About Me

"सार्थबोध" साईटवर माझ्या कविता ,भावगीत ,निरुपण ,पोवाडा ,ओवी ,बंदिश ,मुक्तछंद ,लेख ,गवळण ,चारोळ्या आणि गझल तसेच मराठी आणि हिंदी भजन समाविष्ट केले आहेत.

Latest Posts

नवीन लिखाण:-



Tuesday, May 10, 2011

जागरण- असहाय्य

असहाय्य...

भकास जमीन; रेताड; मळकट माती, असा एकूण तो प्रदेश असतो
फाटलेल्या आभाळाखाली; करपलेल्या उन्हात, निष्पर्ण झाडाचा आधार असतो

कुठेतरी आडोश्याला, एक उसकटलेला  असा खोपटा असतो
एका; एकटा पडलेल्या शेतकऱ्याचा, तो मोडका संसार असतो

पाऊस नाही; पाणी नाही, पुरेशी अशी सुविधा नाही
सगळेच कसे फटके आहे, मदतीची काही शक्यता नाही

मातीमध्ये राबून; पोटाची खळगी भरणे, हाच एक उद्योग असतो
केवळ त्या एका पर्यायाकरिता, तो जीवाचे रान करत असतो

ढग पाण्याला आणि सावलीला, त्याच्यावर रुसलेले असतात
सगळा खटाटोप करण्यात, त्याचे पाय कर्जात बुडालेले असतात

दुसरे काहीच करण्यासारखे नसते, म्हणून तो शेतात राबत असतो
आता सगळाच त्याचा हवाला, त्याने देवावरती सोडलेला असतो

घरात एक दारिद्र्याची कळा, वरून कर्जाचा डोंगर असतो
आयुष्याच्या या विखारी लढाईत, घरातला प्रत्येक शिलेदार लढत असतो

राबराब उन्हात राबतो, सगळे अंग रापून निघतो
टाकलेले बी-बियाणे सुद्धा, केवळ किड्या मुंग्यांचा आहार असतो

सगळे प्रयत्न थकलेले असतात, शरीसुद्धा थकलेले असते
एक दिवस आता त्याने, विचारसुद्धा करायचे सोडलेले असते

उपाशीपोटी शरीराला, विवेक बुद्धीचा अंमल नसतो
पोटाला आग लागता, सारासार विचार शून्य असतो

घरात जिवंतपणाचे असे, वातावरणाच नसते
सगळे व्यवहार, एक मूक भाषा असते

देवाचा धावा संपलेला असतो, जगाच्या माणुसकीचा; झरा आटलेला असतो
रडायला सुद्धा आसवे नसलेला; त्यांचा डोळा; आता; दोन थेंब पाण्याला दरिद्री झालेला असतो

थकून; निराश होऊन; उपाशी पोटी कुटुंबाला; प्रेतवत झोप लागलेली असते
आपला कर्ता माणूस; स्वत:चे काही बरेवाईट तर करून घेणार नाही, याची त्यांना धास्ती असते

एके दिवशी शेतकऱ्याच्या मनातली, पूर्ण अशा संपलेली असते
आणि देवाने असे का केले?; हे त्याला जाऊन विचारायची, त्याने तयारी केलेली असते

असेच एक दिवस कुटुंब, रापून; मोडून झोपलेले असते
कधीतरी पहाटे त्यांच्या शेजारची, एक जागा; रिकामी झालेली असते

परिस्थितीने त्याच्या भोवतीचा फास, इतका काही आवळलेला असतो
त्याच्या हिसाक्यापेक्ष्या बरा त्याला, दोरीचा फास वाटलेला असतो

रात्री काळ्या अंधारात त्याने, शेताची वाट धरलेली असते
त्याच्या आवडत्या झाडावर, त्याचे आयुष्य लटकलेले असते

सकाळी उठता घरातील लोकांची, चलबिचल झालेली असते
मनात; चिंतेचा विचार असतो, पण; तो खोटा असावा अशी एक इच्छा असते

नकळत त्यांची धाव शेताकडे जाते, त्यांचे हृदय पिळवटलेले असते
लांबून दृश्य पाहून, चाल मंदावते, आणि शरीर गुढग्यात वाकते

आपला धनी गेला म्हणून, माय माउली उर बडवत असते
उपाशी पोटी; भरल्या ओझ्यांनी, त्यांना आसवांची पण कमी असते

अर्धा डाव टाकून धनी गेला, याचे तिला दु:ख असते
आता पुढे; कसले आयुष्य आणि कसले काय, अशी तिची गत असते

मुलांच्या डोळ्यात, देवाबद्दल एक प्रकारची चीड असते
नशीब, कर्म, प्रारब्ध; या विचारांनी, त्यांची मुद्रा दिग्मूढ असते

इकडे मिडियामधल्या काही अप्पलपोटी लोकांना, एक बातमी मिळालेली असते
तिकडे कुठल्यातरी दोन पक्ष्यांची, राजकीय कुस्ती जुंपलेली असते

शहरामध्ये होर्डिंग जाहिराती, दिव्याखाली झळाळत असतात
तिकडे खेड्यात अंधाऱ्या रात्री, किती कुटुंबे उध्वस्त होत असतात

आयुष्याला कंटाळलेल्या शेतकऱ्याला, आत्महत्या करायला देखील उजेड नसतो
इकडे शहरात माणूस मनोरंजनासाठी, लाखो मेगावॅट उधळत असतो

सकाळी उठल्यावर; टी.व्ही वरती, फाटलेल्या ह्या ब्रेकिंग न्यूजचा सपाटा असतो
खेळ पाहिल्याप्रमाणे प्रत्येक जण, "चक् चक्....." करत चहाचा घोट घेत असतो

कुठेतरी मोठा वाईट बदल होत आहे, शेतकरी शेती करायचे सोडतो आहे
गेले ते जात्यात गेले, आपण सुपात आहोत अशी आज परिस्थिती आहे

हा भूमिपुत्र पिकवतो म्हणून; आपण आज जगतो आहे,
त्याला वाचवणे हे आपले इति कर्तव्यच आहे

माणुसकी आणि पैसा यात मोठी गफलत होत आहे
टेक्नॉलॉजीच्या नावावर विचित्र अशी प्रगती होत आहे

काहीच बदल होत नाही, हळहळ करण्याखेरीज काही करावेसे वाटत नाही
मला वाटते माणुसकीने आपले अस्तित्वच टिकवलेले नाही


© सचिन पुरुषोत्तम कुलकर्णी

No comments:

Post a Comment

LIKE Saarthbodh !!!