About Me

"सार्थबोध" साईटवर माझ्या कविता ,भावगीत ,निरुपण ,पोवाडा ,ओवी ,बंदिश ,मुक्तछंद ,लेख ,गवळण ,चारोळ्या आणि गझल तसेच मराठी आणि हिंदी भजन समाविष्ट केले आहेत.

Latest Posts

नवीन लिखाण:-



Wednesday, March 30, 2011

लेख:- आयुष्य एकदाच येत, बरचसं तर सरलंय, बरच काही करायचं राहिलंय.

Article published on Antaraal Diwali Ank 2011.
http://antaraal.com/e107_v0617/e107_plugins/custom_ant_articles/2011/Oct2011_lekh_SK.pdf
------------------------------------------------------------------------------------------------------------
आयुष्य एकदाच येत, बरचसं तर सरलंय, बरच काही करायचं राहिलंय:-
© सचिन पुरुषोत्तम कुलकर्णी


माझ्या नात्यातले एक आजोबा आजारी होते. ते एका कौटुंबिक कार्यक्रमाला इथल्या शहरात आले आणि आजारी पडले. मला फार उशिरा कळले, तसा त्यांना भेटायला गेलो. आजोबा दवाखान्यातच होते, आयुष्यात काढलेले सगळे कष्ट त्यांच्या शरीरावर दिसत होते. मला पाहताच उठत बोलले ये बाळ, मी त्यांना जरा सावरून टेकवून बसवले, बाजूला आजी माळ घेऊन रामरायचा जप करीत बसल्या होत्या. टेबलावर दवाखाना छाप गोळ्याची पाकिटे, बाटल्या, तपासणीचे कागद, थर्मास, इत्यादी वस्तू पडल्या होत्या.
मी म्हणालो अप्पा कसे आहात, काळजी घ्या, मला कळवायचे तरी, मला पक्या काकाकडून कळले. अप्पा म्हणाले; अरे माझ्या म्हाताऱ्याचा तुम्हाला कशाला त्रास, आमचे काय आता पिकलं पान......मी त्यांना पुढचे बोलू दिले नाही, आजी तेवढ्यात म्हणाल्या; एकदमच त्रास झाला रे यांना, काही कळलेच नाही, आता जरा बरे आहे तरी काही बाही बडबडत असतात, त्या माऊलीच्या डोळ्यात टचकन पाणी आले. वयानुरूप सत्य आणि क्रमप्राप्त असले तरी आजोबांची अवस्था पाहून त्या एकदम अस्वस्थ झाल्या. मी थोडा धीर देत; काही होत नाही सगळे व्यवस्थित होईल असे म्हणालो.
आजोबा म्हणाले काय राहिले आहे आता; सगळे झाले बघ. फक्त तुझ्या आजीला चारधाम यात्रा करायची राहिली. त्याला काही वेळ मिळाला नाही, माझे तेवढे एक कर्तव्य राहिले आहे. बघू पांडुरंग ती संधी आता एकदा तरी देतो का ते, आणि आजोबांचे डोळे पण एकदम पाणावले. हिने बिचारीने कसली कसूर आमच्या संसारात ठेवली नाही पण माझ्याकडून हे कर्तव्य राहिले याची खंत वाटते, आता तर गात्रे पण साथ देत नाहीत.
मी म्हणालो तुम्ही आधी बरे व्हा मग सगळे ठीक होईल, काहीही लागले तर फोन करा. त्यांना विश्रांतीला घरी यायचा आग्रह केला आणि निघालो. घरी येऊन जेवण करून आडवा झालो आणि मनात विचार आला की आजोबांनी एवढा यशस्वी संसार केला पण आजींकरिता एक चारधाम यात्रा करायची राहिली; तर त्यांना इतके का वाईट वाटले. यावरून त्यांना या वयात एकमेकांची किती काळजी आहे हे कळून येते. मी विचार केला की अशी किती कर्तव्ये अनेक माणसांची राहत असतील; खरच त्या त्या वयात याचा मनावर इतका परिणाम होऊ शकतो का?
मी विचार करू लागलो, काय सांगता येते आपल्यापण हातून साधी वाटणारी अशी बरीच कामे राहिली असतील की जी करायची संधी निसर्ग पुन्हा देईलच याची शाश्वती नाही. मी आता नकळत स्वत:चाच अभ्यास चालू केला.
