About Me

"सार्थबोध" साईटवर माझ्या कविता ,भावगीत ,निरुपण ,पोवाडा ,ओवी ,बंदिश ,मुक्तछंद ,लेख ,गवळण ,चारोळ्या आणि गझल तसेच मराठी आणि हिंदी भजन समाविष्ट केले आहेत.

Latest Posts

नवीन लिखाण:-



Tuesday, June 7, 2011

मुक्तछंद:- जगावेगळ्या लोकांची आगळीवेगळी वाट असते

Poem published on Antaraal.
http://antaraal.com/e107_v0617/e107_plugins/custom_ant_articles/2011/Sep2011_kavita_SK.pdf
--------------------------------------------------------------------------------------------
शेकडो लाखो लोकांची, जगायची एकच पद्धत असते
एका ठराविक साच्यातून, आयुष्य नेमाने सरत असते
जगावेगळ्या लोकांची, संख्या अगदीच तुरळक असते
त्यांच्या जगण्याची वाटच, आगळीवेगळी असते

कोणाचा तरी "ग्रुप", चिमण्यांची संख्या वाढवायला धडपडत असतो 
कोणतरी माणूस; पक्षी आणि मोरांसाठी, धान्य गोळा करत असतो
असाच कोणीतरी जंगलात, प्राण्यांच्या पाण्याची व्यवस्था करत असतो
कोणीतरी जखमी प्राण्यांवर, उपचार करत फिरत असतो

एखादा झपाटलेला, मेलेल्या प्राण्यांवर; अंत्यसंस्कार करत असतो
कोणीतरी एखादा, अडकलेले मृतदेह बाहेर काढत असतो
कोणतरी रस्त्यावर, स्वच्छता करत फिरत असतो
कोणीतरी अडकलेली, वाहतूक सोडवत असतो

कोणाचा तरी संघ, वनवासींचे कल्याण करत असतो
कोणतरी भला माणूस, भटक्या विमुक्तांचे भले करत असतो
कोणाची तरी परिषद, विद्यार्थ्यांचे भले करीत असते
कोणी तरी भला, माणसातला माणूस शोधत असतो

आमट्यांचे पूर्ण कुटुंब; माणसातल्या आणि प्राण्यातल्या, देवाची सेवा करत असते
मेधाताईंच्या आयुष्याची समिधा, नर्मदामाईच्या सेवायज्ञात पडलेली असते
रामदेवबाबांनी योग साधून, समाजाचे आरोग्य सुधारलेले असते
सिंधूताईंच्या परिवाराची संख्या, काही हजारात असते

कोणीतरी राजीवने, स्वत:ला स्वदेशीकरीता; वाहून घेतलेला असतो
कोणीतरी, वेश्यांचे; पुनर्वसन करत असतो
कोणीतरी, बालमजुरांना; बेडीतून सोडवत असतो
कोणीतरी, गरीब मुलांच्या; शिक्षणाचा ध्यास घेतलेला असतो

कोणी वृद्धाश्रम चालवून, थकलेल्या देहांना आधार देत असतो
कोणी अबला स्त्रियांचे, पुनरुज्जीवन करीत असतो
कोणी भुकेलेल्या लोकांना, अन्नदान करीत असतो
कोणीतरी एक, लोकांना तत्वज्ञान सांगून; योग्य मार्ग दाखवत असतो

कोणाचातरी फोरम, "ग्लोबल वॉर्मिंगच्या" मुसक्या आवळत असतो
कोणीतरी गडकोट किल्ले, स्वच्छ आणि अबाधित ठेवत असतो
कोणीतरी प्राचीन वनस्पतींचा, अभ्यास करत फिरत असतो
कोणीतरी गरीब लोकांना, फुकट औषधे देत असतो
कोणीतरी वेड्यासारखा, झाडे लावत आणि जगवत असतो

या अशा लोकांना; स्वत:च्या आयुष्याची होळी करायची, सवय झालेली असते
चंदनाप्रमाणे झिजून, दुसऱ्याला शीतलता द्यायची असते
सामान्य लोकांच्या भाषेत, असली जनता "वेडी" असते
शब्द तोच; थोडा बदल, असली जनता "ध्येयवेडी" असते

हे काही भाषण नाही, किंवा एखादी कविता नाही
समाजात काही लोक काय करतात, याची एक यादीच आहे
ज्यांना प्रश्न पडतो, काय वेगळे करावे? किंवा कशी एखादी परिस्थिती बदलावी?
त्यांच्यासाठी फक्त काही, पर्याय सुचवलेला आहे
ज्याला तळमळ आहे, त्याने आपल्याला हवा तो मार्ग; निवडायचा आहे
आणि, माणूस म्हणून जन्माला आलो, त्यात काही तरी; वेगळी वाट धरायचा प्रयत्न आहे

© सचिन पुरुषोत्तम कुलकर्णी

No comments:

Post a Comment

LIKE Saarthbodh !!!