About Me

"सार्थबोध" साईटवर माझ्या कविता ,भावगीत ,निरुपण ,पोवाडा ,ओवी ,बंदिश ,मुक्तछंद ,लेख ,गवळण ,चारोळ्या आणि गझल तसेच मराठी आणि हिंदी भजन समाविष्ट केले आहेत.

Latest Posts

नवीन लिखाण:-



Wednesday, March 30, 2011

लेख:- नि:शब्द भावना.......

© सचिन पुरुषोत्तम कुलकर्णी
आपण आपल्या भावना, विचार दु:ख, आनंद, आदर, राग, प्रेम हे शब्दातून व्यक्त करत असतो. प्रसंगी आपण लिहितो, बोलतो, हावभाव करतो आणि आपले विचार व्यक्त करतो, समोरच्यापर्यंत पोहोचवतो. पण काही भावना अश्या असतात की ज्या शब्दात व्यक्त होत नाहीत.
याकरिता परमेश्वराने एक प्रभावी माध्यम दिले आहे आणि ते म्हणजे डोळे. डोळे हे न बोलून बरेच काही सांगून जातात, याच डोळ्यात निर्माण होणारा ओलावा तर जाणिवेचे सगळ्यात प्रभावी माध्यम.
माणूस जन्माला येतानाच मुळी सोबत रडण्याची सनई घेउन येतो आणि आपण या जगात आल्याची जाणीव सर्वांना करून देतो.
पाडव्याच्या पहिल्या कडूलिंबाचे पान खावून आपण जसे येणारे नविन वर्ष पूर्ण गोड जावे अशी मनीषा बाळगतो. त्याचप्रमाणे एकदाच काय` ते रडून घेऊ दे आणि येणारे सर्व आयुष्य आनंदाचे जाऊ दे अशी भाबडी भावना; मोठे लोक एखाद्याच्या जन्माच्या वेळेला व्यक्त करत नसतील काय?
हे रडणे इथेच थांबत नाही लहानपणिचे अव्यक्त त्रास, वेदना, आजार याचे रूपांतर रडण्यातच होते....... रडणे तेच....... अश्रू तेच....... भावना मात्र वेगळ्या..... वेदनेच्या , असहायतेच्या.
थोड़े मोठे झाल्यावर हट्टाच्या वस्तू न मिळाल्यास पुन्हा रडण्याचाच आधार, पहिल्यांदा शाळेत आईवडिल सोडून जाताना फाटकाकड़े वळून बघणाऱ्या चिमुकल्या डोळ्यांना रडण्याचाच आधार ....... रडणे तेच....... अश्रू तेच....... भावना मात्र वेगळ्या.......... एकटे पडल्याच्या.
थोड़े मोठे झाल्यावर मोठ्यांचा अपेक्षाभंग केल्यावर मिळणाऱ्या बोलाचा शेवट एकांतात रडूनच व्यक्त होतो ....... रडणे तेच....... अश्रू तेच....... भावना मात्र वेगळ्या.......... अपेक्षाभंगाच्या.
याच वयात आपण मोठे झाल्याचा आभास असतो; जो वागण्यात पण दिसतो, पण एखाद्या आव्हानासमोर हा आभास गळून पडतो, राहतो फ़क्त रडण्याचा आधार ....... रडणे तेच....... अश्रू तेच....... भावना मात्र वेगळ्या.......... आत्मविश्वास ढळल्याच्या.
मोठेपणी शिक्षण, नोकरी करता घराबाहेर पडलो की पहिल्या रात्री पलंगावर पडल्यावर घरातील सगळ्यांची आठवण काढत; डोळ्यात आलेल्या पाण्यातून आठवणी धुवून उजळ करत रडण्याचा आधार घेतला जातो ....... रडणे तेच....... अश्रू तेच....... भावना मात्र वेगळ्या.......... विरहाच्या.
