About Me

"सार्थबोध" साईटवर माझ्या कविता ,भावगीत ,निरुपण ,पोवाडा ,ओवी ,बंदिश ,मुक्तछंद ,लेख ,गवळण ,चारोळ्या आणि गझल तसेच मराठी आणि हिंदी भजन समाविष्ट केले आहेत.

Latest Posts

नवीन लिखाण:-



Thursday, October 16, 2014

मनन/चिंतन - !!! ***शुभ दीपावली*** !!!

!!! ***शुभ दीपावली*** !!!

दिवाळी आली, सर्वत्र आनंद, उत्साह, प्रकाश, फराळ, नवीन कपडे, अत्तरांचा सुगंध, लक्ष्मीची पूजा, दुकानांतील गर्दी, खरेदी, नवीन वस्तूचे घरी येणे आणि एकूणच काय सगळा हर्षोल्हास.

माणसाने जसा काळ बदलत गेला तसा स्वत:मध्ये, वागण्यात, विचारात विलक्षण आणि साजेसा बदल केला, कालानुरूप जगण्याची हीच व्यापक व्याख्या असावी. पण काही गोष्टीत अजून बदल व्हायला हवा असे माझे वैयक्तिक मत आहे, आग्रह नाही.

आपण बरेच जण शहरी भागात राहतो, रोजचे कामावर येणे-जाणे, गर्दी, धूर, प्रदूषण, गोंगाट याने ग्रासलेलो असतो, कधी घरात जाऊन, पंखा लावून शांत बसतो असे वाटते. याला कारण गाड्यांची बेसुमार वर्दळ, त्यातून जीव गुदमरवणारा धुराचा कोंडमारा, अशात आपण दिवाळीत फटाके उडवतो, फटाक्यांनी पुन्हा आहे त्या धुरात भर घालतो, त्यांच्या आवाजाने निसर्गात लहान-सहान जे काही पक्षी शिल्लक राहिले आहेत ते भेदरतात, फटाके फुटून होणारा कचरा वेगळाच. त्यात पण लक्ष्मी पूजनाला, लक्ष्मीचे चित्र असलेले फटाके फोडून त्या चित्राच्या चिंध्या होऊन पायाखाली तुडविले जाणे म्हणजे किती विरोधाभास?

मला असे वाटते फटाके उडवण्यावर थोडा प्रतिबंध आपण स्वत:ला घातला पाहिजे, आवाजी फटाके उडविण्यात तर काही अर्थच नाही, रोषणाईचे फटाके पण एका मर्यादेपर्यंत उडवायला हवेत. जागतिक तापमान वाढीचे दुष्परिणाम, यापासून आपण स्वत:ला/ पुढच्या पिढीला सावध केले पाहिजे. निसर्गातून मिळणाऱ्या संकेतातून काही सार्थबोध घ्यायला हवा.

तसेच "मेड इन चायनाचे" आकाश दिवे, दिव्यांच्या माळा, फटाके, मेणाच्या पणत्या, विकत न घेता, अशा उद्धट आणि घुसखोरी करणाऱ्या शेजारी देशाला चांगला धडा शिकवला पाहिजे.

फटाक्याचा खर्च वाचवून आपण कुणा गरजू माणसला मदत करू शकतो का? जसे कि एखाद्या वृद्धाश्रमात किंवा वनवासी कल्याण आश्रम शाळेत जाऊन तिथल्या नागरिकांना/ विद्यार्थ्यांना खाऊ वाटणे, अथवा सामाईक उपयोगाची वस्तू उदा. पाणी शुद्ध करायचा फिल्टर, सिएफ़ेलचे दिवे, सायकल, किराणाच्या वस्तू, येणाऱ्या थंडीसाठी लोकरीचे कपडे, हातमोजे, कानटोप्या, चादरी, किंवा सहसा लागणारी औषधे घेऊन देणे, अशा काही वस्तू आपण अथवा आपल्या मित्र-मैत्रिणी अथवा इमारतीमधील सभासद यांना जमवून, मदत गोळा करून देऊ शकतो का?, त्यांच्याशी गप्पा मारून, त्यांच्यात मिसळून त्यांचा आनंद वाढवू शकतो का?  
फारच साधी गोष्ट आहे, जर आपण हि मदत देऊ केली तर समाजातील या घटकांना देखील आनंद होईल व आपणही समाजातील दुर्लक्षित घटक नाही या जाणीवेने त्यांना आनंद होईल व त्यांचीही दिवाळी आनंदाने सजून उजळून जाईल. आपणास हा विचार पटल्यास नक्कीच इतरांना सांगा.

आपणा सर्वांना माझ्याकडून हि दिवाळी आनंदाची, सौख्याची, निरोगी, देशभक्तीची आणि भरभराटीची होवो अशा मन:पूर्वक शुभेच्छा !!!

- © सचिन पु. कुलकर्णी

No comments:

Post a Comment

LIKE Saarthbodh !!!