About Me

"सार्थबोध" साईटवर माझ्या कविता ,भावगीत ,निरुपण ,पोवाडा ,ओवी ,बंदिश ,मुक्तछंद ,लेख ,गवळण ,चारोळ्या आणि गझल तसेच मराठी आणि हिंदी भजन समाविष्ट केले आहेत.

Latest Posts

नवीन लिखाण:-



Monday, May 9, 2011

मनन/चिंतन - वृद्ध मित्राची समृद्ध कहाणी.......

माझ्या येण्याजाण्याच्या वाटेवर, एक जागा खास होती
एका मोठ्या झाडाखाली, माझी बऱ्याचदा बैठक होती

शाळेत असल्यापासून, आमची जुनी मैत्री होती
पावसाळ्यात आडोसा आणि उन्हाळ्यात खेळायची, हक्काची ती जागा होती

झाडाच्या कित्येक पानांवर, शेकडो किड्यांची घरे होती
त्याच्या खोडाच्या खाचा-खळग्यात, लक्ष्य मुंग्यांची वहिवाट होती

किती उन्हाळे; किती पावसाळे, शेकडो मौसमांची साक्ष होती
त्याच्या पारावर बसून, अनेक संसारांची बातचीत झाली होती

कधी रात्रीच्या गप्पा, कधी जेवणाची पंगत होती
कधी कीर्तनाच्या प्रसंगी, अध्यात्माची शिकवण होती

त्याने त्याच्या पायथ्याला, एक प्रेमाची भेटहि पहिली होती
आधी येणारयाच्या डोळ्यात, साथीदाराची वाट पहिली होती

कधी त्याने त्याच्या सावलीत, अशी मौज पहिली होती
भोळी-भाबडी लहान मुले, खेळांचे डाव मांडत होती

कधी थकलेले देह, तिथे विसावा घेऊन सुखावले होते
कधी तरी कुणाचे, तिकडे आत्मचिंतनही झाले होते

कधी येणारी जाणारी, एखादी गाडी थांबली होती
क्षणभर का होईना, एक आठवण देऊन गेली होती

त्याच्या फांद्यांवर अनेक पक्ष्यांची, छोटी मोठी घरटी होती
पिल्लांची जबाबदारी; त्याच्यावर सोपवूनच, त्यांची आकाश्यात भरारी होती

सगळ्यांची मदत करत; सगळ्यांना सावली देत, तो वृक्ष उभा होता
कोणाकडूनही काही न घेता, त्याचा भाव अगदी निरपेक्ष होता

अनेक वर्ष्यांचा, त्याचा तिथे वास होता
त्याच्या वयात झालेला बदल, त्याच्या रूपावरून कळत होता

सावली कमी झाली तरी, वठलेल ते झाड; वाळलेल्या फांद्या देत होत
नव्या पिढीच्या आयुष्याला, जणू अनुभवाचं सरणच देत होत

मला वाटले झाड मला, आज काहीतरी खुणावत आहे
फांद्या-पाने हलवून, काहीतरी सांगायचा प्रयत्न करीत आहे

इतके वर्षांची ओळख आमची, त्याचे मन कळायला अडचण कसली?
नीट कान देऊन ऐकता, त्याची खरी व्यथा कळली  

आज त्याचा भाव, थोडा वेगळा आणि रुक्ष होता
कदाचित वयोमानाप्रमाणे, एक विचार त्याच्या मनात सूक्ष्म होता

आजवर मी सगळ्यांचा प्रिय होतो, अनेक भेटी-गाठी पाहत होतो
आता कुणी बसायलाही येत नाही, हाच का रे काळाचा महिमा तो?

आधी खूप मजा होती, सवंगड्यांची रीघ होती, फांद्या अन् पानांची बहर होती
इतकी फांद्या-पाने राहिली नाहीत, मी आता म्हातारा झालो, हीच का माझी चूक ती?

फार वाईट वाटते बाळा, कधी एकटेपणाची भीती वाटते
हातात कुणाच्या कुऱ्हाड दिसता माझे काळीज थरकापते

कुणाला हाक मारू?, मी कुणाला दु:ख सांगू?
फार काही नाही मागत मी तुला एक मदत मागू?

असे काहीतरी कर मित्रा, असे नियोजन कर
परत सवंगड्यांची बहर येऊ दे, अशी काही व्यवस्था कर  

मनात विचार येईना, काय करावे कळेना
माझ्या त्या वृद्ध एकाकी मित्राचे, दु:ख मला पाहवेना

मनाशी निश्चय केला, त्याला एक विश्वास दिला
आठवडाभर शोधून, एक चांगला मार्ग दिसला

एका वृक्षप्रेमी संस्थेला, माझा मनोदय कळवला
एक लहान देऊळ बांधूया, असा निर्णय पक्का केला

सगळी परवानगी आणि मेळ मिळता, एकच असा गलका केला
पुढच्या एका आठवड्यात, आम्ही कळस देखील चढवला

मूर्ती बसवून प्रतिष्ठापना केली, पुजेची जय्यत तयारी केली
याच निमित्ताने एकदा परत, झाडाखाली पंगत बसली

रहदारी वाढली, लोक देवाला भजायला लागली
माझ्या मित्राची इच्छा पूर्ण करायची, माझी योजना सफल झाली

गेल्या काही महिन्यात, एक बदल घडला होता,
झाडाला नवी पालवी, आणि पक्ष्यांचा किलकिलाट वाढला होता

मी आता देवळात आलो की, झाडांची पाने सळसळतात
जणू आमच्या मैत्रीची, ते साद मला देत असतात

कोण म्हणतो झाडांना मन नसते, त्यांना काही जीव नसतो
माझ्या वृद्ध मित्राने; तो मैत्रीचा धागा, उलगडून दाखवलेला असतो


© सचिन पुरुषोत्तम कुलकर्णी

No comments:

Post a Comment

LIKE Saarthbodh !!!