वयानुरुप असेल नसेल; पण कर्ता व्यक्ति असल्यास सर्वांकडून येणाऱ्या तक्रारी, विचार, इच्छा, अपेक्षा, पाठपुरावा या सगळ्यांचा जेंव्हा अतिरेक होतो तेंव्हा हृदयातील तळमळ ही         डोळ्यातूनच बाहेर पड़ते ....... रडणे तेच....... अश्रू तेच....... भावना मात्र वेगळ्या............... श्रमाच्या , थकव्याच्या, जबाबदारी वाढल्याच्या.
एखादी आनंदाची बातमी असेल तर पहिली प्रतिक्रिया देवाला दिवा लावण्याची, दिव्यात तेल आणि डोळ्यात पाणी आणून साजरी करण्याची. इथे पण ....... रडणे तेच....... अश्रू तेच....... भावना मात्र वेगळ्या............... आनंदाच्या.
आयुष्यात लग्नाच्या प्रसंगी मुलीला निरोप देणाऱ्या डोळ्यांची अवस्था मात्र अगदी बिकट , जबाबदारी मिटल्याची, सगळे व्यवस्थित पार पडल्याची, अंगातील एक अवयवच दुसऱ्याला काढून दिल्याची. ही भावना पण अगदी साश्रु नयनांनी व्यक्त होते ....... रडणे तेच....... अश्रू तेच....... भावना मात्र अगदीच संमिश्र.  
कमावता मुलगा/मुलगी पहिल्या पगारात काहीतरी चीज वस्तू घेउन आपल्या आई वडिलांना भेट देतात; आनंद देतात. स्वत:चा मुलगा/मुलगी कमावते झालेले पाहून डोळ्यांना जे सुख मिळते ते पण व्यक्त होते याच अश्रुतून.
अनेक मित्र जीवनात भेटतात, त्यांच्या पासून लांब जाताना आणि अचानक अनेक वर्षांनी भेटताना पुन्हा मदतीला येतात ते अश्रूच, इतके वर्ष का भेटलो नाही याचा सगळा उलगडा आणि भेटून झालेल्या आनंदाची तीव्रता याच अश्रुतून व्यक्त होते ....... रडणे तेच....... अश्रू तेच....... भाव अगदीच निराळे, हरवून पुन्हा काही सापडल्याचे.
जीवनाच्या प्रवासात जोडीदाराला झालेला त्रास, सोसलेले कष्ट हे अश्रुतूनच व्यक्त होतात. एखादी प्रिय व्यक्ति ईश्वर चरणी विलीन झाल्यास गतकालातील सर्व गोष्टी दिनदर्शिकेप्रमाणे मनाच्या आडून अणि डोळ्याच्या पुढून चलचीत्राप्रमाणे क्षणात धावतात आणि राहतात ते फ़क्त अश्रू ....... रडणे तेच....... अश्रू तेच....... भाव अगदीच निराळे निसर्गाचा हा नियम बदलता येत नसल्याच्या निराशेचे.
या सगळ्या सृष्टीचा तो कर्ता धर्ता सावळा पांडुरंग, त्याची मूर्ति पाहिल्यावर देह हरपून जातो, ते गोजिरे रूप आणि परमेश्वरी भाव डोळ्याच्या कोंदणात मावत नाहीत, उरतात ते फ़क्त अश्रू; भाव अगदीच सात्विक, ते फ़क्त त्या विठ्लालाच समजतात. 
खरंच परमेश्वराने काय ताकद दिली आहे या दोन पाण्याच्या थेंबात. काही गोष्टी शब्दात व्यक्त करायच्याच नसतात, त्या फ़क्त या ओलाव्यातूनच जाणवायच्या असतात. दोन डोळे आणि त्यातील अश्रूंचे दान पदरात टाकल्याबद्दल परमेश्वराचे शतश: आभार. 
आम्हाला गरज पडल्यास हे अश्रू डोळ्यात यायची आणि दुसरयाच्या डोळ्यात ते आल्यास ते भाव समजण्याची संवेदना आम्हाला दे अशी त्या पांडुरंगाला प्रार्थना.
त्या पांडुरंगाचे आभार त्याच्या चरणावर याच दोन थेंबांचा अभिषेक करून मानावेसे वाटतात.


© सचिन पुरुषोत्तम कुलकर्णी

No comments:

Post a Comment

LIKE Saarthbodh !!!