लहानपणापासून एक एक सगळे मित्र आठवायला लागले, सम्या, अभ्या, सुन्या, मन्या, श्रीया, पक्या, अम्या, लक्ष्या, धन्या एक ना अनेक मित्र आठवायला लागले, लहान पाणी एकत्र खेळलो, अभ्यास केला, शाळेत दंगा केला, सुट्ट्या घालवल्या, आयुष्यात कितीही मोठे झालो आणि कुठेही गेलो तरी आपण मित्रचं राहू अश्या घेतलेल्या शपथा फक्त तोंडी राहिल्या होत्या.
कधी तरी एका मित्राची लग्नाची बातमी यायची, तो बिचारा कुठून तरी फोन नंबर हुडकून फोन करायचा, मी नुसत्या बाता मारायचो आणि लग्नाला मात्र जायचो नाही. भेटणारे भेटायचे आणि मी मात्र कामाची कारणे देत राहिलो. खरेच जे भेटायला गेले त्यांना कामे नव्हती का? मी असा का वेगळा वागलो. नकळत सगळे जीवा भावाचे मित्र गमावून बसलो. नोकऱ्या लागल्यापासून शाळा/कॉलेजच्या गप्पा या फक्त गप्पाच राहिल्या, शिक्षकांची आठवण येणे बंद झाले, खरच एकदा सुट्टी काढून सगळ्या शिक्षकांना भेटायचे आहे, आता ठरवले आहे सगळ्यांचे पत्ते, फोन हुडकून काढायचे आणि एकदा भेटायचे, नाही जमले तर शाळेत/ कॉलेज मध्ये जाऊन घरचे पत्ते मिळवायचे आणि चूक सुधारायची. आयुष्य एकदाच येत, बरचसं तर सरलंय, बरच काही करायचं राहिलंय.
पुढे पगार वाढले, साहेब झालो, नोकरीत बऱ्याच आऊटिंगला गेलो, हजारो रुपये खर्च केले, उडवले, रोज वर्तमान पत्रात हजारो शेतकऱ्यांच्या आत्त्महत्येच्या बातम्या वाचीत राहिलो, कधी डोक्यातच आले नाही कि सरकारी यंत्रणेला शिव्या देत बसण्यापेक्षा; एखादे आऊटिंग रद्द करून त्याची रक्कम निदान एका तरी शेतकऱ्याच्या कुटुंबाला द्यावी. खरच हे करायचं राहिलंय, भारताचा सुशिक्षित नागरिक व्हायचं राहिलंय. आयुष्य एकदाच येत, बरचसं तर सरलंय, बरच काही करायचं राहिलंय..
विकेंडला महिन्याभरात दोन-चारशे रुपये तर नक्कीच खर्च करतो, एवढे पैसे तर पिझ्झा, चहा, कॉफी, जेवणावर जातात. कधीतरी एखादे हॉटेलचे जेवण, नाश्ता टाळून त्या पैश्यात, एखाद्या गरीबाच्या पोटाची निदान एक वेळची तरी खायची सोय करायची राहिलीय. माणूस म्हणून हे कर्तव्य राहिलंय. शेकडो रुपये पगारातून कार्पोरेट ““एन.जी.ओ.”” ला देत राहिलो. पण रोज समोर दिसणाऱ्या, पायात चपला सुद्धा न घालणाऱ्या एका तरी गरीब मुला/ मुलीची शाळेची फी, वह्या- पुस्तके, गणवेश द्यायच राहिलंय. आयुष्य एकदाच येत, बरचसं तर सरलंय, बरच काही करायचं राहिलंय.
ज्यांच्या घरात मोठा झालो, वाढलो त्या अण्णांची तब्येत आज काल बरी नसते, मुले पण विचारत नाहीत, गावाकडे जाऊन त्यांची विचारपूस करायचं राहिलंय, त्यांना आधार द्यायचा राहिलाय.
माझे आई वडील आता थकले, तरीही माझ्या संसारात मला मदत करतात. या वयात खरेतर आराम किंवा देवदर्शन करायचे सोडून माझी/ माझ्या मुलांची काळजी करत राहतात. त्यांनी सतत कर्तव्यच का पार पाडावीत? खरच एखाद्या रात्री दोघांचे पाय चेपत त्यांना आता फक्त आराम करायचा आग्रह करायचं राहिलंय. साला आयुष्य एकदाच येत, बरचसं तर सरलंय, बरच काही करायचं राहिलंय.
