशारा आहे, उठा !!!(क्षणभर एवढा उद्दीपित झालो कि उठा !जागे व्हा!! स्वातंत्र्य मिळवा !!! असे ओरडावे कि काय इतके माझ्या अंगात संचारले होते), जागा सोडा आणि या बाजूने जिन्याच्या डाव्या बाजूने तळ मजल्यावर चला, उठा!!! मी पुन्हा जोरजोरात ओरडू लागलो. एक-दोन लोक जागेवर फक्त सरकले, काही लोक नुसतेच कबुतरासारखे इकडेतिकडे माना हलवून बघू लागले, काही जण निवांत डुलकी मारायच्या तयारीत होते; ते मनातल्या मनात (अरे!! काय हे??) असे बोलताना चटकन दिसून गेले. काही जण भ्रमणध्वनी (मोबाईल) बघ, बाजुच्याकडे बघून हसणे; असले प्रकार करू लागले. स्त्रीवर्ग एकूणच या सगळ्यापासून अनभिज्ञ आणि अरसिक दिसत होता.

मी लांबूनच ज्या साहेबाचे नाव लक्षात ठेवले होते; त्याचे नाव ओरडून म्हणालो, हरी!!! ऐकू येत नाही का भोंगा 
वाजतोय? चला उठा जागेवरून, मजला रिकामा करा. हरी जागेवरून न उठता म्हणाल आमचे महत्वाचे काम पूर्ण करायचे आहे; झाले मला वाटले होते तेच झाले, याने नाट लावलाच, त्याचे इतर सहकारी पण उठले नाहीत. एवढ्या सगळ्यात ६० क्षण (सेकंद), एक निमिष (मिनिट) पेक्षा जास्त वेळ गेला होता. पण मी पूर्ण तयार होतो, मी त्याला जोरदार आवाजात उत्तर दिले; हो! तुम्ही काम पूर्ण कराल; पण सुदैवाने जगलात तर. आता मात्र हरी चपापला, त्याला एकदम हा चेंडू डोक्यावरून गेला, अं अं पण हा सराव (प्रक्टिस सेशन) आहे! असे पटकन म्हणला, मी म्हणालो सराव केलात तर सराव होईल खऱ्या आगीच्या परिस्थतीत तुम्हाला काय करावे याची माहिती आहे का? संस्था (कंपनी) हे सर्व तुमच्या सुरक्षेसाठी करते; तुम्हाला जाणीव असायला हवी याची. मी हरीला अक्षरश: सुनावत होतो; हरी भजन ऐकल्याप्रमाणे माझ्याकडे फक्त बघत होता. मी त्याला वर अजून उकसवला म्हणालो तुमच्या सारख्या अनुभवी आणि ज्येष्ठ (सिनिअर) माणसाने असे वागले तर तुमचे सहकारी/अनुयायी (टीम मेंबर) आदर्श रोल मॉडेल) ठेवतील?,  मी त्याची ज्येष्ठता दाखवून त्याच्या वर्मावर बोट ठेवले होते. तुम्ही संस्थेचे धोरण/नियम पाळण्याची अशी प्रथा पाडून देणार आहात काय बाकीच्यांना?... मी अजून आवाज चढवला; हरी चरफडला माझ्यावर. काहीतरी निरुपयोगी (युसलेस) वगैरे असे वैतागून म्हणत संगणक(ल्यापटोप) उचलायला लागला. मी पुन्हा ओरडलो संगणक महत्वाचा नाही साहेब तुमच्या आयुष्यापेक्षा. त्याने माझ्याकडे सूचक नजरेने; रागाने बघितले असावे असे मला वाटले, कि तुला बघतो नंतर पगारवाढीला (अप्रेजल) वगैरे वगैरे...पण मला काय फरक पडणार होता, त्याच्या आणि माझ्या कार्यक्षेत्राचा (डोमेन) दुरुदूर संबंध नव्हता......तो माझा कधी साहेब झाला नसता ....हा हा हा...जाम मज्जा आली. 

हरी जागेवरून निघाला होता, मी शिखर सर केले होते जणू. त्याचे बाकीचे अनुयायी "आपल्या साहेबाला ओरडणारा हा कोण माणूस?" अशा नजरेने माझ्याकडे बघू लागले. कोणीतरी आपल्या साहेबाला टर्रीबाज दम भरलाय; आपण हे "याची देही; याची डोळा" पाहतोय; असा विलक्षण अप्राप्य आनंद त्याच्या हाताखाली काम करणाऱ्या लोकांच्या डोळ्यात तरळून गेलेला दिसला. आता मला दहा हत्तींचे बळ आले, मी खेकसलो... अरे उठा, सगळ्या वस्तू इथेच सोडा, आणि चटकन खाली उतरा, पळू नका; शिस्तीत जा. झाले मी सगळ्यांना जागा सोडण्यास भाग पाडले; मग मी बैठकीच्या खोल्या, पुरुष प्रसाधनगृह तपासले; त्यावर पिवळे 
चिकटणारे कागदाचे चिटोरे (यल्लो पोस्ट इट स्टांप) चीटकवले; जेणेकरून इतर; दुसऱ्या तपास फेरीच्या सहायकांना कळावे कि इथे कोणीतरी तपासून गेले आहे. मी पण भोकरातून बी सटकावी तसा सटकलो आणि खाली तळमजल्यावर गेलो. तिकडे जमलेल्या लोकांना रांगेत उभे करून; "तुमचे आयुष्य महत्वाचे आहे", तुम्ही काय काळजी घ्यावी?; अग्निसरावाला का पाठींबा द्यावा?, अग्निसरावाचे महत्व; फायदे; उद्दिष्ट; आगीपासून कसे वाचायचे याची महत्वाची आणि उपयुक्त माहिती/ धडे दिले जात होते.

मी माझा अहवालाचा कागद (रिपोर्ट) संस्था मुख्यव्यवस्थापकाकडे दिला; त्यावर त्याने "४ निमिष, ३ क्षण" (४मिनिट, ३ सेकंद); अशी मी हजेरी/पोहोच (रिपोर्टिंग) दिल्याची वेळ टाकली; त्याने माझे आभार मानले; मी पण त्याचे आभार मानले. एकूणच मी आता या अग्नी सरावाला आणि तो सराव पूर्ण करण्याच्या पद्धतीला चांगलाच सरावलो होतो.

माझा यावर्षीचा सराव चांगला आणि दिलेल्या उद्दिष्टाच्या वेळेत झाला होता. भले कोणी अनोळखी हरी माझ्यावर चरफडला 
होता; पण खऱ्या श्रीहरिला स्मरून मी माझ्या कर्तव्यात; माझे १००% योगदान (काँट्रीब्युशन)दिले होते, याचा मला जास्त 
आनंद होता. 

© www.saarthbodh.com
सचिन पु. कुलकर्णी
FB ID - sachin.kulkarni78 

3 comments:

  1. सचिन खूप च छान लिहले आहेस रे, हा खूप साधाअनुभव तू खूप छान शब्दात मंडला आहेस मला आवडले, आमच्या इथे पण ही उदासीनता आहे च.....मला आवडलेला भाग म्हणजे सदरा दिल्याशिवाय कोणी यायला तयार नाही ........सगळी कडे या बदल्यात मला काय मिळताय ही भावना खूप जोर पकडतीये.....खूप छान.....

    ReplyDelete

LIKE Saarthbodh !!!