लग्न झाले, संसार सुरु झाला बायको नीट घर सांभाळते. ती तिच्या आई वडिलांना पण प्रसंगी विसरते इतकी स्वत:च्या घराची काळजी घेते. बरेच दिवस ती तिच्या आई-वडिलांना भेटली नाही, एकदा निवांत तिला तिच्या आई वडिलांची गाठ घालून द्यायचं राहिलंय
ती घरातलं सगळ करते, स्वयंपाक करते, सगळ्यांना सांभाळून घेते, मुलीला हव नको बघते, तिचा हट्ट सांभाळते, अभ्यास घेते, शाळेत सोडणे/आणणे करते, तिला रोज झोपवते, चांगले संस्कार करते. मी मात्र कामाच्या ताणाचे कारण पुढे करतो, तिला किती त्रास होत असेल किंवा तिची २४ तासाची ड्युटी कधी संपते का? याचा विचारच करायच राहिलंय. स्वत:च्या मुलीच हे कोडकौतुक आणि दैनंदिन कर्तव्य करायच राहिलंय.                                        
अन्न पाण्याची सोय तर प्राणी-पक्षी पण करतात. बाप फक्त पैसे कमावून आणतो, खायला प्यायला देतो हे जुनाट विचार दूर करायचं राहिलंय. अगदी  प्रोफेशनल अस नाही  पण एक जोडीदार/ मित्र  म्हणून बायकोचे मनापासून आभार मानायचं राहिलंय. आयुष्य एकदाच येत, बरचसं तर सरलंय, बरच काही करायचं राहिलंय.
अनेकदा ऑनसाईट जाऊन आलो; तिकडचे देश पाहिले, त्या लोकांकडून त्यांच्या देशाचे कौतुक ऐकले, मी पण इकडे येऊन त्यांचे कौतुक सांगत राहिलो. पण एकदा तरी तिथल्या लोकांना स्वत:च्या देशाबद्दल सांगायचं राहिलंय.
आजपर्यंत अनेक लोकांच्या घरी समारंभ, बुफे-जेवणे झाली, आरत्या, पूजा असे प्रसंग झाले, हा त्या देवाला गेला; तो तिकडे गेला, माझे मात्र राहिले, अगदी देवदर्शन सोडा पण स्वत:च्या घरातल्या देवापुढे एका संध्याकाळी दिवे लागणीला दोन चमचे तेलाचा दिवा आणि उदबत्ती लावून प्रार्थना करायच राहिलंय. आयुष्य एकदाच येत, बरचसं तर सरलंय, बरच काही करायचं राहिलंय..
शाळा, कोलेज, स्पर्धापरीक्षा ते नोकरी, प्रमोशन मध्ये कायम पहिला यायच्या प्रयत्नात किती कष्ट केले आणि किती दिवस घालवले. पण ज्या पंढरीच्या वारीला लाखो लोक येतात त्या वारीत पहिला तर सोडाच पण लाखात एक यायचा साधा विचार करायचं राहिलंय. खरच आयुष्यात टार्गेट, प्लान, वर्कलोड, गो-लाईव्ह, डेडलाईन, कंप्लीशन हे सगळे सोडून एकदा तरी पायी वारी करून पांडुरंगाचे दर्शन घ्यायचं राहिलंय. आयुष्य एकदाच येत, बरचसं तर सरलंय, बरच काही करायचं राहिलंय.
शरीरान एवढी साथ दिली, पण त्याच्याकडे सुद्धा लक्ष द्यायचं राहिलंय. सारखा आजारी पडतोय, कमावलेले पैसे डॉक्टर/औषधावर खर्च करतोय, त्या बिचाऱ्या शरीरासाठी व्यायाम करायचं पण राहिलंय, खरच बरच काही करायचं राहिलंय.
हे सगळे विचार माझ्या डोळ्यासमोरून पटापट येऊन गेले, विचार करता करताच झोप लागली, आज सकाळी मात्र गजर न लावताच जाग आली.
सगळ करायचं आता ठरवलंय पण भावांनो याला सुरुवात करायचं राहिलंय.
देवा पांडुरंगा, हे आयुष्यात वेळीच लक्ष्यात आणून दिल्याबद्दल तुझे आभार मानायचं सुद्धा राहिलंय.
आयुष्य एकदाच येत, बरचसं तर सरलंय, बरच काही करायचं राहिलंय.

© सचिन पुरुषोत्तम कुलकर्णी

No comments:

Post a Comment

LIKE Saarthbodh !!!